पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर मंगळवारी पहिल्याच दिवशी शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळाला. उत्तर प्रदेशसह भाजपला अन्य राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. या निकालांमुळे सरकारची राज्यसभेतील स्थिती आणखी मजबूत होणार असून त्यामुळे सुधारणांच्या प्रक्रियेला गती मिळेल, अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात आज सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) प्रमुख क्षेत्रांचे निर्देशांक दोन टक्क्यांनी वधारले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेअर बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स ६१५ अंकांनी वधारून २९५६१. ९३ या उच्चांकी पातळीवर पोहचला. त्यानंतर निफ्टी ५० निर्देशंकानेही १८८ अंकांची उसळी घेत ९,१२२.७५ चा टप्पा गाठला. तर रूपयादेखील यंदाच्या आर्थिक वर्षातील सर्वात मजबूत स्थितीत पोहचला आहे. रुपयातील ही सुधारणा हे सुद्धा बाजाराच्या उत्साहाचे प्रमुख कारण मानले जात आहे. शुक्रवारी बाजार बंद झाला त्यानंतर आज डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात तब्बल ४३ पैशांची सुधारणा झाली आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते भाजपला विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशामुळे हा सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. या विजयामुळे २०१९ साली केंद्रात मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. त्यामुळे मोदी सरकारला त्यांच्या आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबविण्यात कोणतेही अडथळे येणार नाहीत. तसेच येत्या काही वर्षात राज्यसभेत भाजपचे संख्याबळ वाढणार असल्याने महत्त्वपूर्ण आर्थिक विधेयके मार्गी लागतील, असा अंदाज एडलवाईस सिक्युरिटीजकडून व्यक्त करण्यात आला आहे.

दोन वर्षांनी, सन २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधीचा मोठा टप्पा ठरलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. उत्तर प्रदेश व उत्तराखंड या दोन राज्यांत ऐतिहासिक असा खणखणीत विजय मिळवून भारतीय जनता पक्षाने तेथे सत्ताबदल घडवला आहे. समाजवादी पक्षातील बेदिली, निष्प्रभ ठरलेली काँग्रेस व त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे याच राज्याचे लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पणाला लावलेली प्रतिष्ठा या घटकांमुळे अवाढव्य अशा उत्तर प्रदेशातील ४०३ पैकी तब्बल ३१२ जागी भाजपचे कमळ फुलले आहे. तर, उत्तराखंडातील ७०पैकी ५७ जागा पटकावीत भाजपने सत्ताधारी काँग्रेसला पुरते चितपट केले होते.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex and nifty on high after bjp narendra modi victory share market