डॉ. आशीष थत्ते

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माझ्या आयुष्यात मी दोन मोठय़ा रांगा बघितल्या आहेत, तुम्हीदेखील खूप रांगा बघितल्या असतील. पहिली जेव्हा गणपती दूध पीत होता तेव्हा देवळात मोठी रांग होती. आता अफवा फक्त गणपती बाप्पा दूध पीत होता जर अजून देव असते तर कदाचित रांग विभाजित झाली असती आणि कमीपण झाली असती. या रांगेला सर्वर देणे किंवा अधिक सेवा देणे असे म्हणतात. दुसरी सर्वाच्या लक्षात राहिलेली रांग म्हणजे ‘निश्चलनीकरणा’ची रांग. समजा करोना आधी आणि निश्चलनीकरण नंतर झाले असते तर? करोनानंतर आपण खूपच डिजिटल झालो आहोत. म्हणजे निश्चलनीकरणाच्या रांगेत तुम्ही काय करत होतात ते आठवा? आजूबाजूला लोकांशी बोलणे आणि चर्चा करणे वगैरे सामान्य आहे. त्या वेळी थोडेसे अधिक डिजिटल असतो तर कितीतरी आभासी बैठका, हास्यजत्रा किंवा हवा येऊ द्याच्या मालिकांचे नुसते पारायण केले असते. म्हणजे मनोरंजन करून रांगेचे दुष्परिणाम कमी केले असते.

महानायक अमिताभ बच्चन यांनी १७ जूनला इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर प्रसिद्ध केलेले छायाचित्र.
‘डॉन’ (१९७८) या चित्रपटाचे तिकिट मिळविण्यासाठी  काही किलोमीटर लांबपर्यंत लागलेली रांग.

कित्येक वेळेला आपण मंदिरामध्ये मोठय़ा रांगेत उभे राहतो. भक्तगण देवाचे नाव घेत उभे असतात त्यांची श्रद्धा देवावर असतेच पण नकळत आपण रांगेचा त्रास कमी करत असतो. टोकन पद्धती तर निश्चित आहे. पुन्हा रांग मोडायची म्हणजे थोडे पैसे अजून द्या म्हणजे व्यवस्थापनाचे नियम आपण दैनंदिन जीवनात वापरतोच. पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मोठय़ा रांगा बाहेरगावच्या गाडीच्या आरक्षण करायला असायच्या नंतर टोकन पद्धती सुरू झाली आता पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने आपण आरक्षण करतो. डिजिटल सेवांमुळे बँकेतील रांगादेखील कमी झाल्या आहेत. या सगळीकडे कळत-नकळत आपण रांगेचे सिद्धांत वापरतो किंवा त्याचा भाग असतो. डॉक्टरांकडे रांग लावून उभे न राहता बसण्याची रांग असते कारण आजारी लोक तिथे येतात. बस, रेल्वे, विमानाच्या रांगेतदेखील गरोदर महिला, दिव्यांग किंवा वृद्ध प्रवाशांना रांगेत उभे न राहू देता प्रथम प्राधान्य देतात. कारण रांगेचे सिद्धांत पुस्तकात ठीक आहेत पण व्यवहारात प्रत्येक ठिकाणी वापरात येतात असे नाही. महिन्याच्या पहिल्या काही दिवसांमध्ये सरकारी बँकांमध्ये निवृत्तिवेतन घेण्यासाठी मोठय़ा रांगा लागायच्या किंवा अजूनदेखील असतात. रांगेचे सिद्धांत वापरून किंवा त्यामध्ये संशोधन करून त्या हळू हळू कमी करण्याचे प्रयत्न केले जातात.      

रांगेमध्ये उभे असताना तिचा त्यागदेखील करता येतो (रेजिंग) आणि व्यवस्थापनात त्यावरही प्रमेये आहेत. म्हणजेच रांग केव्हा सोडायची किंवा सेवा मिळाल्यानंतरसुद्धा रांग सोडता येते. समजा अपघातानंतर व्यक्ती वाचणार नाही असे समजल्यास त्या व्यक्तीला सरळ दुसऱ्या दवाखान्यामध्ये घेऊन जाण्यात येते. रांग सोडणे किंवा सोडवायला लावणे, रांग मोडणे, रांगेत स्वत: पुढे जाणे यावर सिनेमांमध्ये बरीच विनोदी दृश्ये बघायला मिळतात.     

आपल्याला सेवा कधी मिळेल यांची संभाव्यता (प्रोबॅबिलिटी)  देखील आपण पडताळून पाहतो. जसे दोन किंवा तीन माणसे रेल्वेच्या वेगळय़ा वेगळय़ा रांगेत उभी राहतात आणि शक्यतेनुसार एखाद्या रांगेत त्यांचा नंबर लवकर लागतो. तसे रांगेत होणारे प्रेम, भांडणे किंवा अगदी मारामाऱ्या यावरदेखील अजून काही सिद्धांत वाचनात नाही, त्यामुळे तिथे वाचकांना संशोधनास बराच वाव आहे! 

लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट  अकाउंटंट म्हणून कार्यरत /

ashishpthatte@gmail. com

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Queuing theory definition introduction to queuing theory zws