scorecardresearch

साप्ताहिक राशिभविष्य

aries
मेष( २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२५ )
मेष : वातावरण आनंदी राहील

दसरा या सणाचे औचित्य साधून मोठ्या खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल. हा दसरा तुमच्यासाठी नवीन उत्कर्ष घडवणारा आहे. दिनांक २८ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील. सप्ताहात दिवस चांगले असतात त्यावेळी एक अनुभव असा येत असतो की, आपण जे काम करतो त्या कामाला वेळ लागत नाही. काम अगदी वेळेत पूर्ण होते. कामासाठी कोणाची गरज भासत नाही. शिवाय समोरच्यांचा प्रतिसादही चांगला राहतो. या सप्ताहात असाच अनुभव तुम्हाला येणार आहे व्यावसायिक वाढ चांगली राहील. नोकरदार वर्गाच्या कामांमध्ये बदल होतील. आर्थिक प्रश्न मिटेल. घरगुती वातावरण आनंदी राहील. आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहाल. विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील. आरोग्याची काळजी घ्या. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.

शुभ दिनांक : २९, ३०

महिलांसाठी : तारेवरची कसरत कमी होईल.

taurus
वृषभ( २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२५ )
वृषभ : पथ्यपाणी सांभाळा

भाग्यस्थानातून होणारा दसरा हा तुमच्यासाठी भाग्योदय करणारा असेल. काही गोष्टी ठरवून होत नाहीत, पण अनपेक्षितपणे होतात. असा हा दसरा तुमच्यासाठी स्वप्नमय असेल आणि तुमची स्वप्नं पूर्ण करणारा असेल. दिनांक २९, ३० संपूर्ण दोन दिवस व १ तारखेला दुपारपर्यंत असा हा अडीच दिवसांचा कालावधी जेमतेम राहणार आहे. या कालावधीत काय करावे काय करू नये हे काही सुचणार नाही. कारण तुमची धावपळ होणार आहे. त्यासाठी आधी नियोजन करा म्हणजे गडबड होणार नाही.

तुम्ही कितीही चांगले वागलात तरी काही लोक विरोधात जातात; तेव्हा अशा गोष्टींचे वाईट वाटून घेऊ नका. या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. व्यवसायात फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालू राहील. अनपेक्षित लाभ होईल. जोडीदार मदत करेल. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.

शुभ दिनांक : २, ३

महिलांसाठी : कामामध्ये गुंतून राहा.

gemini
मिथुन( २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२५ )
मिथुन : प्रकृतीची काळजी घ्या

‘साधुसंत येता घरा तोचि दिवाळी दसरा’ ही आपली संस्कृती आहे हे विसरू नका. सणासुदीचे औचित्य साधून दिवस सर्वांसोबत चांगला कसा जाईल ते पाहा. या दिवशी नको ते धाडस करू नका. चंद्र ग्रहाचे भ्रमण षष्टस्थानातून अष्टमस्थानाकडे होत आहे. अशा वेळी सतर्क राहणे गरजेचे राहील. काही गोष्टी मनाविरुद्ध होऊ शकतात. त्यावेळी आपल्याला काही सुचत नाही. या गोष्टीला कोणाला जबाबदार धरावे हेही कळत नाही. नकळत आपल्याकडून दुसऱ्याला समजून न घेण्याची वृत्ती या कालावधीत राहते. त्यामुळे कोणतेही काम शांतपणे करा. म्हणजे नुकसान होणार नाही. तोंडावर ताबा ठेवा. कायद्याचे पालन करा. व्यवसायात गुंतवणूक टाळा. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत लक्ष देऊ नका. खर्च सांभाळा. राजकीय क्षेत्रात हस्तक्षेप करू नका. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा. प्रकृतीची काळजी घ्या.

शुभ दिनांक : २९, ३०.

महिलांसाठी : विचार करूनच बोला.

Cancer
कर्क( २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२५ )
कर्क : कामात गुंतून राहा

दसरा जोडीदारासोबत अगदी उत्साहाने साजरा कराल. दिनांक २९, ३० हे संपूर्ण दोन दिवस व १ तारखेला दुपारपर्यंत असा हा अडीच दिवसांचा कालावधी चांगला कसा जाईल यासाठी प्रयत्न करा. कारण या कालावधीत तुम्हाला नको त्या गोष्टींचा सामना करावा लागेल. म्हणजे वाईट होईल असे नाही. फक्त आपले काम काळजीपूर्वक करावे लागेल. काम करताना बोलण्याची घाई करून चालणार नाही. दोन शब्द कमी बोला, म्हणजे नुकसानच होणार नाही. हे सूत्र जर तुम्ही अंगीकारले तर या ग्रहमानाचा तुम्हाला त्रासही होणार नाही. स्वत:वर ताबा ठेवा. कामात गुंतून राहा. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात उलाढाल वाढेल. नोकरदार वर्गाचा कामात वेळ कसा जाईल ते कळणार नाही. आर्थिक बचत करणे योग्य राहील. मानसिक, शारीरिक स्वास्थ्य जपा.

शुभ दिनांक : २८, २

महिलांसाठी : इतरांच्या बोलण्या-वागण्याकडे लक्ष देऊ नका.

leo
सिंह( २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२५ )
सिंह : मोह आवरा

दसऱ्या दिवशी खरेदी करण्याचा मोह आवरा. आपली आवक पाहून जावक ठरवा म्हणजे नुकसान होणार नाही. १ तारखेला दुपारनंतर दिनांक २ व ३ हे संपूर्ण दोन दिवस असा हा अडीच दिवसांचा कालावधी अनुकूल कसा जाईल ते पाहा. कारण या दिवसांत काम कमी आणि भानगडी जास्त अशी परिस्थिती निर्माण होते. अशा परिस्थितीत आपण आपल्या कामाकडे लक्ष देणे जास्त महत्त्वाचे राहील. एखादे काम कमी करा, पण घाईगडबडीने निर्णय घेऊ नका. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायातील परिस्थितीत चांगला बदल घडवण्यासाठी प्रयत्न वाढवा.

नोकरदार वर्गाच्या कामकाजात वेळेनुसार केलेले बदल चांगले असतील. खर्च जपून करा. समाजमाध्यमांचा वापर जेवढ्यास तेवढा करा. मुलांची प्रगती होईल. घरातील सदस्यांचा पाठिंबा राहील. आरोग्याची काळजी घ्या.

शुभ दिनांक : २९, ३०

महिलांसाठी : पारंपरिक गोष्टींची आवड राहील.

gemini
कन्या( २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२५ )
कन्या : कष्टाचे फळ मिळेल

हा दसरा इच्छा-आकांक्षा पूर्ण करणारा आहे असेच म्हणावे लागेल. कारण या दिवशी तुमच्या मनामध्ये आत्तापर्यंत खरेदीचे जे स्वप्न पूर्ण होत नव्हते ते पूर्ण होईल. या सप्ताहातील सर्व दिवस चांगले आहेत, त्यामुळे काळजी करण्याची चिंता नाही. सध्या आपण म्हणाल ती पूर्व दिशा असणार आहे. या संधीचा फायदा घ्या. आपली बाकी राहिलेली कामे पूर्ण करून घ्या. इतरांच्या मदतीचा उपयोग होईल. आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचे फळ मिळेल.

व्यवसायात मोठ्या प्रमाणात उलाढाल वाढेल. नोकरदार वर्गाला कामाच्या संदर्भात येणारे अडथळे दूर होतील. आर्थिक लाभ होईल. समाजसेवेत सहभागी व्हाल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. भावंडांना मदत कराल. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. मानसिक-शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील.

शुभ दिनांक : २, ३

महिलांसाठी : चांगल्या गोष्टीचा शुभारंभ होईल.

libra
तूळ( २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२५ )
तूळ : सुविधांचा उपभोग घ्याल

दसरा सणाचे औचित्य साधून घरगुती वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी कराल. या सप्ताहातील सर्व दिवस चांगले असतील. चांगल्या दिवसांमध्ये बरेच काही चांगले घडते याचा अनुभवही येईल. अनेक सुविधांचा उपभोग घ्याल. चांगल्या गोष्टींचा श्रीगणेशा व्हायला आता वेळ लागणार नाही. संघर्षदायक वातावरण कमी झाल्यामुळे कामातील उत्साह वाढेल. काम अगदी वेळेत पूर्ण होईल. चांगल्या कालावधीमध्ये प्रयत्नांना यश मिळेल. व्यवसायाला नवी दिशा मिळेल. व्यवसायात लाभदायक परिस्थिती निर्माण होईल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करावी लागेल. नवीन ओळखीचा फायदा होईल . शेजाऱ्यांना मदत कराल. घरगुती वातावरण चांगले राहील. मानसिक समाधान लाभेल. प्रकृती चांगली राहील.

शुभ दिनांक : १, २

महिलांसाठी : योग्य मोबदला मिळेल.

soc
वृश्‍चिक( २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२५ )
वृश्चिक : मनोरंजन होईल

दसरा उत्साहाने साजरा कराल. खरेदी कराल. सप्ताहात सर्व दिवस चांगले असतील. दिवस चांगले असतील त्यावेळी मात्र तुम्ही कामासाठी वेळ देत नाही. सध्या दिवस चांगले असल्यामुळे कामासाठी वेळ द्या. प्रयत्न करूनही ज्या कामांना यश मिळत नव्हते अशा कामांसाठी प्रयत्न वाढवा. सकारात्मक गोष्टी घडतील. आपले मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल आणि तो प्रयत्न यशस्वी होईल. व्यवसायात अनेक मार्गांतून यश मिळेल. खरेदी-विक्रीचे व्यवहार चांगले होतील. नोकरदार वर्गाचे काम मार्गी लागेल.

कसरत कमी होईल. आर्थिक बाबतीत समाधानाची बाब राहील. राजकीय क्षेत्रात चिकित्सक वृत्ती राहील. कार्यक्रमानिमित्त नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. मनोरंजन होईल. धार्मिक गोष्टींसाठी वेळ द्याल. कुटुंबामध्ये आसणारे गैरसमज दूर होतील. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

शुभ दिनांक : २८, २९

महिलांसाठी : कामाचा भार हलका होईल.

Sagi
धनु( २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२५ )
धनू : खर्च सांभाळा

दसरा धनस्थानातून होत आहे. नक्कीच धन मिळणार आहे हे लक्षात ठेवा. हा सण अगदी आनंदाचा असेल. या आठवड्यात तुम्ही जे काम करणार आहात त्या कामाचे नियोजन करा. कारण तुम्हाला अशी एक सवय लागलेली आहे की, नियोजन न करता काम करणे आणि त्रास करून घेणे. सध्या तसे न करता नियोजन करा. नियोजन केल्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही. इतरांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वत:च कामाला सुरुवात करा. म्हणजे त्रास होणार नाही. व्यवसायात कष्ट जरी वाढले तरी नफा चांगला राहील.

नोकरदार वर्गाला जबाबदारीने काम करावे लागेल. खर्च सांभाळा.

समाजसेवा करताना भान ठेवा. कुटुंबामध्ये असलेले मतभेद दूर करा. धार्मिक गोष्टींची आवड राहील.

आरोग्य साथ देईल.

शुभ दिनांक : २९, ३०

महिलांसाठी : गोड बोलून काम करून घ्या.

capri
मकर( २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२५ )
मकर : नियोजनाला महत्त्व द्या

दसरा भाग्योदयाचा असेल. मनासारख्या गोष्टी घडतील. दसरा तुमच्यासाठी हसरा असेल असेच म्हणावे लागेल. खरंच हा दिवस तुमच्यासाठी शुभदायक राहील. खरेदी कराल. दिनांक २९, ३० हे संपूर्ण दोन दिवस व १ तारखेला दुपारपर्यंत अशा अडीच दिवसांच्या कालावधीत शांत रहावे लागेल. कारण या दिवसांत कारण नसताना खर्च वाढू शकतो, त्यामुळे जे चालले आहे ते चांगले असे समजून पुढे चला म्हणजे नुकसान होणार नाही. प्रत्येक गोष्टीत नियोजनाला महत्त्व द्या. हे फार महत्त्वाचे राहील. वादविवाद करणे टाळा. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात गोष्टी जमेच्या ठरतील.

नोकरदार वर्गाला जबाबदारी मिळेल. आर्थिक व्यवहार जपून करा. संततीसौख्य लाभेल.

नवीन परिचयाचे नात्यात रूपांतर होईल.

जोडीदाराची साथ मिळेल.

प्रकृतीची काळजी घ्या.

शुभ दिनांक : २, ३

महिलांसाठी : ज्ञानात भर पडेल.

Aqua
कुंभ( २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२५ )
कुंभ : अंदाज वर्तवणे टाळा

दसरा शुभ कसा जाईल ते पाहा. कारण या दिवशी तुमच्या व्ययस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. शांतपणाने निर्णय घ्या आणि दसरा हा सण आनंदात साजरा करा. १ तारखेला दुपारनंतर, दिनांक २ व ३ असे अडीच दिवस फारसे अनुकूल नाहीत, त्यामुळे या दिवसांत ‘धरले तर चावते सोडले तर पळते’ अशी अवस्था होऊन बसेल. अशा वेळी एक घाव दोन तुकडे करून चालणार नाही. कामे मार्गी लागण्यासाठी कामाचा आराखडा तयार करणे गरजेचे राहील. इतरांवर अवलंबून राहू नका. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील. व्यवसायातील आडाखे तपासून पाहा. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. आर्थिक बाबतीत फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. मित्र-मैत्रिणींशी मनमोकळेपणाने बोलल्यामुळे हलके वाटेल. घरगुती वातावरण ठीक राहील. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळा. अंदाज वर्तवू नका.

शुभ दिनांक : २९, ३०

महिलांसाठी : व्यवहार करताना भान ठेवा.

pices
मीन( २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२५ )
मीन : भाग्योदय होईल

लाभस्थानातून होणारा दसरा हा तुमच्यासाठी लाभ मिळवून देणारा असेल. नक्कीच या दिवशी लाभ होईल. तुमचे स्वप्न पूर्ण होईल. हा दसरा शुभ राहील. भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. हे भ्रमण म्हणजे दुधात साखर. अतिशय शुभदायक सप्ताह राहील. मनामध्ये काही स्वप्ने होती, पण ती प्रत्यक्षात पूर्ण होत नव्हती. सध्या मात्र तुमची ही स्वप्ने पूर्ण होणार आहेत. कामकाजात येणारे अडथळे दूर होतील. अगदी कमी वेळेत काम पूर्ण होईल. कामातील उत्साह टिकून राहील. व्यवसायात प्रगती होईल. नोकरदार वर्गाला अधिकार प्राप्त होईल. आर्थिक लाभ होईल. मित्र-मैत्रिणींशी संवाद साधाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एकूण सप्ताह भाग्योदयाचा असेल. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

शुभ दिनांक : २८, ३

महिलांसाठी : दानशूर वृत्ती राहील.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या