scorecardresearch

साप्ताहिक राशिभविष्य

aries
मेष( १६ नोव्हेंबर २०२५ ते २२ नोव्हेंबर २०२५ )
मेष : धाडसी निर्णय टाळा

दिनांक २०, २१, २२ या तीन दिवसांत कोणतेही काम करताना सारासार विचार करा. म्हणजे विचार न करता निर्णय घेणे त्रासाचे राहील. रागाच्या भरात घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात. विनाकारण धाडस करू नका.

धाडसी निर्णय टाळा. इतरांच्या काही गोष्टी पटल्या नाहीत तर सोडून द्या, पण तुमचे मत दुसऱ्यावर लादू नका. सध्या कामावर लक्ष देण्याव्यतिरिक्त कोणत्याच गोष्टीला महत्त्व देऊ नका. आपण आपले प्रयत्न करत राहणे हेच उत्तम राहील. वादविवादापासून लांब राहा. अमावास्या कालावधीत शांत राहा.

व्यवसाय वाढवण्यासाठी जाहिरात माध्यमांचा वापर सध्या तरी करू नका. नोकरदार वर्गाने कामाचे नियोजन करावे. खर्च कमी कसा होईल ते पाहा. कुटुंबाची काळजी घ्या. आरोग्य जपा.

शुभ दिनांक : १८, १९

महिलांसाठी : कोणावरही अवलंबून राहू नका.

taurus
वृषभ( १६ नोव्हेंबर २०२५ ते २२ नोव्हेंबर २०२५ )
वृषभ : खर्च जपून करा

१७ तारखेला दुपारनंतर दिनांक १८ व १९ हे संपूर्ण दोन दिवस म्हणजेच अडीच दिवसांचा कालावधी चढउतारांचा राहणार आहे. या कालावधीत आपले काम बाजूलाच राहील आणि इतरांच्या कामातच गुंतून राहाल. त्यामुळे कामाचा ताण येऊ शकतो. अशा वेळी आधी आपले काम करून घ्या. मग इतरांच्या कामांमध्ये डोकावून पाहा. इतरांना सल्ला द्या, पण त्या सल्ल्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार नाहीत ना याचा विचार करा.

मागील अनुभव विसरू नका. अमावास्या कालावधी शांततेत पार पाडा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यावसायिकदृष्ट्या लाभ होईल. नोकरदार वर्गाला कामाचे स्वरूप कळेल. सार्वजनिक क्षेत्रात सहभाग राहील. खर्च जपून करा. जोडीदार मदत करेल. आरोग्याची काळजी घ्या.

शुभ दिनांक : १६, २१

महिलांसाठी : अति विचार करू नका.

gemini
मिथुन( १६ नोव्हेंबर २०२५ ते २२ नोव्हेंबर २०२५ )

दिनांक २०, २१, २२ हे संपूर्ण तीन दिवस तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ही कसरत कमी व्हावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वत:हून स्वत:त बदल करा. काही गोष्टी अशा असणार आहेत त्या तुमच्या मनाविरुद्ध असतील. हरकत नाही, सर्व दिवस सारखे नसतात हे लक्षात ठेवा. तेवढय़ा दिवसापुरता का होईना रागावर नियंत्रण ठेवायला शिका म्हणजे काही त्रास होत नाही. सध्या यश मिळाले नाही तरी पुढे जाऊन मिळणार आहे त्यामुळे प्रयत्न सोडू नका. अमावास्या कालावधीत वादविवाद टाळा. बाकी दिवस चांगले असतील.

व्यवसायात नवीन गोष्टीचा शुभारंभ करा. नोकरदार वर्गाला कामाच्या संदर्भात सकारात्मक गोष्टी ऐकायला मिळतील. आर्थिक व्यवहार जपून करा. संततीसौख्य लाभेल. घरगुती वातावरण ठीक राहील. आरोग्याची काळजी घ्या.

शुभ दिनांक : १७, १८

महिलांसाठी : कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष देऊ नका.

Cancer
कर्क( १६ नोव्हेंबर २०२५ ते २२ नोव्हेंबर २०२५ )
कर्क : प्रेरणा मिळेल

या आठवड्यात सर्व दिवस चांगले आहेत. त्यामुळे काम अगदी ठरवून ठेवल्याप्रमाणे होत राहील. बरेच दिवस झाले चांगल्या गोष्टींचा श्रीगणेशा होत नव्हता, तो आता होणार आहे. सध्या तुम्हाला इतरांच्या मदतीची गरज भासणार नाही. एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव साध्य होणार आहे. प्रयत्नांना यश मिळेल. अमावास्या कालावधीही चांगला जाईल. सध्या आपण म्हणाल ती पूर्व दिशा असल्यामुळे कामात कोणताच अडथळा येणार नाही. वरिष्ठ व्यक्तींकडून प्रेरणा मिळेल. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल.

नोकरदार वर्गाला नवीन नोकरीचे प्रस्ताव येतील. समाजमाध्यमांद्वारे प्रसिद्धी मिळेल. घरगुती वातावरण आनंदाचे असेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील शेजाऱ्यांना मदत कराल. धार्मिक कार्य पार पाडाल. आरोग्य ठणठणीत राहील.

शुभ दिनांक : १८, २१

महिलांसाठी : स्वत:साठी वेळ द्याल.

leo
सिंह( १६ नोव्हेंबर २०२५ ते २२ नोव्हेंबर २०२५ )

सिंह : अनुकूल सप्ताह

शुभ ग्रहांची साथ उत्तम आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण या आठवडय़ात कोणत्याही दिवसांत अडचणी येणार नाहीत. प्रत्येक काम वेळेत पूर्ण होईल. काही वेळेला आपले काम पूर्ण व्हावे म्हणून इतरांच्या मागे लागावे लागत होते. सध्या कोणाच्या मागे लागण्याची गरज नाही. आपले काम आपण पूर्ण करायचे हा तुमचा अट्टहास असेल आणि तो पूर्ण होईल.

चांगल्या गोष्टींसाठी प्रयत्न केले तरी यशस्वी होत नव्हते. मनासारखे काम झाल्यामुळे तुमचा आनंदही द्विगुणित होणारा असेल. अमावास्या कालावधी शुभ राहील. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न चांगले राहील. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होईल. समाजसेवेची आवड राहील. घरगुती वातावरण चांगले राहील. मानसिक समाधान लाभेल. एकूणच सप्ताह अनुकूल असेल. आरोग्य उत्तम राहील.

शुभ दिनांक : १६, १७

महिलांसाठी : इच्छापूर्ती होईल.

gemini
कन्या( १६ नोव्हेंबर २०२५ ते २२ नोव्हेंबर २०२५ )

कन्या : पारडे जड होईल

‘आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे’ या वाक्याप्रमाणे तुमचा सप्ताह असणार आहे. काय करावे काय करू नये हे सुचणार नाही. प्रत्येक गोष्टीत प्रतिष्ठा मिळणे हे भाग्याचेच लक्षण म्हणावे लागेल. सध्या तुमचे पारडे जड होईल. तुमचे मत इतरांना पटणारे असेल. तुमच्या मतांना वरिष्ठांनी प्राधान्य दिल्यामुळे उत्साह वाढेल. असे वाटेल की इतक्या दिवस धीर धरला त्याचे फळ मिळाले.

काही गोष्टी मनाविरुद्ध होत होत्या आणि त्याचा कुठेतरी मनामध्ये राग होता, पण तो राग आता दूर होणार आहे. अमावास्या कालावधी ठीक राहील. या कालावधीत कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्या. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनाल. समाजसेवा करावीशी वाटली तरी तितका वेळ मिळणार नाही. नातेवाईकांच्या शुभेच्छा मिळतील. भावंडांची भेट होईल. प्रकृती चांगली राहील.

शुभ दिनांक : १६, २१

महिलांसाठी : धाडसी निर्णय घ्याल.

libra
तूळ( १६ नोव्हेंबर २०२५ ते २२ नोव्हेंबर २०२५ )
तूळ : चढ-उतार राहील

दिनांक १६, १७ हे दोन दिवस महत्त्वाच्या कामासाठी अनुकूल नाहीत, त्यामुळे महत्त्वाचे काम पुढे ढकला. चांगल्या गोष्टींसाठी थोडा धीर धरा. घाई करू नका, नाहीतर नुकसान तुमचेच होऊ शकते. या कालावधीत चढउतार राहील हे लक्षात ठेवा. प्रत्येक कामात उशीर होणार आहे हे गृहीत धरून चाला म्हणजे त्रास होणार नाही. कोणावर अवलंबून राहिल्यास काम होणार नाही.

आपले काम आपल्यालाच करावे लागणार आहे ही खूणगाठ मनाशी बांधा. अमावास्या कालावधीत आध्यात्मिक गोष्टींत गुंतून राहिलेले चांगले. फार विचार करू नका. बाकी दिवस चांगले असतील. व्यावसायिकदृष्टय़ा परिस्थिती चांगली राहील. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा करून चालणार नाही. आर्थिक व्यवहार जपून करा. सार्वजनिक ठिकाणी भान ठेवा. कुटुंबामध्ये असलेला दुरावा तुमच्या गोड बोलण्याने दूर होऊ शकतो. प्रकृतीची काळजी घ्या.

शुभ दिनांक : १८, २१

महिलांसाठी : द्विधा अवस्थेतून बाहेर पडा.

soc
वृश्‍चिक( १६ नोव्हेंबर २०२५ ते २२ नोव्हेंबर २०२५ )
वृश्चिक : मोजकेच बोला

१७ तारखेला दुपारनंतर दिनांक १८ व १९ अशा या अडीच दिवसांत जपून पावलं टाका. या कालावधीत मोजकेच बोला, म्हणजे तुमच्या तोंडून नको ते शब्द बाहेर पडणार नाहीत. हा कालावधी म्हणजे वादळापूर्वीची शांतता आहे, त्या हिशोबाने वागायचे म्हणजे स्वत:ला त्रास होत नाही. इतरांनी काहीही करू द्या. त्यांना सल्ला द्यायला जाऊ नका. अशा कालावधीत दिलेला सल्ला आपल्यालाच त्रासदायक ठरतो.

अमावास्या कालावधीत वादविवाद टाळा. बाकी दिवस चांगले असतील. व्यावसायिकदृष्टय़ा ठरवलेले नियोजन बदलू नका. नोकरदार वर्गाला कोणतेही व्यवहार मनमर्जीने करून चालणार नाही. आर्थिक बचत करणे योग्य राहील. मित्र-मैत्रिणींच्या गप्पाटप्पांमध्ये रमून जाल. संततीचे कौतुक कराल. जोडीदाराचा पािठबा राहील. आरोग्याची काळजी घ्या.

शुभ दिनांक : १६, २१

महिलांसाठी : संयम ठेवा.

Sagi
धनु( १६ नोव्हेंबर २०२५ ते २२ नोव्हेंबर २०२५ )
धनू : विचार करून बोला

दिनांक ६, ७ हे संपूर्ण दोन दिवस, ८ तारखेला दुपापर्यंत असे हे अडीच दिवस शुभ नाहीत. त्यामुळे या अडीच दिवसांत डोक्यावर बर्फ व तोंडात खडीसाखर असे वागावे लागेल. आपल्याला नेहमी असे वाटते की इतरांनी त्यांच्या हातातले काम सोडावे आणि आपले काम करावे. पण तुम्हीही विसरून जाता की प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य असते. आपले मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका आणि कोणाशी बोलताना विचार करून बोला. म्हणजे या कालावधीत तुम्हाला त्रास होणार नाही.

सध्या तुमची वेळ चांगली नाही असे समजा. त्रिपुरारी पौर्णिमा चांगली जाईल. बाकी दिवस ठीक असतील. व्यवसायात सध्या मन लागणार नाही. नोकरदार वर्गाला कामाकडे लक्ष द्यावे लागेल. उधारी टाळा. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. आरोग्याची काळजी घ्या.

शुभ दिनांक : ४, ५

महिलांसाठी : इतरांमध्ये ढवळाढवळ करू नका.

capri
मकर( १६ नोव्हेंबर २०२५ ते २२ नोव्हेंबर २०२५ )
मकर : स्थैर्य लाभेल

भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होणारे चंद्राचे भ्रमण अतिशय लाभदायक राहील. ध्यानीमनी नसताना काही चांगले प्रस्ताव तुमच्यासमोर येतील. हे प्रस्ताव आगामी काळासाठी चांगले असतील. इतरांची अपेक्षा नसतानासुद्धा त्यांच्याकडून मदत मिळेल. आपले काम हलके होईल. सध्या कामापेक्षा मनोरंजनाकडे जास्त कल राहील. वेळेत काम पूर्ण झाल्यामुळे कोणत्याही गोष्टीची चिंता वाटणार नाही. योग्य मार्गदर्शन मिळेल. अमावास्या कालावधीही चांगला जाईल. व्यवसायात विस्कळीत झालेली घडी स्थिरस्थावर होईल. नोकरदार वर्गाला आपले मत वरिष्ठांसमोर मांडता येईल.

आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित कराल. घरगुती वातावरण आनंदी राहील. धार्मिक स्थळांना भेट द्याल. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

शुभ दिनांक : १६, २१

महिलांसाठी : चांगले अनुभव येतील.

Aqua
कुंभ( १६ नोव्हेंबर २०२५ ते २२ नोव्हेंबर २०२५ )

कुंभ : आहार सांभाळा

दिनांक १६, १७ या दोन दिवसांत कोणतेही काम करताना काळजी घ्या. कारण या दिवसांत म्हणावे असे यश मिळणार नाही. ज्या गोष्टी झेपणार नाहीत अशा गोष्टींचा नाद करू नका. आपल्याला जे जमणार आहे तेच करा म्हणजे त्रास होणार नाही. काही वेळेला नको त्या गोष्टींचा मोह निर्माण होतो. हा मोह त्रासदायक ठरणारा असेल. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नका. अमावास्या कालावधी ठीक राहील. बाकी दिवस चांगले असतील. चांगल्या दिवसांमध्ये थांबलेल्या गोष्टींना गती येईल. त्यामुळे कामातील उत्साह चांगला राहील.

व्यवसायात वाढ होईल. नोकरदार वर्गाला नवीन कामाची जबाबदारी पार पाडावी लागेल. आर्थिकबाबतीत अनपेक्षित लाभ होईल. समाजसेवेची आवड राहील. घरगुती वातावरण चांगले राहील. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.

शुभ दिनांक : १८, १९

महिलांसाठी : कोणावर अवलंबून राहू नका.

pices
मीन( १६ नोव्हेंबर २०२५ ते २२ नोव्हेंबर २०२५ )
मीन : कुटुंबाची काळजी घ्या

१७ तारखेला दुपारनंतर दिनांक १८ व १९ संपूर्ण दोन दिवस म्हणजेच अडीच दिवसांचा कालावधी काम करताना चढउताराचा राहील. तुमचे काम वेळेत पूर्ण नाही झाले तर तुमच्या रागाची तीव्रता वाढते. पण एक गोष्ट लक्षात घ्या. दिवस अनुकूल नसतात त्या वेळी या कामाला नेमका उशीर होतो. तेव्हा या दिवसांत उशीर होणार आहे हे गृहीत धरा म्हणजे त्रास होणार नाही. प्रत्येक गोष्टीत माझेच खरे करू नका. इतरांचे ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा. अमावास्या कालावधीत शांतता पाळा. बाकी दिवस ठीक राहतील.

व्यवसायाला गती येईल. नोकरदार वर्गाला नवीन कामाचा शुभारंभ करता येईल. आर्थिक व्यवहार करताना भान ठेवा. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्या. मानसिक-शारीरिक स्वास्थ्य जपा.

शुभ दिनांक : २१, २२

महिलांसाठी : स्वत:च्या हिताचा विचार करा.

डॉ. स्मिता अतुल गायकवाड

gsmita332@gmail.com

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या