How To Change A Car Battery : कोणतेही वाहन सुरू होण्यासाठी, रस्त्यावर चालण्यासाठी ‘बॅटरी’ सर्वात महत्त्वाची असते. वाहन सुरू होण्यापासून ते हेडलाईट्स आणि गाडीतील इतर यंत्रे सुरू होण्यासाठी, त्यांच्यापर्यंत वीज पोहोचवण्यासाठी गाडीमधील बॅटरी उत्तम अवस्थेत असणे आवश्यक असते. मात्र, काही कारणांमुळे वा अनेक वर्षांपासून वाहन काम करत असल्याने, गाडीतील बॅटरी बदलण्याची वेळ ही येतेच.

मात्र, अशा वेळेस विनाकारण मेकॅनिककडे जाऊन वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा तुम्ही स्वतः घरच्या घरी गाडीमधील बंद पडलेली बॅटरी बदलू शकता. हे काम ऐकण्यासाठी फार अवघड वाटत असले तरीही केवळ सहा स्टेप्समध्ये तुम्ही घरच्या घरी हे काम सहजतेने करू शकता, अशी माहिती न्यूज १८ डॉट कॉमच्या एका लेखावरून समजते

हेही वाचा : Car tips : गाडीमध्ये ‘डॅश-कॅम’ कसा लावावा? या चार सोप्या स्टेप्स करतील तुमची मदत

गाडीमधील बॅटरी बदलण्यासाठी काय करावे ते पाहा.

१. वाहनातील बॅटरी शोधणे

सर्वप्रथम गाडी सपाट पृष्ठभागावर पार्क करून घ्या. नंतर गाडी बंद करून, इंजिन थंड होऊ द्या. इंजिन गार झाल्यावर गाडीचा पुढचा भाग उघडावा.
बहुतांश गाड्यांमध्ये गाडीची बॅटरी ही इंजिन कंपार्टमेंटमध्ये बरोबर मध्यभागी किंवा चालकाच्या समोरच्या भागाकडे बोनेटखाली असतात. मात्र, काही वेळेस या बॅटरी गाडीच्या मागच्या भागाकडेदेखील बसवलेल्या असू शकतात.

२. बॅटरी टर्मिनल शोधा आणि डिस्कनेक्ट करा

बॅटरी सापडल्यानंतर, बॅटरी टर्मिनल्सचा शोध घ्या. लाल [पॉझिटिव्ह] आणि काळा [निगेटिव्ह] रंग असलेले हे टर्मिनल्स, केबल कनेक्टरसह जोडलेले असतील. पान्याचा वापर करून, प्रथम काळ्या म्हणजेच निगेटिव्ह टर्मिनल्सला सैल करून, तो डिस्कनेक्ट करा. नंतर, पॉझिटिव्ह [लाल] टर्मिनल केबल काढून टाका.
गाडीचे कोणतेही काम करताना, खासकरून बॅटरीचे काम करताना अपघात टाळण्यासाठी आवश्यक असणारे हातमोजे आणि डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल घालावे.

३. बॅटरी बाहेर काढणे

गाडीच्या बॅटरी या सामान्यपणे होल्ड-डाउन मेटल क्लॅम्पसह सुरक्षित केल्या जातात. त्यामुळे प्रथम त्यावरील नट्स किंवा बोल्ट सैल करा. नंतर काळजीपूर्वक ती बॅटरी तिच्या जागेतून बाहेर काढून घ्या. बॅटरीवर कॉस्टिक लिक्विड असते, त्यामुळे बॅटरी बाहेर काढताना ती सरळ स्थितीत राहील याची काळजी घ्यावी.

हेही वाचा : Car tips : नवीन गाडी घेतल्यावर ‘या’ चुका करू नका! वाहनाची काळजी कशी घ्यावी पाहा

४. बॅटरी आणि टर्मिनल केबल स्वच्छ करून घेणे

गाडीतून जुनी बॅटरी काढल्यानंतर, वायर ब्रश किंवा टर्मिनल क्लिनिंग टूल वापरून बॅटरी ट्रे आणि टर्मिनल कनेक्टर्स स्वच्छ करून घ्या. त्यामध्ये लागलेला गंज व्यवस्थित काढून टाका. या गोष्टींची सफाई करण्यासाठी बेकिंग सोडादेखील वापरता येऊ शकतो. कनेक्टर आणि केबल्स कुठेही जळाले किंवा खराब झाले नसल्याची खात्री करून घ्यावी.

५. नवीन बॅटरी बसवणे

सर्वात शेवटची स्टेप म्हणजे, नवीन बॅटरी गाडीत बसवणे. नवीन बॅटरी ट्रेमध्ये ठेवा आणि गाडीतील टर्मिनल, बॅटरीच्या टर्मिनलसह योग्य पद्धतीने बसले असल्याची खात्री करा. आता बॅटरी माउंटिंग शेल्फवर सुरक्षितपणे ठेवा आणि पुन्हा होल्ड-डाउन क्लॅम्प जोडून घ्या; नट-बोल्ट घट्ट बसवून घ्या. आता टर्मिनल जोडताना प्रथम पॉझिटिव्ह म्हणजे लाल रंगाचे आणि नंतर निगेटिव्ह म्हणजेच काळ्या रंगाचे टर्मिनल बॅटरीला जोडा. हवे असल्यास दोन्ही टर्मिनल्सवर बॅटरी अँटी-कोरोसिव्ह प्रोटेक्शन जेल किंवा प्रोटेक्टिव्ह फील्ड वॉशर लावून घ्यावे.

६. गाडी सुरू करून पाहणे

जुनी बॅटरी काढून नवीन बॅटरी बसवण्याची सर्व प्रक्रिया झाल्यानंतर गाडी सुरू करून पाहा. गाडीचे हेडलाईट्स आणि इतर सर्व गोष्टी व्यवस्थित चालू असल्याची खात्री करून घ्या.