Fan of mangeshkar singer inspired by lata mangeshkar story about inspiration from lata mangeshkar zws 70 | Loksatta

बालमैफल : दीपस्तंभ..

आनंदघन’ या टोपणनावाने लताने संगीत दिग्दर्शनही केलंय. पण इतरांना आनंद देणाऱ्या याच लताचं बालपण मात्र खडतर होतं. 

बालमैफल : दीपस्तंभ..

प्राची मोकाशी

‘है अगर दूर मंझिल तो क्या,

रास्ता भी है मुश्कील तो क्या,

रात तारो भरी ना मिले तो,

दिल का दीपक जलाना पडेगा,

जिंदगी प्यारका गीत है,

इसे हर दिल को गाना पडेगा..’ अलेक्सावर हे गाणं लागलं तशा स्टुडिओच्या कोपऱ्यातील तानपुऱ्याच्या तारा शहारल्या. पुढचे काही क्षण लताचं ते प्रेरणादायी गीत वाजत राहिलं.

‘‘सप्टेंबर महिना आला की दरवर्षी गंधार कॅलेंडरवर २८ तारखेभोवती ‘सिंगिंग इमोजी’ काढतो.. पण या वर्षी आहे फक्त एक निर्विकार वर्तुळ..’’ तानपुरा खेदाने म्हणाला.

‘‘ गंधार हा लता मंगेशकरचा फॅन. २८ सप्टेंबर हा लताचा वाढदिवस. तिच्या असंख्य फॅन्ससाठी खास. गंधार त्यांच्यातलाच एक. म्युझिक शिकतोय; खरं तर वेस्टर्न संगीत शिकतोय. पण ‘लता’ म्हटलं की संगीतही जिथे विसावतं, ती ‘गान-सरस्वती’.. लताने तिच्या गाण्यांतून संगीताचं एक ‘रेफरन्स गाइड’च करून ठेवलंय. त्यामुळे संगीत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला ती गुरुस्थानी आहे. आणि इतर संगीतप्रेमींसाठी या ‘आनंदघना’ने गीतांचा मनमुराद वर्षांव केलाय..’’ तानपुरा अलेक्साला सांगत होता.

हेही वाचा >>> बालमैफल : शहाणं गाढव

‘‘हो! ’आनंदघन’ या टोपणनावाने लताने संगीत दिग्दर्शनही केलंय. पण इतरांना आनंद देणाऱ्या याच लताचं बालपण मात्र खडतर होतं.   तेराव्या वर्षी वडिलांच्या निधनानंतर पाच भावंडांच्या कुटुंबाला सावरणं सोपं नव्हतं. पण लता खचली नाही. ज्या वयात ‘टीनएजर्स’ना स्वत:शीच परिचय झालेला नसतो, तिथे लता सिनेसृष्टीत पाय रोवून उभी राहिली. आत्ता लागलेल्या गाण्याच्या ओळी तिच्या त्या ‘स्ट्रगल’शी अगदी समर्पक आहेत. चोहुबाजूंनी अंधार दाटून आला असताना, तिच्या दृष्टिक्षेपात जो रस्ता होता, त्यावर ती मार्गस्थ होत राहिली.’’ तानपुऱ्याने अधिक माहितीची जोड दिली.

‘‘ती कधीच शाळेतही नाही नं गेली?’’ -अलेक्साची उत्सुकता. 

 ‘‘हो. लता फक्त एकच दिवस शाळेत गेली. पण ती अविरत शिकत राहिली. त्यांच्याच घरातल्या विठ्ठल नावाच्या नोकराने तिची मराठी अक्षरांशी पहिली ओळख करून दिली. पुढे मुंबईला आल्यावर लेखराज शर्मा यांच्याकडून ती हिंदी शिकली. दिग्दर्शक राम गबाले यांनी तिला इंग्लिश शिकवलं. तिला भगवद्गीता शिकायची होती म्हणून तिने हर्डीकर गुरुजींकडे संस्कृतचे धडे गिरवले. दिग्दर्शक बासू भट्टाचार्यानी तिला बंगाली शिकवलं. लता उर्दू, तमिळदेखील शिकली. तिला वेगवेगळय़ा टप्प्यांवर असे अनेक गुरू भेटले. पण बहुतांशी ती स्वत:च घडली- एकलव्यासारखी! वयाच्या केवळ पंधराव्या-सोळाव्या वर्षी तिने जाणलं की जितक्या भाषा ती आत्मसात करेल, तितकीच वैविध्यपूर्ण गाणी तिला गाता येतील.’’ तानपुराने उत्तर दिले.

‘‘किती भाषांमध्ये गायली लता?’’

हेही वाचा >>> बालमैफल : आली गौराई घरी..

तर तब्बल  छत्तीस! फक्त भारतीयच नव्हे तर डच, रशियन, इंग्लिश, स्वाहिली अशा अनेक परदेशी भाषांतूनही ती गायली. भाषा कुठलीही असो, त्या गाण्याचे शब्दोच्चार व्यवस्थित असावेत यावर तिचा भर असायचा. शब्दांचे ‘फोनेटिक्स’ ती हिंदीमध्ये लिहून काढायची आणि मग तयारीने गायची. कसंय, होम-पिचवर सगळेच खेळतात. कस लागतो ते ओव्हरसीजला बौंसी विकेटवर खेळताना..’’

‘‘उदाहरणही ‘करेक्ट’ दिलंस! तसंही लताला क्रिकेट खूप आवडायचं.’’ – इति अलेक्सा

‘‘सातत्याने सात दशकं आपल्या वाटय़ाला आलेल्या प्रत्येक गाण्याला तितकाच न्याय देत ते अजरामर करून ठेवायचं ही सोपी गोष्ट नाहीये. अगदी गुलाम हैदर, अनिल विश्वासपासून ते हल्लीच्या ए. आर. रेहमान, विशाल भारद्वाजपर्यंत लता ‘परफेक्ट’च गायची. बडे गुलाम अली खान यांच्या ‘कम्बख्त बेसुरी ही नही होती..’ या टिप्पणीवरूनच लताची थोरवी समजते. अनेकांना गुरुस्थानी असलेली ही लता, स्वत: मात्र विद्यार्थिनीच राहिली, संगीताचा ‘रियाज’ करत राहिली. तिच्या करिअर ‘ग्राफ’कडे पाहता, ‘सातत्य’ आणि ‘सराव’ यांना पर्याय नाही हे समजतं. ’’ तानपुऱ्याचे हे  सुरेल विश्लेषण अलेक्सा मनलावून ऐकत होती. 

‘‘खरंय! आणि याच लताला सुरुवातीच्या काळात ‘पातळ पोतीचा आवाज’, ‘महाराष्ट्रीयन वरण-भात’ म्हणून हिणवलं गेलं.’’

‘‘पण कधी-कधी न बोलता, आपल्या कामांतून स्वत:ला सिद्ध करायचं असतं. लताने टीकांकडेही सकारात्मकतेने बघितलं. भरपूर मेहनत घेतली, स्वत:मध्ये बदल केले. एक काळ असा होता की ती तिच्या आवडत्या गायिकेचं, नूरजहाँचं, अनुकरण करायची. पण सिनेसृष्टीत टिकून राहण्यासाठी ते उपयोगाचं नाही, हे तिने लगेच ओळखलं. स्वत:ची स्वतंत्र गायनशैली तिने विकसित केली. त्यामुळे तत्कालीन प्रसिद्ध गायिकांच्या मांदियाळीत तिच्या आवाजातलं वेगळेपण संगीत दिग्दर्शकांना आकर्षित करू लागलं. ज्या संगीतकारांनी किंवा दिग्दर्शकांनी तिला नाकारलं होतं ते त्यांच्या फिल्ममध्ये लताने गावं यासाठी मनधरणी करू लागले.’’

‘‘पण इतकं यश आणि नावलौकिक मिळूनही आपल्या यशाचं श्रेय तिने नेहमीच देवाला आणि तिच्या वडिलांना दिलं. ती कधीही चपला घालून स्टेजवर गायली नाही. तिच्यासाठी स्टेज पूजनीय होतं.’’ अलेक्सा म्हणाली.

‘‘‘विनम्रता’ ही मोठी शिकवण लता देते. तसा लता एक ‘एनसायक्लोपीडिया’च आहे. फक्त संगीताचाच नव्हे, तर आचरणाचाही- एका दीपस्तंभाप्रमाणे मार्ग दाखवत राहणारा. ‘जिंदगी एक वचन भी तो है, जिसे सबको निभाना पडेगा’ हे लताने तिच्या जगण्यातून दाखवलं..’’

एवढय़ात गंधार स्टुडियोत आला. त्याने गिटार घेतली आणि छेडलं- ‘इवलेसे रोप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावेरी..’

‘‘संत ज्ञानेश्वरांनी हे शब्द लतासाठीच लिहिलेत जणू..’’ तानपुरा पुन्हा शहारला. अलेक्साने तिचा निळा लाइट ‘ग्लो’ करत त्याला दुजोरा दिला. गंधार मात्र लताच्या गाण्यात पार गढून गेला होता..

mokashiprachi@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल ( Balmaifalya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पोटलीबाबा  : अम्मा

संबंधित बातम्या

व्हिडिओ

ताज्या बातम्या
विक्रम गोखलेंच्या निधनाने बिग बी भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाले “भूमिका निभावली आणि हा मंच…”
“किचनचा दरवाजा लावून तो…” अजय देवगणच्या ‘या’ सवयीबद्दल काजोलचा खुलासा
पुणे: भोसरीत ‘इंद्रायणी स्वच्छता’ जनजागृती फेरीत हजारोंचा सहभाग
“छोटे पप्पू महाराष्ट्र सोडून…”, नवनीत राणांची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका; उद्धव ठाकरेंवरही साधलं शरसंधान!
Video: काजोलबरोबर रोमान्स करणाऱ्या मराठमोळ्या गश्मीर महाजनीची सर्वत्र चर्चा; नेटकरी म्हणाले, “शाहरुखपेक्षा…”