मुंबई: भांडवली बाजारातील भीतीदायी अस्थिरता आणि निरंतर झोडपले जात असलेले मिड व स्मॉल कॅप समभागांची दीनवाणी अवस्था पाहता, गुंतवणूकदारांनी तुलनेने सुरक्षित लार्ज कॅपमध्ये गुंतवणुकीला वळवून सूज्ञतेचा उत्तम उदाहरण प्रस्तुत केल्याचे ‘ॲम्फी’च्या आकडेवारीने बुधवारी स्पष्ट केले. सरलेल्या जानेवारीमध्ये ‘गोल्ड ईटीएफ’मध्ये ३,७५१ कोटी रुपयांची मासिक गुंतवणूक झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लार्जकॅप समभागांत गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंड योजनांमधील जानेवारी २०२५ मधील ओघ ५२.३ टक्क्यांनी वाढून ३,०६३ कोटी रुपयांवर गेला. जी या योजनांमधील आजवरची दुसऱ्या क्रमांकाची विक्रमी मासिक गुंतवणूक आहे. सोन्यातील दमदार भाव तेजी पाहता, ‘गोल्ड ईटीएफ’मध्ये देखील जानेवारीमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक ३,७५१ कोटी रुपयांची मासिक गुंतवणूक झाली. तरीही जानेवारीमध्ये मिडकॅप श्रेणीमध्ये ५,१४८ कोटी रुपये, तर स्मॉलकॅप श्रेणीमध्ये ५,७२१ कोटी रुपयांचा ओघ राहिला. जो महिनागणिक कमी झाला असला तरी लार्ज कॅप फंडांमधील गुंतवणुकीच्या तुलनेत जास्तच होता, असे ‘ॲम्फी’च्या आकडेवारीने स्पष्ट केले.

समभागसंलग्न अर्थात इक्विटी म्युच्युअल फंडांमधील एकूण गुंतवणूक जानेवारीत ३.६ टक्क्यांनी घटून ३९,६८८ कोटी रुपये झाली. डिसेंबर २०२४ मध्ये इक्विटी फंडांत ४१,१५६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया अर्थात ‘ॲम्फी’ने जाहीर आकडेवारीनुसार, इक्विटी फंडात सलग ४७ व्या महिन्यांत गुंतवणूक प्रवाह राहिला आहे.

जानेवारीअखेर नियोजनबद्ध गुंतवणूक अर्थात ‘एसआयपी’च्या माध्यमातून २६,४०० कोटी रुपयांची गुंतवणूक आली, जी डिसेंबरमधील २६,४५९ कोटी रुपयांच्या योगदानापेक्षा किंचित घटली आहे. तथापि देशातील सर्व म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील ‘एसआयपी’ मालमत्ता १३.२ लाख कोटी रुपयांवर गेली आहे, जी एकूण गुंतवणूक मालमत्तेच्या पाचवा हिस्सा (एक-पंचमांश) इतकी आहे.

भांडवली बाजाराची मंदावलेली कामगिरी आणि प्रचंड अस्थिरता असतानाही ‘एसआयपी’ योगदान जवळपास स्थिर राहिले आहे. दीर्घकालीन दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करून शिस्तबद्ध गुंतवणूक सुरू ठेवली जावी इतकी सूज्ञता गुंतवणूकदारांनी निश्चित मिळविली आहे.

वेंकट चालसानी, मुख्य कार्यकारी अधिकारी, ॲम्फी

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Large cap mutual fund investors january month gold etf record break investment january month print eco news css