Tips For UPSC Exam Interview : यूपीएससी (UPSC ) किंवा संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. कारण या परीक्षा आयएएस, आयपीएस आणि आयएफएससारख्या पदांवर उमेदवारांची भरती करण्यासाठी घेतल्या जातात. या परीक्षेत तीन टप्पे असतात – पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. शेवटचा टप्पा म्हणजे मुलाखत, ज्याला व्यक्तिमत्व चाचणीदेखील म्हटले जाते. तर या चाचणीचे उद्दिष्ट उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास, विचारांची स्पष्टता आणि लगेच निर्णय घेण्याची क्षमता यांचे मूल्यांकन करणे असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यूपीएससी (UPSC) परीक्षा २०२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी उमेदवारांनी पुढील पाच टिप्स लक्षात ठेवल्या पाहिजेत…

१. तुमच्या अर्जाच्या फॉर्मची उजळणी करा : तुमच्या अर्जाचा फॉर्म नीट वाचून आणि समजून घ्या. यावरून मुलाखत घेणारा तुम्हाला अनेक प्रश्न विचारू शकतो. तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि कामाच्या अनुभवापासून ते छंद, तुम्हाला कशात यश मिळाले आहे, आवडी, पर्यायी विषयांपर्यंत तुम्ही अर्जामध्ये जोडलेल्या प्रत्येक माहितीची उत्तम प्रकारे उजळणी करून घ्या.

उदाहरण : तुम्ही ‘पुस्तक वाचणे’ हा छंद फॉर्ममध्ये लिहिला असेल तर मुलाखत घेणारे तुमचे आवडते पुस्तक कोणते, तुम्ही वाचलेल्या शेवटच्या पुस्तकाचे किंवा लेखकाचे नाव आणि त्यातून तुम्हाला मिळालेला धडा याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जातील. अशा प्रश्नांवर आत्मविश्वासाने चर्चा करण्याची तयारी ठेवा.

२. चालू घडामोडींबाबत अपडेट रहा : यूपीएससी (UPSC) परीक्षेच्या सर्व टप्प्यांसाठी चालू घडामोडींबाबत प्रत्येक गोष्ट माहिती असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी, तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या ॲक्टिव्हीटी तुम्हाला माहिती असणे तुमची जागरूकता दर्शवते. म्हणूनच मुलाखतीदरम्यान चालू घडामोडींच्या प्रश्नांना सहजतेने उत्तर देण्यासाठी नियमितपणे वर्तमानपत्रे वाचा, दूरदर्शनवरील बातम्या आणि विश्वासार्ह मासिके वाचा. याबरोबरच तुम्ही ॲप्स डाउनलोड करू शकता, जे तुम्हाला बातम्यांच्या अपडेटसाठी अलर्ट पाठवतात. हे तुम्हाला राज्य आणि केंद्राची धोरणे, प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांसारख्या क्षेत्रांबद्दल माहिती मिळविण्यात मदत करतात.

३. परिस्थितीजन्य प्रश्नांची तयारी करा : प्रश्नांव्यतिरिक्त मुलाखत घेताना अनेकदा परिस्थितीजन्य आणि काल्पनिक प्रश्न विचारले जातात आणि वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये तुमच्या एथिकल ग्राउंडिंगचे आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेचे विश्लेषण केले जाते. तर तुम्ही त्यामधून कसा निर्णय घ्याल किंवा मार्ग काढाल? अशा अनेक प्रश्नांचा सराव करा. तुमची समस्या सोडवण्याची कौशल्ये दाखवण्यासाठी व्यवस्थित प्रतिसाद द्या.

४. मॉक इंटरव्ह्यूचा सराव करा : प्रिलिम्स आणि मेनसाठी मॉक टेस्ट सीरिजचा सराव करण्याबरोबरच, तुम्ही यूपीएससी परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचण्यासाठी मॉक इंटरव्ह्यूमध्ये सहभागी होऊ शकता. अनेक कोचिंग संस्था उमेदवारांच्या तयारीसाठी मॉक इंटरव्ह्यू आयोजित करतात, त्यामुळे या संधीचा फायदा घ्या. आवश्यकतेनुसार तुमची देहबोली समायोजित करण्यासाठी आणि मुलाखत नंतर पाहण्यासाठी या मॉक सेटअपमध्ये नेहमी स्वतःला रेकॉर्ड करून ठेवा.

५. सकारात्मक देहबोली राखा (body language) : संपूर्ण मुलाखतीदरम्यान तुमची देहबोली तपासली जाईल, कारण ती तुमच्या एकंदर व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही सांगून जाते. तुम्ही जेव्हा मुलाखत देण्यासाठी खोलीत प्रवेश करता, तेव्हा मुलाखत घेणारे तुमच्या वर्तनाचे मूल्यांकन करण्यास सुरुवात करतील. ज्यात तुम्ही कपडे कसे घातले आहेत, तुम्ही कसे संवाद साधता हे पाहिले जाते. त्याचबरोबर मुलाखत घेणाऱ्यांशी डोळ्यांचा संपर्क कायम ठेवा, त्यांच्याशी आनंदाने संवाद साधा आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी ताठ बसा. तुम्ही घाबरले आहात अशी कोणतीही चिन्हे दाखविणे टाळा. आत्मविश्वासाने हँडशेक आणि चेहऱ्यावरील हसू सकारात्मक आणि दीर्घकाळ टिकणारी छाप सोडण्यात मदत करू शकते.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc exam interview 2025 check out these five tips that you must keep in mind asp