|| अमर हबीब

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्त्री-पुरुष समानता हा पहिला टप्पा आहे पण त्याही पुढे जायची गरज आहे. अनेक चळवळी अजूनही याच टप्प्यावर घिरटय़ा घालीत आहेत. स्त्रीची अनेक उपजत सामथ्र्ये या लुटीच्या व्यवस्थेने मारली आहेत. लुटीचा काळ आणि प्रभाव एवढा मोठा आणि भीषण आहे की त्यात ती लुप्त झाली. दिसेनाशी झाली. नष्ट झाली नाहीत. पुरुषांना स्त्रियांची सामथ्र्य स्थळे न दिसणे आपण समजू शकतो, पण स्त्रियांनाही त्यांचा विसर पडला. हे अद्भुत घडले.

एक काळ असा होता की, तुम्ही घरच्या खिडक्या दरवाजे बंद केले की जगाचे वारे घरात शिरू शकत नव्हते, पण आता तसे राहिले नाही. तुम्ही कितीही कडेकोट बंदोबस्त केला तरी जगाचे वारे कोठून ना कोठून तुमच्या घरात शिरतेच. तुमच्या इच्छे- अनिच्छेला विचारात न घेता हा महापूर तुम्हाला भिजवून चिंब करतो. ऐंशी-नव्वदच्या दशकापासून हा झंजावात भारतात आला. बाकी त्याने कोणाचे काय झाले कोणास ठाऊक, पण स्त्रियांच्या पंखांना त्यातून बळ मिळाले यात वाद नाही.

एके काळी मुलींच्या शाळेत जाण्यावरच बंदी होती. बाईच्या जातीने शिकून काय करायचे? तिने चूल आणि मूल सांभाळायचे असते, असे म्हटले जायचे. माझ्या मुलीला मराठी शाळेत घालावे का उर्दू शाळेत असा निर्णय करायचा होता तेव्हा एका नेत्याने मला सांगितले होते की, ‘‘टाकायचेच असेल तर उर्दू माध्यमात टाक. कारण मुलगी संस्कृतीची वाहक असते. लग्न करून नवऱ्याच्या घरी जाईल.’’ वगरे.. मी त्यांचा सल्ला ऐकला नाही. याचे मला आज समाधान वाटते.

तो काळ आता राहिलेला नाही. मुली शिकू लागल्या आहेत. नोकऱ्या करू लागल्या आहेत. गावोगावीच्या शाळांत पाहिले तर, वर्गात मुलींची संख्या जास्त आणि मुलांची संख्या कमी दिसते. पण महाविद्यालयात अजून ते चित्र पुरते बदलले नाही. पण तेही हळूहळू बदलू लागले आहे. एका गावातील एका बापाची गोष्ट मोठी बोलकी आहे. ती मुलगी चौथीत होती. ती एका मुलाशी बोलली म्हणून तिच्या बापाने तिला बेदम मार दिला होता. गावभर त्या बापाचे कौतुक झाले होते. मुलीच्या पाठी-िपढऱ्यांवर वळ उमटले होते. आठ दिवस ती शाळेत जाऊ शकली नव्हती. मुलीला शिक्षणाची ओढ. ती गुमान शिकत राहिली. बारावीत चांगले गुण मिळाले. इंजिनीअिरगसाठी पुण्यात नंबर लागला तेव्हा तोच बाप तिला पुण्याला घेऊन गेला. फ्लॅटवर राहून तिने तिचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण-बंदीपासून आपण एकटय़ा मुली शहरात शिकायला राहू लागल्या आहेत इथपर्यंत आलो आहोत.

माझ्या पत्नीकडे जेव्हा पहिला मोबाइल आला तेव्हा तिने मोठय़ा कौतुकाने तिच्या मत्रिणीला तो दाखवला. ती म्हणाली, ‘‘अगं बाई, तुला गं कशाला लागतो मोबाइल?’’ ही म्हणाली, ‘‘हा पण (म्हणजे मी) बाहेर असतो अन् मुलीशीही बोलावे लागतंना गं.’’ त्या काळात आमची मुलगी शहरात शिकायला होती. मत्रिणीने डोळे विस्फारले. भुवया उंचावल्या अन् म्हणाली, ‘‘अगं बाई, मुलीला पण मोबाइल दिला की काय? तुमचं आपलं जगावेगळंच असतं.’’ आपण कोणता अपराध केला हे न कळाल्याने ही म्हणाली, ‘‘त्यात काय?’’ त्यानंतर मत्रिणीने दीर्घ प्रवचन दिले. मुलींना मोबाइल दिल्याने काय उत्पात होतात, ते सगळे तिने सांगितले. काही काळ गेल्यानंतर मला त्या मत्रिणीच्या पतीकडे कामासाठी जावे लागले. मी त्याच्या लॅण्डलाइनवर फोन केला. त्या मत्रिणीनेच उचलला. मित्र घरी नव्हता. त्यांनी त्याचा मोबाइल नंबर दिला अन् म्हणाली, ‘‘मुलगी आणि ते आत्ताच बाहेर गेले आहेत.’’ मी मित्राला फोन केला तर तो म्हणाला, ‘‘ती फाइल आमच्या स्कूटरच्या डिक्कीत आहे. तू माझ्या मुलीला कॉल करून विचारून घे.’’ आता यांच्या मुलीला कसा कॉल करायचा असा विचार करीत असतानाच माझा मित्र म्हणाला, ‘‘तुझ्याकडे तिचा नंबर आहे का?’’ त्याने तो दिला. मी बोललो. तेव्हा मला प्रश्न पडला की, अरे, हिच्याकडे मोबाइल कसा काय? माझ्या मुलीकडे आहे म्हटल्यावर अख्खी संस्कृती बुडायला लागली होती. मग माझ्या लक्षात आले की बदलांचा वेग इतका मोठा आहे की, तो तुम्हाला काय वाटते याचा विचार करीत नाही. या बदलांनीच तर मुलींना आकाश कवेत घेण्याचे बळ दिले आहे.

आता हेच पाहा ना. एका बाईंचे यजमान वारलेले. एकुलता एक मुलगा. तो कामासाठी शहरात गेला. तिकडे त्याने दुसऱ्या जातीतील मुलीशी लग्न केले. हिला समजले तेव्हा ती दुखावली.. कोणालाच भेटू नये, कोणाशीच बोलू नये असे तिला झाले होते. अशा दु:खाच्या जखमेला काळ हाच एकमेव ‘विलाज’ असतो. काही काळ गेला. तीव्रता कमी झाली. तिने मनाची समजूत घातली. मुलाचे सुख ते आपले सुख. जातीबाहेरची असली म्हणून काय झाले, आपल्याच धर्माची आहे ना. दुसऱ्या धर्माची आणली नाही ना. तिचे दु:ख हलके झाल्यावर ती मत्रिणींना भेटू लागली. दिवाळी जवळ आली तेव्हा तिनेच मुलाला निरोप दिला की, ‘‘पहिली दिवाळी आहे. तुम्ही दोघे गावाकडे या.’’ मुलाला आनंद झाला. तो हो म्हणाला. हिला वाटले की नवे जोडपे येणार आहे. आपण त्यांचे कोडकौतुक करू. त्याचबरोबर तिला वाटले जोडप्याला मत्रिणीकडे घेऊन जावे. तिने मत्रिणीला तसे विचारले. ती फणकारत म्हणाली, ‘‘ए बाई, आमच्याकडे आणू नकोस. मीही लेकरा-बाळांची आई आहे. त्यांचे अजून सगळं व्हायचंय. अशा जोडप्यांचं कौतुक पाहिले तर तीही बिघडायची.’’ हिला हे सगळे अनपेक्षित होते. धक्का बसल्यागत झाले. तिने डोळ्याला पदर लावला अन् थेट आमच्याकडे आली. आधी रडून ती मोकळी झाली. मी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. म्हटलं, ‘‘जाऊ दे ना. आपलं लेकरू आपल्याकडे येतेय. आपण करू ते कौतुक खरे.’’ वगरे.

एके दिवशी हमसून रडणारी ती बाई काही वर्षांनी आमच्याकडे आली. तिने सांगितले की, वर्षभरापूर्वी तिच्या मत्रिणीचा मुलगा शहरात गेला होता. त्याला बरी नोकरी मिळाली होती. मत्रीण खूष होती. आणि एके दिवशी तिच्या मुलाने लग्न केल्याची बातमी आली. चौकशी केल्यावर कळले की त्या मुलानेही दुसऱ्या जातीच्या मुलीशी लग्न केले होते. म्हणजे बदलांपासून जरी लपायचे म्हटले तरी बदलांचे वादळ तुमच्या घरात येणारच नाही असे होणार नाही.

स्त्रियांवर आजही अन्याय होतो. अत्याचार होतात हे खरेच आहे. हजारो वर्षांनंतर व्यवस्थेला बारीकशी चीर पडलीय. त्यातून काही स्त्रिया बाहेर पडत आहेत. स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेऊ लागल्या आहेत. या गोष्टी मान्य नसलेले किंवा वखवखलेले काही मारेकरी रस्त्यात दबा धरून बसलेले आहेत. त्यांच्या हातातील तलवारी मुलींचे पंख कापायला अधीर झाल्या आहेत. असे काही घडले तर काही ‘थोर महिला’ त्या अत्याचारग्रस्त मुलीलाच दोष देतात. ती तशीच होती. तिच्या तशा वागण्यामुळेच असे झाले वगरे. बळी गेलेल्याला दोष देण्याची ही खोड सर्वत्र आढळते. शेतकऱ्याने आत्महत्या केली की म्हणणार, तो दारू पीत होता. पीत नसेल तर म्हणणार त्याचे कोण्या बाईशी लफडे असणार. म्हटले की, नाही हो तसे काही नव्हते. तर शेवटी बायको नीट नसेल असा निष्कर्ष काढून मोकळे होणार.. जो दुबळा घटक प्रतिवाद करू शकत नाही त्यावर आरोप करणे सर्वात सोपे असते. याच सोप्या मार्गाचा वापर अनेक ‘थोर’ लोक करीत असतात. हा संक्रमण काळ आहे. हळूहळू स्त्रियांच्या स्वातंत्र्याला लोक रुळू लागतील.

स्त्री प्रश्नाकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन प्रचलित आहेत. पहिला करुणेचा असतो. सामान्यपणे स्त्रियांची बाजू घेणारे पुरुष स्त्रियांच्या परिस्थितीकडे करुणेच्या नजरेने पाहतात. दुसरा दृष्टिकोन पुरुष जातीकडे तुच्छतेने पाहणारा असतो. त्यांना वाटते की, सगळे पुरुष सारखेच खलनायक आहेत.. दुसऱ्या भागाचे उत्तर फार वर्षांपूर्वी ताराबाई शिंदे यांनी त्याच्या ‘स्त्री-पुरुष तुलना’ या पुस्तकात दिले आहे. पण पहिल्या भागाचे काय? सुरुवातीला मीही पहिल्या गटात मोडणारा होतो. पण एकदा चेतना गाला (संघर्ष वाहिनीत असताना) म्हणाली, ‘‘चल, आपण स्त्रियांच्या बलस्थानांची यादी करू.’’ आम्ही यादी करायला बसलो आणि स्त्री प्रश्नाकडे पाहण्याची एक नवीच खिडकी उघडली. स्त्रियांकडे अशी बलस्थाने आढळून आली जी पुरुषांकडे अजिबात नाहीत. अपत्य जनन हे वेगळेपण सर्वाना माहीत आहे, पण त्याशिवायही अनेक बाबी केवळ स्त्रियाकडे आहेत. उदाहरणार्थ अष्टावधान, उजव्या आणि डाव्या हातातील शक्ती, इत्यादी. स्त्रियांच्या वेगळेपणाबद्दल अलीकडे विदेशात बराच अभ्यास होतो आहे. आपल्याकडे होत असेल तर मला माहीत नाही. या अभ्यासातून अनेक बाबी पुढे येत आहेत. स्त्रियांवर अत्याचार होणे ही पराकोटीची वाईट घटना असते तिची चर्चा होते. ते ठीक आहे. पण स्त्रियांची म्हणून जी बलस्थाने आहेत ती आपण मारली आहेत याची चर्चा होताना फारशी दिसत नाही.

स्त्री-पुरुष समानता हा पहिला टप्पा आहे पण त्याही पुढे जायची गरज आहे. अनेक चळवळी अजूनही याच टप्प्यावर घिरटय़ा घालीत आहेत. स्त्रीची अनेक उपजत सामथ्य्रे या लुटीच्या व्यवस्थेने मारली आहेत. लुटीचा काळ आणि प्रभाव एवढा मोठा आणि भीषण आहे की त्यात ती लुप्त झाली. दिसेनाशी झाली. नष्ट झाली नाहीत. पुरुषांना स्त्रियांची सामथ्र्य स्थळे न दिसणे आपण समजू शकतो पण स्त्रियांनाही त्यांचा विसर पडला. हे अद्भुत घडले.

नव्या तंत्रज्ञानामुळे स्त्रीच्या काही बलस्थानांना वाव मिळू लागला आहे. सगळी बलस्थाने हळूहळू उजागर होतील. तिचा वापर करता येईल यासाठी सर्जकांच्या लुटीवर उभी असलेली व्यवस्था उद्ध्वस्त करावी लागेल.

(समाप्त)

habib.amar@gmail.com

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व कार्यकर्त्यांच्या नजरेतून बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Articles in marathi on women empowerment