२७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या  ‘रजस्वला स्त्रीचा देवधर्म’ या शीर्षकांतर्गत ज्योर्तिभास्कर जयंत साळगावकर,डॉ.किशोर अतनूरकर आणि डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या लेखांना वाचकांचा मार्मिक प्रतिसाद मिळाला. आक्रस्ताळेपणे टीका करण्यापेक्षा वाचकांनी यावर संयमित प्रतिसाद देत अत्यंत महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आहे. रजस्वलेच्या शारीरिक अवस्थेपेक्षा शुद्ध आचरण व सात्वीक भाव यांना अधिक महत्त्व असावे, असं मत काहींनी मांडलं तर काहींच्या मते, अवस्था कुठलीही असली तरी तिच्या देवधर्मावर आडकाठी कशासाठी हवी. मासिकपाळीशी निगडीत ऋतुचक्र विचारात घ्यायला हवे अशी प्रांजळ भूमिका घेत  स्त्रियांनीही याबाबत कोणतीही अपराधीपणाची भावना मनात आणू नये व सर्व प्रकारच्या गंडातून स्वतची मुक्तता करून घ्यावी, हा मुख्य संदेश देण्याचा प्रयत्न या पत्रांतून व्यक्त झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्त्रीचा देवधर्म पवित्रच!
‘रजस्वला असताना देवधर्म वज्र्य’ असे कोणत्याही वेदान्त वा मूळ शास्त्रांमध्ये सांगितले गेले नसावे, तर ती संकल्पना एक रूढी म्हणूनच पाळली जात असावी. ज्याप्रमाणे सतीची चाल, विधवांचे केशवपन इत्यादी रीती पाळल्या जात होत्या. त्यामागे असलेले शारीरिक स्वच्छतेचे कारण हे पटण्यासारखे आहे. त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळी स्त्रियांना अंगमेहनतीची कामे बऱ्याच प्रमाणात करावी लागत असत. उदा. विहिरीतून पाणी काढणे, दळण-कांडण, मसाला वाटणे, धुणी धुणे इ. आजच्या यंत्रयुगात अशी कामे स्त्रियांना करावी लागत नाहीत. त्यामुळे कमजोर झालेल्या स्त्रियांसाठी घालून दिलेले तीन दिवसांचे बंधन त्यांच्या हिताचे वाटते, पण देवपूजा वा तत्सम कार्यासाठी आडकाठी का, याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही.
पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा असलेल्या समाजजीवनाचे हे एक अंग होते. ज्यायोगे कमकुवत, शोषित व देवभोळ्या असणाऱ्या तत्कालीन स्त्रियांना ‘देवाचा धाक’ दाखवून त्यांच्यावरील पुरुष वर्चस्व अधिक दृढ केले गेले? अन्यथा गार्गेयी, मैत्रेयी यांसारख्या ऋषितुल्य विदुषींनी वेदांमधील ऋचा रचल्या असताना त्याचे पठण करण्याचा अधिकार स्त्रीपासून का हिरावून घेतला असावा?
हा देहधर्म स्त्रिला निसर्गानेच बहाल केला आहे. मग त्याची रचना अपवित्र कशी? तसेच सर्व विश्व व्यापून जो दशांगुळे उरला आहे त्या परमपित्याला एक य:कश्चित रजस्वला स्त्री अपवित्र कशी करू शकेल? याउप्पर सांगायचे झाले तर परमेश्वर स्वत:च जर रजस्वलेला अपवित्र मानत आला असता तर महाभारतात भर सभेत रजस्वला असलेल्या द्रौपदीच्या वस्त्रहरणप्रसंगी केवळ तिचा आर्त धावा ऐकून तो जगद्गुरू श्रीकृष्ण वस्त्ररूपाने तिच्या मदतीला का आला असता?
देहाने अपवित्र म्हणून देवधर्म तिला निषिद्ध केला गेला, पण जी व्यक्ती अपवित्र मनाने, आचरणाने, चोरी वगैरे उद्देश घेऊन देवळात दर्शनास जाते किंवा इतर कपट-कारस्थाने योजून जाते अशा व्यक्तीचे काय? अशा व्यक्तीपेक्षा ‘रजस्वला स्त्री’ जी महन्मंगल अशा मातृत्वाच्या प्रक्रियेचा एक भाग आहे, ती पूर्ण शुद्ध मनाने, आचरणाने त्या ईश्वराचे मुखदर्शन का करू शकत नाही?  खरा प्रश्न आहे तो आजच्या युगातील स्त्रियांनी ही रूढी जपावी की नाही हा. यावर माझे मत असे आहे की, ज्या स्त्रिया मुळात नास्तिकच आहेत, त्यांच्या बाबतीत हा प्रश्नच उद्भवत नाही, कारण अशा स्त्रिया देवपूजा व तत्सम बाबींच्या वाऱ्यालाही उभ्या राहत नाहीत. मात्र ज्या स्त्रिया श्रद्धावान आहेत त्यांनी आपल्या इष्ट देवतेवर/ सद्गुरूंवर प्रथम मनापासून प्रेम करण्यास सुरुवात करावी, कारण असे लाभेवीण प्रेम हाच भक्तीचा गाभा होय. अशा प्रेमामुळे त्या देवाबद्दल आदरयुक्त धाक नक्की वाटेल, पण त्याची भीती अजिबात वाटणार नाही. स्त्रियांनी ‘मी रजस्वलावस्थेत माझ्या देवाची पूजा केली, नैवेद्य अर्पण केला तर तो कोपेल, मला पाप लागेल,’ या धास्तीला मनात थाराही देऊ नये, कारण देवाला नैवेद्य आवडतो तो आपल्या भावभक्तीचा व लाभेवीण त्याच्यावर केलेल्या प्रेमाचा. मग तो रजस्वलेच्या हातचा असू दे, की इतर कुणाच्या. देवाला काहीही फरक पडत नाही. आपल्या पवित्र मन, बुद्धी व आचरणालाच तो झुकते माप देत आला आहे, आपल्या सो कॉल्ड अपवित्र शरीराला नाही. म्हणूनच ज्याप्रमाणे आपल्या आईला रजस्वला असतानाही भेटायला, मिठी मारायला आपण जराही कचरत नाही. त्याप्रमाणे या जगन्माऊलीला भेटण्यासही न कचरता जावे.
– कांचन देशमुख, कुर्ला

ही ‘स्थिती’ अपवित्र कशी?
शनिवार, दि. २७/१०/१२ च्या ‘चतुरंग’मधील डॉ. किशोर अतनूरकर आणि जयंत साळगावकर यांचे लेख वाचले. अत्यंत नाजूक अशा विषयाला खंबीर सुरुवात केल्याबद्दल दोन्ही (पुरुष) लेखकांचे सर्वप्रथम अभिनंदन!
‘मासिक पाळी’ किंवा ‘रजस्वला’ मुळात या दोन्ही संज्ञा स्त्रीच्या मातृत्वाशी संबंधित आहेत. ज्या गोष्टीच्या आधारे तिला मातृत्व प्रदान होते त्याच्याशी संबंधित अशा शारीरिक स्थितीकडे अतिशय स्पष्टपणे स्त्रीने व समाजाने बघायला हवं. कारण साक्षात परमेश्वराने जेव्हा मानवाच्या रूपात अवतार धारण केले, मग ते देवकीच्या पोटी ‘श्रीकृष्ण’ असो वा कौसल्येच्या पोटी ‘श्रीराम’ असो, त्यांना जन्म घेण्यासाठी आईच्या गर्भाशयाची (कूस) गरज ही भासलीच! मग जी ‘स्थिती’ सृजनाशी, नवनिर्माणाशी, मातृत्वाशी संबंधित आहे ती ‘अपवित्र’ कशी काय असू शकते?
काळानुरूप या अशा विचारांची रुजुवात होणेसुद्धा खूप गरजेचे आहे असे मला वाटते. आणि जे धार्मिक ग्रंथाचा आधार देतात त्यांनी हे जाणले पाहिजे की, हे ग्रंथ मानवानेच लिहिलेले आहेत! कदाचित त्या काळात स्त्रियांना आराम मिळण्यासाठी त्याची गरज भासली असेलही. पण आज काळ बदललेला आहे, या नियमातही बदल झाले पाहिजेत.
आणखी एक, जर स्त्री वेगळी बसली तरी तिच्या मनात देवाबद्दलचे विचार कधीतरी येतच असतीलच ना? आणि ती ज्या ठिकाणी बसली तिथेही तर सर्वव्यापी, चराचरात वास करणारा परमेश्वर तर असेलच! त्याचे काय?
– डिम्पल मापारी, अकोला</strong>

उच्चनीचतेच्या मूल्य व्यवस्थेची चिकित्सा हवी
स्त्रियांच्या मासिक पाळीच्या संबंधातील पारंपरिक धार्मिक र्निबध, रूढी व अंधश्रद्धा या प्रश्नामागे जो सामाजिक शोषण व्यवस्थेचा व स्त्रियांवरील दडपशाहीचा इतिहास आहे तो लक्षात न घेतल्यामुळे कोटय़वधी निरक्षर व अज्ञानी महिलांचे जे नुकसान झाले त्याचे भान चतुरंगने ‘रजस्वला स्त्रिचा देवधर्म’ या निमित्ताने घेतलेल्या लेखांमध्ये दिसत नाही.
आपल्या देशात असणाऱ्या मासिक पाळीच्या बाबतीतील कडक, अशास्त्रीय व आरोग्य विघातक र्निबधांचा थेट संबंध ‘योनिशुचितेच्या’ संकल्पनेशी आहे. जन्मजात उच्चनीचतेवर आधारित चातुर्वण्र्य व्यवस्था टिकविण्यासाठी स्त्रियांच्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवण्याच्या व्यवस्थेचा भाग म्हणून पाळीसंबंधीच्या दडपशाहीच्या रूढी आहेत. या व्यवस्थेनुसार ‘ऋतुस्राव’ ही एखाद्या स्त्रीच्या देहधर्मातील वैयक्तिक बाब नसून त्यावर सार्वजनिक पहारा आहे. मुलगी कधी ऋतुमती होते आणि त्यानंतर दर महिन्याला तिला होणारा ऋतुस्राव याची माहिती कुटुंब, जाती बांधव व एकूण समाजाला पोचविण्याची व्यवस्था त्यामध्ये आहे. स्त्रियांची ‘योनिशुद्धी’ आत्यंतिक महत्त्वाची असल्यामुळेच ती ‘ऋतुमती’ होण्यापूर्वीच विवाह (बालविवाह) झाला पाहिजे, असा आग्रह चातुर्वण्र्यातील स्वत:ला श्रेष्ठ व शुद्ध समजणाऱ्या ब्राह्मणाचा होता व ती विवाहानंतर ‘ऋतुमती’ झाली हे समाजाला कळवण्यासाठी पहिल्या पाळीच्या वेळी ‘गर्भादान’ विधी केला जात असे (एरवी लैंगिक विषय किंवा जननेंद्रियांचे आरोग्य इ. विषयाबाबत कडेकोट गुप्तता आहे) स्त्रियांनी ही व्यवस्था बिनबोभाट पाळावी, त्याच्या विरोधात जाऊ नये यासाठी त्याला पापपुण्य आणि पावित्र्याच्या कल्पना जोडून एक दहशत पसरविण्याचे काम पोथ्यापुराणांनी केले. ‘मंत्रोच्चाराच्या ध्वनिलहरी’ व ‘रजस्वला स्त्रियांच्या शरीरातील लहरी’ वगैरे भाकडकथा सत्य लपविण्यासाठी आहेत.
स्त्रियांनी आरोग्याला अपायकारक अशी हार्मोनल औषधे घेऊ नयेत, असेतज्ज्ञांनी परोपरीने सांगितले तरी त्याचे सेवन शिकलेल्या मुली व डॉक्टर स्त्रियाही करतात. यावरून रूढी व अंधश्रद्धांचा पगडा किती जबरदस्त असतो हेच स्पष्ट होते. मुळात या रूढींचा पगडा दूर करायचा तर ऋतुस्रावाला ‘विटाळ’ ठरविणाऱ्या व पावित्र्याच्या कल्पना त्याच्याशी जोडणाऱ्या जन्मजात उच्चनीचतेच्या मूल्य व्यवस्थेची परखड चिकित्सा केली पाहिजे. ‘स्वच्छतेसाठी व स्त्रियांना विश्रांती देण्यासाठी बाजूला बसण्याची व्यवस्था असावी’ अशा प्रकारची विधाने हा तद्दन खोटेपणा व मुद्दय़ाला बगल देण्याचा प्रयत्न आहे. सोवळेओवळे, पावित्र्य व शुद्धीच्या ब्राह्मणी धर्माने लादलेल्या संकल्पनांना ‘स्वच्छतेचा आग्रह’ असे समजणे हा दांभिकपणा आहे. बीजशुद्धीच्या तद्दन खोटय़ा संकल्पनांद्वारे बहुजनांना निकृष्ट व कनिष्ठ ठरविण्यासाठीच्या व्यवस्थेतील ही स्त्रियांना ऋतुकाळात अस्पर्श व अपवित्र ठरवून दडपणारी जुलमी रूढी आहे.
– रेखा ठाकूर, मुलुंड

नाम घ्यावे केव्हाही!
स्त्रीच्या या मासिक पाळीतील पावित्र्य/ अपावित्र्या बद्दलचे श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे विचार देत आहे. ग्रंथाचे नाव – ‘सहज बोलणे हितउपदेश’, संग्राहक- गोखले गो. सी. हे संवादांचे संकलन आहे.‘कोणत्याही अवस्थेत नाम घ्यावे’
श्रीमहाराज एकदा यज्ञेश्वर तबीब यांच्याकडे हुबळीला आले होते. अनेकजण श्रींना भेटून नमस्कार करून बोलत होते. तबीब यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांना शिवायचे नसल्याने बाहेरच्या कट्टय़ावर बसून राहिल्या. ‘श्री’ घरी येऊनही काही करता येत नाही म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी आले. इकडे महाराज ‘घरातली मुख्य स्त्री कुठे आहे? तिला बोलवा’ असे म्हणाले. तेव्हा शेजारीच उभे असलेले गोपाळस्वामी म्हणाले, ‘त्या बाहेरच्या आहेत. येथे येऊ शकणार नाहीत’ त्यावर श्री म्हणाले, ‘ही सतरंजी दुमडून घ्या, तिला येथे बसू दे.’ त्याप्रमाणे बाईंना बोलावण्यात आले. बाई आल्या व अवघडून बसल्या. नमस्कार करावा की न करावा हे समजेना. त्यावर श्री म्हणाले, ‘घरात एवढा सोहळा चालू असता आनंद वाटावा की दु:ख वाटून डोळ्यात पाणी यावे?’ तेव्हा बाई म्हणाल्या, ‘आमच्या घरी येऊन मला दर्शन घेता येत नाही, नमस्कार करता येत नाही म्हणून वाईट वाटून डोळ्यात पाणी आले.’ त्यावर श्री म्हणाले, ‘तुम्ही कोणत्याही अवस्थेत असला तरी देवाला नमस्कार करायला, नामस्मरण करायला, संतांचे ग्रंथ वाचायला काहीही हरकत नाही.’ त्यानंतर बाईंनी डोके टेकून नमस्कार केला, श्रींनी आशीर्वाद दिला व अत्यंत समाधान होऊन बाई तेथून उठल्या.
– वासंती सिधये, पुणे

स्त्री मनातील द्वंद्व थांबणार का?
‘रजस्वला’ स्त्रीच्या देवधर्माबाबत माझ्या मनात निर्माण झालेले प्रश्न- ती स्त्री या दिवसांत कामावर जाते. कुठलेही काम असो- कष्टाचे असो, मजुरीचे असो, बैठे असो, सॉफ्टवेअर असो, त्या कामात व त्या दिवसांत त्या स्त्रीने मिळविलेला पैसा घरात का चालतो? त्या काळातील धान्य निवडलेले नैवेद्याच्या स्वयंपाकाला का चालते? एवढेच काय, तिने कपडे धुतलेलेही चालतात, मग घरात वावरलेले का चालत नाही. अजून एक महत्त्वाचे असे की, या पाळीचा संबंध थेट गर्भधारणेशी आहे. मग सृजनाशी नाते सांगणाऱ्या अवस्थेला चिकटलेले हे बुरसटलेले विचार आणखी किती दिवस पाळायचे? साळगावकरांच्या लेखात एका महिलेच्या पेटून मरण्याचे उदाहरण दिले आहे. जर त्या वेळेस तिची मुलगी हे पाळणे वगैरे गोष्टींमधून बाहेर पडली असती तर आज तिची आई तिच्याबरोबर असती.
यासाठी एकतर पूर्वीच्या पिढीने व आताच्या पिढीने एकत्र बसून, आडमुठेपणा न करता हा प्रश्न सोडवला पाहिजे, अथवा जर मागची पिढी यापैकी कुठल्याच पर्यायाला तयार नसेल तर आपला मार्ग आपणच ठरविला पाहिजे. मग समाज काय म्हणेल, घरी कदाचित आपल्यावर बहिष्कार टाकला जाईल, आपला सहचारी (कदाचित) फक्त आपल्याबरोबर असेल, आपल्याला आगाऊपणाचे पदक मिळेल, असंस्कारक्षम ठरविण्यात येईल याची तयारी त्या स्त्रीने ठेवली पाहिजे. घरी कितीही वादविवाद झाले तरी आपल्या आधुनिकतेच्या मतावर ठाम राहणे व शांतता धारण करणे, केव्हातरी याआधीच्या पिढीला पटेल, या आशेच्या जोरावर आताच्या चाळिशीला आलेल्या स्त्रीने हे केले तर मग खरंच स्त्रीच्या जीवनात एक नंदनवनच येईल. पण यासाठी स्त्रीनेच स्त्रीच्या मागे उभे राहण्याची गरज आहे. यावर सगळ्याच स्त्रियांनी विचार करणे आवश्यक आहे.
– परेशा परांजपे, ई-मेलवरून

..तर अज्ञान दूर होईल
डॉ. स्नेहलता देशमुख यांनी ‘स्त्री बीजांचे अश्रू’ या शीर्षकाद्वारे स्त्रियांच्या मासिक पाळीसंदर्भात प्रचलित रूढी व परंपरांबाबत मासिक पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे, हे सत्य व वैज्ञानिक मत प्रगट केले आहे. त्याबद्दल कोणतेही दुमत होऊ शकत नाही. मासिक पाळी लांबवण्यासाठी गोळ्या घेऊ नयेत, कारण त्यांचा वापर केल्यास आरोग्यावर परिणाम होतो, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
मासिक पाळीमुळे धार्मिक कार्यात अडथळे निर्माण होतात, हा एक गैरसमज आहे, असे म्हणणे चुकीचे नाही. संत मीराबाई, संत जनाबाई, संत मुक्ताई वगैरे भक्तिमार्गातील स्त्रियांना अडथळा निर्माण झाल्याचे ऐकिवात नाही. डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या मासिक पाळीसंबंधी मताचा प्रचार ग्रामीण भागात झाला तर मोठय़ा प्रमाणात अज्ञान दूर होण्याचे कार्य होईल.
– सुरबा देसाई, भांडुप

गरज भयमुक्त साक्षात्काराची!
‘मासिक पाळी व देवधर्म’ संदर्भातील अतूट परंपरांवर प्रश्नचिन्ह उमटवून एक नवी दिशा दाखविल्याबद्दल ‘चतुरंग’चे अभिनंदन! विशेषत: डॉ. अतनूरकर यांनी पुराणातील दाखले आणि वास्तव यांची सुयोग्य सांगड घातली आहे.
विटाळ/सोवळं या मारुतीवरच्या शेंदूराप्रमाणे मनाला घट्ट चिकटलेल्या परंपरा. त्या खरवडून काढणं महाकठीण!.. आजही माझ्याकडे पोळ्या करण्यासाठी येणाऱ्या जयश्रीस ‘त्या’ चार दिवसांत माझं घर सोडून इतरत्र पोळ्यांसाठी सक्त मनाई असते. मी एक नेत्रतज्ज्ञ आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या वयस्कर स्त्री रुग्णांकडून मोतीबिंदू शस्त्रक्रियेपूर्वी संभाव्य ‘विटाळ-चांडाळ’बद्दल नेहमीच विचारणा होते; परंतु कित्येकदा माझ्या त्या विटाळावस्थेतच मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्याचे माझे ‘गुपित’ मी गुपितच राहू देते! ‘पाळी’च्या बाबतीत ‘अळीमिळी गुपचिळी’ हाच सर्वोत्तम मार्ग होय! मात्र त्यासाठी आधी स्वत:च्या मनाची विटाळाच्या भयगंडातून १०० टक्के मुक्तता करायला हवी.
‘सोवळं-ओवळं’ संदर्भातदेखील विचारमंथन आवश्यक होय. मराठवाडय़ात कुलाचार, महालक्ष्मीचा स्वयंपाक, नवरात्र इत्यादीप्रसंगी कडक ‘सोवळं’ पाळलं जातं. स्वयंपाक रांधणारी स्त्री तर ‘सोवळं’ नेसलेली असतेच, पण तिथलं पाणी, तिथला विशिष्ट परिसर यांनाही सोवळ्याची लक्ष्मणरेषा असते. तिला ओलांडून लहान मुलांनीही ‘शिवायचे’ नसते. अशाच एका प्रसंगी मी लक्ष्मणरेषेच्या अल्याड (ओवळ्यात) आणि थोरल्या जाऊबाई पल्याड (सोवळ्यात) असा महालक्ष्मींचा स्वयंपाक रांधणे सुरू होते. तेवढय़ात भर दुपारी एक ‘गणपतीबाप्पांचे वाहन’ सोवळ्याच्या प्रांतातून काही गोष्टींना स्पर्श करीत पळाले! ‘‘आता तुमचे सोवळ्याचे नीतिनियम काय म्हणतात?’’ मी माझी जिज्ञासा प्रकट केली. त्यावर विचारांती जाऊबाईंकडून उत्तर आले ते असे, ‘‘उंदराच्या अंगावर कपडे कुठे असतात?’’
– डॉ. सुजाता जोशी-पाटोदेकर, नांदेड</strong>

जुन्या पिढीने पुढाकार घ्यावा
 गेल्या वर्षी नवरात्रीत मला अडचण आल्याने माझी रवानगी सासरहून माहेरी झाली. माहेरीही तेच शिवाशिवीचे अवडंबर. एवढंच काय, कोणीतरी असेही बोल लावले, माझी काहीतरी चूक झाली म्हणूनच अशा पवित्र, धार्मिक काळात मला अडचण येऊन देवीने शिक्षा दिली. ही नसíगक प्रक्रिया असूनही मला दोषी ठरवून अपमानास्पद वागणूक दिली गेली. वर्षभर माझ्या मनात ही रूखरूख होती. या लेखांच्या निमित्ताने ती मोकळी करता आली. आजच्या मुली/ स्त्रिया वैज्ञानिकदृष्टय़ा विचार करतात. आजच्या बदलत्या काळात या बाबतीतल्या प्रथा-रूढींमध्येही सुधारणा व्हायला हवी. त्यासाठी आपल्या आधीच्या पिढीने म्हणजे आपली आई/ सासू यांनी स्वत:चे विचार बदलून बदलास थोडा प्रतिसाद दिला तर परिस्थिती बदलण्यास मदत होईल.
– कृपाली चौबळ, ठाणे</strong>

संस्कृती की रूढी?
‘रजस्वला स्त्रीचा देवधर्म’ या विषयावरील लेख वाचले. तिन्ही लेखांतून वेगळा दृष्टिकोन व्यक्त झाला असला तरी स्त्रियांना पाळीत देवधर्म, पूजाअर्चा यात सहभागी होता आले पाहिजे, असा समान सूर यातून दिसतो आहे. मला यात एक अंतर्वरिोध दिसतो, तो म्हणजे मासिक पाळी हा स्त्रीच्या ऋतुचक्राचा भाग आहे, असा एक ठोस वैज्ञानिक दृष्टिकोन घ्यायचा आणि पूजाअर्चा, कर्मकांडात त्यांना सहभागी करून घेण्याचा आग्रह धरत या निरुपयोगी, निराधार कर्मकांडाला प्रतिष्ठा द्यायची. हे आता कुठेतरी थांबले पाहिजे. पूजाअर्चा, होमहवन, सोवळे या मुळात अंधश्रद्धा आहेत. आपल्या सांस्कृतिक परंपरा नव्हेत. संक्रांत- ज्यात परस्परांबद्दल स्नेह साजरा केला जातो, मातृदिन- ज्यात आईबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जाते, क्षमापर्व- ज्यात आपल्या शत्रूंनाही माफ केले जाते, ते दिवस जरूर साजरे करावेत. ती आपली संस्कृती आहे. मासिक पाळी ही वयात आलेल्या स्त्रीची अत्यंत वैयक्तिक आणि खासगी बाब आहे. त्या काळात शारीरिक स्वच्छता, मानसिक स्वास्थ्य, योग्य आहारविहार याचे जरूर प्रबोधन करावे, पण पाळीतल्या स्त्रीला त्या काळात  बहिष्कृत करून आपण अत्यंत क्रूर अशी प्रथा पाळत आहोत आणि स्त्रीच्या आत्मसन्मानाचा उपमर्द करतो आहोत हे लक्षात घ्यावे.
घरातल्या ज्येष्ठ महिला, जसे की नणंद, आई, सासू यांनी प्रथम हिम्मत दाखवून या जोखडातून समस्त स्त्री जातीची सुटका करण्याचे प्रयत्न करायला हवेत. ऋतुचक्राला समजून घेण्याचे शहाणपण यायला आता अधिक उशीर नको.
– शुभा परांजपे, पुणे

हे अंधश्रद्धेला पूरकच
मन शुद्ध असणं सर्वात महत्त्वाचं, हे डॉ. अतनूरकर आणि डॉ. स्नेहलता देशमुख यांचे विचार शंभर टक्के बरोबर आहेत. स्त्रीला किमान चार दिवस तरी आराम मिळावा हे अगदी बरोबर, पण असं म्हणून केलेली सुरुवात देवाच्या नावाखाली अंधश्रद्धेलाच वाव देते आहे. म्हणे या दिवसांत बनवलेलं देवाला चालत नाही. मला तर हेच कळत नाही की जगन्माता पार्वती हीसुद्धा एक स्त्री होती. मग चार दिवस आपण त्यांना, शंकर-पार्वतीच्या फोटोला देवघरातून बाजूला ठेवतो का? असे लेख वाचून आपल्यावरच्या अर्थ नसलेल्या रूढींचा पगडा कमी झाला पाहिजे.
– आदिती बेंद्रे, मुंबई

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reader reaction on chaturang article