पाकिस्तानमधील पेशावरमध्ये मशिदीत आत्मघातकी स्फोट घडवून आणण्यात आला आहे. या स्फोटात आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९० हून अधिक लोक जखमी झाले असून त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा स्फोट इतका मोठा होता की, यामुळे मशिदीचा एक भाग कोसळला आहे. हा स्फोट पेशावरमधील पोलीस लाईनजवळच्या मशिदीत झाला आहे. हा स्फोट झाला तेव्हा मशिदीत शेकडो लोक नमाज अदा करत होते. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पेशावरमधील लेडी रीडिंग रुग्णालयाचे प्रवक्ते मोहम्मद असमी यांनी पाकिस्तानी माध्यमांना सांगितलं की, जखमींना अजूनही रुग्णालयात आणलं जात आहे. यापैकी काहींची स्थिती गंभीर आहे. रुग्णालय आणि मशिदीच्या आसपासचा परिसर सील करण्यात आला आहे. येथे केवळ रुग्णवाहिका ये-जा करू शकतात. स्थानिक पोलीस अधिकारी सिकंदर खान यांनी सांगितलं की, इमारतीचा एक भाग कोसळला आहे. ढिगाऱ्याखाली बरेच लोक अडकलेले असू शकतात. हा स्फोट दुपारी १.४० वाजता झाला होता. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

स्फोटाच्या वेळी मशिदीत ५५० लोक उपस्थित

या स्फोटाच्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या एका स्थानिक नागरिकाने सांगितलं की, “नमाजाच्या वेळी मशिदीत जवळपास ५५० लोक उपस्थित होते. आत्मघातकी (फिदायीन) हल्लेखोर मधल्या एका ओळीत होता.” तो हल्लेखोर पोलीस लाईनमधील मशिदीत कसा पोहोचला हे अद्याप कळू शकलेलं नाही. कारण या परिसरात ये-जा करण्यासाठी गेट पास दाखवावा लागतो.

हे ही वाचा >> “दादी को गोली मार दी…”, इंदिरा गांधींच्या हत्येचा प्रसंग सांगतांना राहुल गांधी झाले भावूक; म्हणाले, “मृत्यूची बातमी देणारा फोन…”

याआधी कराचीतल्या मशिदीवर हल्ला

याआधीदेखील पाकिस्तानमध्ये अनेकदा मशिदींवर हल्ले झाले आहेत. १६ मे २०२२ रोजी पाकिस्तानमधल्या कराची शहरातील एका मशिदीजवळ दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला होता. येथील एमए जिन्नाह रोडवरील मेमन मशिदीच्या बाहेर स्फोट झाला होता. या स्फोटात एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर ८ जण जखमी झाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 25 killed over 90 injured in mosque blast pakistans peshawar asc