BJP MP Tejasvi Surya ask guests to avoid these two gifts : भारतीय जनता पार्टीचे तरुण खासदार तेजस्वी सूर्या विवाहबंधनात अडकले आहेत. तेजस्वी सूर्या यांनी लोकप्रिय गायिका शिवश्री स्कंदप्रसादशी आज (६ मार्च) लग्न केलं. तेजस्वी हे दक्षिण बेंगळुरूचे खासदार आणि बीजेपी युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. तर शिवश्री ही लोकप्रिय गायिका व भरतनाट्यम नृत्यांगना आहे. दरम्यान भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी आज त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनपूर्वी सोशल मीडियावर त्यांच्या शुभचिंतकांना एक खास आवाहन केले आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३४ वर्षीय तेजस्वी सूर्या यांनी त्यांच्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या बंगळुरू येथील लग्नाच्या रिसेप्शनला येणार्‍यांना विनंती केली आहे. “शिवश्री आणि मी उद्या आमच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये तुम्हा सर्वांना पाहण्यास उत्सुक आहोत. मात्र, आमची एक विनंती आहे,” असे भाजपा खासदार सूर्या यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

नेमकं कारण काय?

रिसेप्शन कार्यक्रमात भेटवस्तू म्हणून फुले, पुष्पगुच्छ किंवा सुकामेवा आणू नका असे आवाहन तेजस्वी सूर्या यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केले आहे. लग्नातील ८५ टक्के फुले आणि पुष्पगुच्छ २४ तासांच्या आत टाकून दिले जातात आणि दरवर्षी लग्नातील ३००००० किलो सुकामेवा टाकून दिला जातो असा दावा त्यांनी केला.

“भारतात दरवर्षी १ कोटीहून अधिक लग्न होतात, या लग्नानंतर २४ तासांच्या आत ८५ टक्के फुले आणि पुष्पगुच्छ टाकून दिले जातात आणि दरवर्षी लग्नातील ३००००० किलो सुकामेवा टाकून दिला जातो. अशा पुष्पगुच्छ आणि सुकामेव्यांच्या बदल्यात शक्य असलेल्या चॅरिटीचे मूल्य दर वर्षी ३१५ कोटी रुपये इतके आहे ,” असेही सूर्या यांनी म्हटले आहे.

भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांनी पाहुण्यांनी पुष्प गुच्छ किंवा सुकामेवा आणू नये अशी विनंती केली आहे. याबरोबर त्यांनी दोन मिनिटांचाव्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. कन्नड भाषेत असलेल्या या व्हिडीओमध्ये त्यांनी पाहुण्यांना हीच विनंती केली आहे.

कोण आहे शिवश्री स्कंदप्रकसाद?

शिवश्री स्कंदप्रसादने बायोइंजिनियरिंगमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच तिने चेन्नई विद्यापीठातून भरतनाट्यममध्ये एमए आणि मद्रास संस्कृत कॉलेजमधून संस्कृतमध्ये एमए पूर्ण केले आहे. शिवश्रीला संगीतक्षेत्रात खूप रस आहे. तिने आतापर्यंत देशभरातील अनके प्रतिष्ठित कार्यक्रमांमध्ये खासकरून चेन्नईमध्ये सादरीकरण केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये तिच्या युट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आलेल्या कन्नड भक्ती गीत ‘पूजीसलेंडे हुगला थंडे’चं कौतुक केलं होतं. सध्या शिवश्रीचे युट्यूबवर दोन लाख सबस्क्रायबर्स आहे. तिने कन्नड भाषेतील ‘पोन्नियिन सेल्वन: भाग 2’ मधील ‘वीरा राजा वीरा’ गाणं गायलं होतं. हे गाणं खूप लोकप्रिय ठरलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp tejasvi surya requests guests not to bring flowers dry fruits as gifts to his wedding reception know details rak