लोकसभा निवडणुकीच्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या केंद्रातील मनमोहन सिंग सरकारविषयीची विरोधी पक्षांच्या मनातील कटुता विरघळून तर गेली नाही ना, अशी शंका येण्याइतपत सौहार्दाचे चित्र गुरुवारी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या अभिभाषणादरम्यान संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात तसेच त्यानंतर लोकसभेत दिसले. घोटाळे, भ्रष्टाचार, महागाई, लाचखोरी आणि हिंदू दहशतवाद असे अनेक संघर्षांचे मुद्दे असतानाही संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते हेवेदावे बाजूला ठेवून संवाद साधत होते. त्यामुळे अधिवेशनाची सुरुवात तरी सकारात्मक ठरली.
गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भगव्या दहशतवादाचा थेट संघ आणि भाजपशी संबंध जोडल्यामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलाच तणाव निर्माण झाला होता आणि त्याचे तीव्र पडसाद संसदेच्या अधिवेशनात उमटण्याची चिन्हे दिसत होती. पण, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शिंदे यांनी दिलगिरी व्यक्त करून हा वाद संपुष्टात आणला. त्यामुळे मध्यवर्ती सभागृहात काही घडलेच नाही, अशा थाटात  विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत शिंदे हास्यविनोद आणि थट्टामस्करीत गुंतले होते. शिंदेंनी मुलायमसिंह यादव यांच्या कानापाशी जाऊन महत्त्वाची माहिती सांगितली. नंतर त्यांनी रवीशंकर प्रसाद, अनंतकुमार आदी भाजप नेत्यांपाशी जाऊन थट्टामस्करी केली आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांना हास्यविनोदाच्या भरात आलिंगनही दिले. सभागृहाच्या पहिल्या रांगेत मध्यभागी सुषमा स्वराज यांच्याशेजारी स्थानापन्न होताना शिंदे यांनी स्वराज यांच्यासोबत हस्तांदोलनाची पोझ दिली. तेवढय़ात तिथे अर्थमंत्री पी. चिदंबरम अवतरले. लोकसभेचे नेते शिंदे आणि विरोधी पक्षनेत्या स्वराज यांची प्रफुल्लित मुद्रा बघून त्यांनी आपल्या खिशातला मोबाईल काढला आणि दोघांचे छायाचित्र काढण्याचा आविर्भाव केला. ‘भगवा दहशतवाद’ हा शब्दप्रयोग गृहमंत्री असताना चिदंबरम यांनीच रुढ केला होता. त्याची शिंदे यांनी कशी वाट लावली, याची साक्ष देणारा तो क्षण टिपण्याचा चिदंबरम मिश्कील प्रयत्न करीत असावेत.
राष्ट्रपतींचे भाषण सुरु होण्यापूर्वी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार दीर्घकाळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री के.व्ही. थॉमस यांच्याशी गंभीर चर्चेत गुंतले होते.
शरद पवार यांनी भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांच्याशीही चर्चा केली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी सभागृहात पोहोचल्या तेव्हा काँग्रेससह भाजपच्याही सर्व ज्येष्ठ नेत्यांनी उभे राहून त्यांना नमस्कार केला.
गेल्या वर्षी २५ जुलैला राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेणारे प्रणब मुखर्जी यांचे पहिलेच अभिभाषण होते. पण सरकार कामगारांचे म्हणणे ऐकत नसल्याचा आरोप करून डाव्या पक्षांच्या खासदारांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला. त्यांचे भाषण सुरु होण्याआधीच स्वतंत्र तेलंगणच्या मागणीवरून आंध्र प्रदेशच्या खासदारांनी खिशातून कागदी फलके बाहेर काढून जोरजोराने घोषणा देत व्यत्यय आणला.
राष्ट्रपती मुखर्जी यांचे संसद भवनात आगमन होण्यापूर्वी त्यांच्या पत्नी व्हिलचेअरवर बसून मध्यवर्ती सभागृहात दाखल झाल्या होत्या. राष्ट्रपतींच्या डाव्या बाजूला दूरवर त्यांच्या पत्नी, तर उजव्या बाजूला गेल्या तीस वर्षांंच्या त्यांच्या सहकारी व सचिव ओमिता पॉल समान अंतरावर बसल्या होत्या. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी मध्यवर्ती सभागृहाच्या शेवटी बसले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घडय़ाळाचे उलटे फिरलेले काटे
लोकसभेत कामकाज सुरु होण्याआधी भाजपचे सर्वोच्च नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सभागृहातील पहिल्या रांगेत बसलेल्या अन्य पक्षांच्या नेत्यांशी स्वतहून संवाद साधला. मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव, शरद पवार, सोनिया गांधी व सुशीलकुमार शिंदे यांच्यापाशी जाऊन ते विचारपूस करीत होते. योगायोगाने लोकसभेत लागलेल्या  घडय़ाळ्यांचे काटे उलटे फिरलेले होते. दुपारचे साडेबारा वाजले असताना एका घडय़ाळात दीड, दुसऱ्या घडय़ाळात पावणे चार वाजले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budget session of parliament begins smoothly