भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं दिल्लीमधील एम्स रुग्णालयात ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्या ६७ वर्षांच्या होत्या. स्वराज यांना रात्री साडे नऊ वाजता अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र साडे अकराच्या सुमारास त्यांचं निधन झाल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं. स्वराज यांच्या आकस्मिक निधनाने सर्वच पक्षातील नेत्यांना धक्का बसला आहे. अनेकांनी ट्विटवरुन स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते असणाऱ्या गुलाम नबी आझाद यांनीही स्वराज यांच्या निधनाने आम्हा सर्वांना धक्का बसला आहे अशी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आज मी माझी बहिण गमावली असल्याचे त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वराज यांच्या निधनाची बातमी येताच अनेक बड्या नेत्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये धाव घेतली. त्यामध्ये आझाद यांचाही समावेश होता. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर आझाद यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्वराज यांच्या आकस्मिक निधनाचा आम्हा सर्वांनाच धक्का बसला असल्याचे म्हटले. ‘”आम्हाला धक्का बसला आहे. त्या आम्हाला एवढा लवकर सोडून जातील असं वाटलं नव्हतं. मी त्यांना १९७७ पासून म्हणजे युथ काँग्रेसमध्ये असल्यापासून ओळखायचो. मागील ४२ वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो. आम्ही दोघे एकमेकांना कधीच नावाने हाक मारत नसू. त्या मला भाई (भाऊ) म्हणायच्या आणि त्यांना बेहेन (बहिण) म्हणायचो,” अशी प्रतिक्रिया आझाद यांनी दिली.

आझाद यांच्याप्रमाणेच भाजपा तसेच काँग्रेसबरोबरच इतरही सर्वच पक्षातील नेत्यांनी स्वराज यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. अनेक नेत्यांनी स्वराज यांचे निधन झाल्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आज (बुधवार) दुपारी तीन वाजता स्वराज यांची अंतयात्रा दिल्लीमधील त्यांच्या निवासस्थानावरुन निघणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghulam nabi azad paid tribute to sushma swaraj says she use to call me bhai scsg