काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी राज्यसभेतील कामकाजावरून नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “प्रत्येक विषयाला जातीच्या मुद्द्यावर आणण्याची गरज नाही. मला आज राज्यसभेत बोलू दिले नाही. मी दलित असल्यामुळे मला बोलू दिले नाही, असे मी म्हणू का?”. उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांनी त्यांची नक्कल केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसेच मी जाट समाजातील असून संघर्ष करत या पदावर पोहोचलो आहे, हा माझ्या जातीचाही अवमान असल्याचे ते म्हणाले होते. खरगे यांनी सभापतींच्या जातीबद्दलच्या वक्तव्याचा धागा पकडून सदर टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशेष म्हणजे संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत बोलत असताना नक्कल प्रकरणाचा उल्लेख करून विरोधकांवर टीका केली. तसेच सभापतीच्या सन्मानार्थ सर्व सत्ताधारी पक्षातील आमदार उभे राहून कामकाजात सहभागी होतील, अशी घोषणा करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सभापतींपर्यंत सर्वांच्या जातीचा उल्लेख केला होता.

ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिब घरातून येतात, ते ओबीसी समाजातून येतात म्हणून त्यांचा अवमान केला गेला. त्यानंतर आदिवासी समाजातील एक महिला राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांचाही अपमान करण्यात आला. आता एका शेतकरी कुटुंबातून उपराष्ट्रपती झालेल्या माननीय सभापतींचा संसदेत अवमान करण्यात आला. पहिल्यांदाच जाट समाजाचा एक नेता उपराष्ट्रपतीपदावर पोहोचला. या पदावरील व्यक्तीचा अपमान करण्यात आला. त्यामुळे आम्ही उपराष्ट्रपताता अवमान आम्ही सहन करणार नाही. यासाठी आम्ही सर्व सदस्य प्रश्नोत्तराच्या तासात जागेवर उभे राहूनच काम करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून आम्ही आपला सन्मान आणि विरोधकांचा निषेध करत आहोत.”

मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले?

संसदेच्या बाहेर माध्यमांशी बोलताना खरगे म्हणाले की, सभापतींनी इतर सदस्यांना बोलताना संरक्षण देण्याची गरज असते. मात्र ते स्वतःच अशाप्रकारचे वक्तव्ये करत आहेत. मला नेहमीच राज्यसभेत बोलण्याची परवानगी नाकारली जाती. त्यामुळे मी दलित असल्यामुळेच परवानगी नाकारली जाते, असे म्हणू का? सभापतींनी तरी जातीच्या नावावर भडकाऊ विधान करणे टाळले पाहीजे.

काँग्रेसचे लोकसभेतील सभागृह नेता अंधीर रंजन चौधरी यांनीही याबाबत खेद व्यक्त केला. ते म्हणाले, संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने स्वतःच्या जातीचा उल्लेख करणे योग्य नाही. संसदेत झालेल्या घुसखोरी प्रकरणावरून हात झटकण्यासाठी सरकार इतर ठिकाणी लक्ष वळविण्याचा प्रयत्न करत आहे. आता प्रत्येकाने काय स्वतःच्या जातीचा शिक्का लावून फिरावे का? असाही संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If i am not allowed to speak should i say it is because i am dalit says mallikarjun kharge kvg