Crime News : अमेरिकेतून नुकताच भारतात परतलेल्या व्यक्तीवर दोन अज्ञातांनी घरात घुसून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी अमृतसरमध्ये हा हल्ला झाला. सुखचैन सिंह असं हल्ला झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ही गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झाली आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सुखचैन सिंग हे मागच्या काही वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास होते. जवळपास २० दिवसांपूर्वीच ते आपल्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी अमेरिकेतून भारतात परत आले. शनिवारी सकाळच्या सुमारास ते त्यांच्या घरात बसले असताना दोन अज्ञात तरुण त्यांच्या घरात दाखल झाले. सुखचैन सिंग यांनी नुकताच घेतलेल्या कारची चौकशी करण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सुखचैन सिंग यांना सांगितलं.
हेही वाचा – Triple Talaq to Wife: पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ यांची स्तुती केल्यामुळे दिला तिहेरी तलाक
सुखचैन सिंग यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना घरात घेतलं. मात्र, घरात दाखल होताच त्यांनी अचानक सुखचैन सिंग यांच्यावर गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात सुखचैन सिंग यांच्या चेहऱ्याला आणि हाताला गोळी लागली. यावेळी हल्लेखोरांची बंदूक जाम झाल्याने त्यांनी घरातून पळ काढला. त्यानंतर सुखचैन सिंग यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती आहे.
दरम्यान, या घटनेनंतर सुखचैनसिंग यांच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी अमृतसर पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच हा हल्ला सुखचैनसिंग यांच्या पहिल्या पत्नीच्या नातेवाईकांनी केल्याचा आरोप त्यांच्या आईने केला आहे. कुटुंबीयांच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी तपास करत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
या घटनेनंतर पंजाब सरकारमधील मंत्री कुलदीप दहिवाल यांनी ही घटना वैयक्तिक वादातून घडल्याची प्रतिक्रिया दिली आहे. अमृतसरमध्ये जी घटना घडली आहे, ती अत्यंत धक्कादायक आहे. आम्ही या घटनेची सखोल चौकशी करत आहोत. ही घटना वैयक्तिक वादातून घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी गुन्हाही नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे, असे ते म्हणाले. तसेच अप्रवासी भारतीयांचे काही वैयक्तिक वाद असतील तर त्यांनी चर्चेतून सोडवावे, असं आवाहनही त्यांनी केलं.
हेही वाचा – Gaganyaan Astronaut: गगनयान मोहिमेत अंतराळवीर होण्यासाठी काय करायला हवे? इस्रोच्या अध्यक्षांनी सांगितले…
दरम्यान, या घटनेनंतर आता राजकीय प्रतिक्रिया ही उमटू लागल्या आहेत. यावरून शिरोमणी अकाली दलचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी पंजाब सरकारवर टीका केली आहे. पंजाबमध्ये रोज अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. राज्यातील जनता त्यांच्या घरातही सुरक्षित नाही. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा, असं ते म्हणाले.