नवी दिल्ली : इराणच्या ताब्यात असलेल्या जवळपास ४० सागरी कर्मचाऱ्यांची सुटका करावी असे आवाहन भारताने केल्याची माहिती सूत्रांनी बुधवारी दिली. गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत चार निरनिराळ्या व्यापारी जहाजांवरून या कर्मचाऱ्यांना इराणने ताब्यात घेतले आहे.
बंदर, जहाज वाहतूक आणि जलमार्ग विभागाचे मंत्री सर्बानंद सोनोवल यांनी सोमवारी तेहरानमध्ये इराणचे परराष्ट्रमंत्री होसेन आमिर अब्दुलाहियन यांच्याबरोबर झालेल्या भेटीत ही विनंती केली. भारताच्या बाजूने विनंती करण्यात आल्यावर या बैठकीचे आयोजन करण्यात आले असे या घडामोडींची माहिती असणाऱ्या सूत्रांनी दिली. यावेळी इराणच्या ताब्यात असलेल्या सर्व भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका करण्याची विनंती सोनोवल यांनी केली. त्यावर अब्दुलाहियन यांनी सोनोवल यांना सांगितले की, या कर्मचाऱ्यांची सुटका करण्यास इराण सकारात्मक आहे. मात्र, कायदेशीर प्रक्रियांचे पालन करणे आवश्यक असल्याने त्याला उशीर होत आहे.
सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले छाबार हे इराणमधील बंदर कार्यरत करण्यासाठी भारताने इराणबरोबर १० वर्षांचा करार केला आहे. त्यासाठी सोनोवल इराणच्या दौऱ्यावर असताना ही भेट झाली.
हेही वाचा >>> स्लोवाकियाचे पंतप्रधान गोळीबारात गंभीर जखमी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत इराणने निरनिराळ्या आरोपांखाली ‘स्टिव्हन’, ‘ग्लोबल शेरिलिन’, ‘मार्गोल’ आणि ‘एमएससी एरिस’ ही चार व्यापारी जहाजे आणि त्यावरील कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. यापैकी ‘स्टिव्हन’ हे जहाज १२ सप्टेंबर २०२३ रोजी तस्करीच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले होते. त्यावर नऊ भारतीय कर्मचारी होते. त्यापैकी तिघांना इराणी अधिकारी २४ एप्रिलला इतरत्र घेऊन गेले. आता त्यांचा ठावठिकाणा ज्ञात नाही. यापैकी कोणालाही वकिलातीशी संपर्क साधता आला नाही.
‘ग्लोबल शेरिलिन’ या ११ डिसेंबरला इंधन तस्करीच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आलेल्या जहाजावर २० भारतीय कर्मचारी होते. त्यांना भारतीय वकिलातीशी संपर्क साधण्याची परवानगी देण्यात आली होती.
‘मार्गोल’ हे जहाजही इंधन तस्करीच्या आरोपावरून २२ जानेवारीला ताब्यात घेण्यात आले होते. या जहाजावरील १२ भारतीय कर्मचाऱ्यांची यापूर्वीच सुटका झाली आहे. मात्र, जहाजाचे कप्तान सुजित सिंह हे अजूनही इराणच्या ताब्यात आहेत. त्यांना भारतीय वकिलातीशी संपर्क साधण्याची परवानगी मिळाली नाही. त्यांच्यावर २० कोटी रुपयांचा दंड लादण्यात आला आहे.
‘एमएससी एरिस’ हे जहाज इस्रायलशी संबंधित असल्याच्या आरोपावरून १३ एप्रिल रोजी ताब्यात घेण्यात आले असून त्यावर १७ भारतीय कर्मचारी होते. त्यापैकी अॅन तेसा जोसेफ या महिला कॅडेटसह सहा जणांची सुटका करण्यात आली आहे.