जेट एअरवेजचे वैमानिक आणि इंजिनिअर्सनी शेवटच्या मिनिटाला प्रस्तावित संप पुढे ढकलला आहे. जेटचे व्यवस्थापन आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उद्या चर्चा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आणखी एक संधी देण्याच्या हेतूने हा प्रस्तावित संप पुढे ढकलण्यात आला आहे अशी माहिती नॅशनल एविएटर्स गिल्डकडून देण्यात आली. एनएजी ही जेट एअरवेजच्या वैमानिकांची संघटना आहे. जेटची आर्थिक अडचणीतून सुटका करण्यासाठी १५०० कोटी रुपये कर्ज देण्याची योजना बनवली आहे. कर्ज मंजूर झाले आहे पण निधी अद्यापी दिलेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेतन थकवल्यामुळे जेट एअरवेजच्या नॅशनल एविएटर्स गिल्डशी संबंधित असलेल्या १,१०० वैमानिकांनी सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून उड्डाणे थांबवण्याचा निर्णय घेतला होता. इंजिनिअर, व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह वैमानिकांना जानेवारी महिन्यापासूनचे वेतन मिळालेले नाही. कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या जेट एअरवेजने अन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा मार्च महिन्याचे वेतन दिलेले नाही.

आजपर्यंत आम्हाला साडेतीन महिन्यांचा पगार मिळालेला नाही. यापुढे तो कधी मिळेल याची खात्री नाही. त्यामुळे १५ एप्रिलपासून आम्ही उड्डाणे थांबवण्याचा निर्णय घेतला होता. नॅशनल एविएटर्स गिल्डशी संबंधित असलेले सर्व १,१०० वैमानिक उद्या सकाळी १० वाजल्यापासून उड्डाणे बंद करतील असे गिल्डकडून सांगण्यात आले होते.

१६०० वैमानिकांपैकी ११०० वैमानिक सदस्य असल्याचा एनएजीचा दावा आहे. पगार मिळालेला नसल्यामुळे एक एप्रिलपासूनच उड्डाणे थांबवण्याचा निर्णय घेतला होता. पण ३१ मार्चला १५ एप्रिलपर्यंत आंदोलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. नव्या व्यवस्थापनाला वेळ द्यायचा असल्या कारणाने हा निर्णय घेण्यात आला होता. जेट एअरवेजला पुन्हा उभे करण्यासाठी नव्याने कर्ज देण्याची योजना आहे. जेटचे संस्थापक नरेश गोयल यांनी सुद्धा संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jet airways pilots defer strike