गैरव्यवहाराच्या आरोपांबरोबरच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम बरोबरचे दुरध्वनीवरील कथित संभाषण एकनाथ खडसे यांना चांगलेच शेकले. दाऊदसोबतच्या दुरध्वनीवरील संभाषणाचा आरोप खोटा असल्याचा पुरावा म्हणून खडसेंनी तज्ज्ञांद्वारे प्रात्यक्षिक देऊनही खडसेंवरील संशयाचे सावट काही दूर झाले नाही. या संपूर्ण प्रकरणात खडसेंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी त्यांचे विश्वासू साथीदार म्हणून ओळख असलेल्या डॉ. गुरूमुख जगवानी खूप प्रयत्न केले. गुरूमुख जगवानी यांच्याबाबतची विशेष गोष्ट म्हणजे जळगावात येण्यापूर्वी ते पाकिस्तानातील कराची येथे राहत होते. दाऊद राहत असल्याची चर्चा असलेल्या क्लिफ्टन परिसरानजीकच जगवानी यांचे वडिलोपर्जित घर अजूनही अस्तित्वात आहे. दाऊदच्या निवासस्थानातून सातत्याने दूरध्वनी आल्याच्या आरोपांमुळे खडसे अडचणीत यायला लागल्यानंतर जगवानी यांनी तातडीने कराचीत फोन करून टेलिकॉम कंपन्यांनी दिलेल्या पत्त्याची खातरजमा केली. त्यावरून हा पत्ता खोटा असल्याचे त्यांनी सांगितले. मी मुळचा पाकिस्तानचा असल्यामुळे मला पुरावा म्हणून सादर करण्यात आलेले बिल पाकिस्तानमधील टेलिकॉम कंपन्यांच्या बिलांपेक्षा वेगळे असल्याचे लगेच जाणवल्याचे जगवानी यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खडसेंकडून प्रात्यक्षिकाद्वारे आरोपाचे खंडन 

गुरूमुख जगवानी हे सध्या भाजपचे विधानपरिषदेतील आमदार असून ते सुरूवातीपासूनच खडसेंचे विश्वासू साथीदार म्हणून ओळखले जातात. डॉ. जगवानी यांच्या पाकिस्तानमधून जळगावमध्ये येऊन स्थायिक होण्याचीही कहाणी रंजक आहे. जगवानी यांनी पाकिस्तानमधील सिंध विद्यापीठातून त्यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. १९८१ मध्ये ते मधुचंद्राच्यानिमित्ताने जळगावमध्ये आले होते. खडसेंचा बालेकिल्ला ओळखला जाणारा हा परिसर तेव्हा जगवानी आणि यांना भलताच आवडला आणि त्यांनी कराचीतून जळगावमध्ये स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. जळगावमध्ये जगवानी यांचे काही नातेवाईकही आधीपासूनच वास्तव्याला होते. त्यामुळे सुरूवातीला १९८५ मध्ये ते मुंबईत आले आणि त्यानंतर १९८७ पासून ते जळगावमध्ये राहायला लागले. याठिकाणी त्यांनी व्यवसायाला सुरूवात केली. याच व्यवसायाच्या निमित्ताने त्यांची ओळख एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्याशी झाली. यानंतर जगवानी भाजपचा भाग झाले आणि जिल्ह्यात येणाऱ्या भाजपच्या बड्या नेत्यांच्या सरबराईची व्यवस्था पाहू लागले. यादरम्यान, जगवानी यांचा अनेक भाजप नेत्यांशी संबंध आला. मात्र, खडसे हेच माझे वरिष्ठ असल्याचे ते आजही सांगतात. दरम्यान, २०१४ मध्ये जळगावमधून जगवानी विधानपरिषदेवर निवडून गेले आणि आज ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. इतक्या वर्षांनंतरही डॉ. जगवानी हे सावलीसारखी खडसेंची सोबत करत आहेत. विधानपरिषद असो किंवा खडसेंची विरोधी पक्षातील कारकीर्द असो, जगवानी प्रत्येकवेळी खडसेंबरोबर दिसून आले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karachi connection former pakistani doctor who became a bjp legislator and eknath khadse aide in need