Kash Patel Jai Shri Krishna Viral Video : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात १ डिसेंबर रोजी काश पटेल या भारतीय वंशाच्या अधिकाऱ्याकडे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे (एफबीआय) नेतृत्व सोपवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर गुरुवारी (३० जानेवारी) अमेरिकेच्या सीनेटमध्ये काश पटेल यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. यासाठी सीनेटची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीआधी काश पटेल यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या पायांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले. काश पटेल यांचा हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. काश पटेल अमेरिकेत स्थायिक असले तरी ते भारतीय संस्कार व परंपरांपासून दूर गेलेले नाहीत अशा शब्दांत त्यांचं समाजमाध्यमांवर कौतुक होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका युजरने एक्सवर कमेंट केली आहे की “भारताबाहेर असे क्षण फार कमी वेळा अनुभवायला मिळतात. हा काश पटेल यांच्या मनातील आई-वडिलांसाठीचा सन्मान आहे. हेच प्रेम आहे”. दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे की “आपली मूळं आपण धरून ठेवली पाहिजेत. काश पटेल त्यापैकीच एक उदाहरण आहेत. मला वाटलं नव्हतं की मी त्यांच्यामुळे इतका प्रभावित होईन. त्यांच्या आई-वडिलांना आपल्या मुलाचा अभिमान वाटत असेल”.

काश पटेल यांनी बैठकीवेळी त्यांच्या आई-वडिलांची ओळख करून दिली. यावेळी ते म्हणाले, “माझे वडील प्रमोद व माझी आई अंजना या दोघांमुळेच मी इथवर पोहोचलो आहे. मी त्यांचं या ठिकाण स्वागत करू इच्छितो. ते हा क्षण पाहण्यासाठी भारतातून इथे आले आहेत. माझी बहीण निशा देखील आली आहे. जय श्री कृष्ण”. काश पटेल यांच्या या पारंपरिक अभिवादनाचं खूप कौतुक होतं आहे. अमेरिकेतील भारतीयांनी याबद्दल त्यांचं कौतुक केलंच, त्यांच्याबरोबर अमेरिकन नागरिकांनाही काश पटेल यांची ही कृती आवडली.

ट्रम्प यांचे विश्वासू

डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळादरम्यान काश पटेल अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे चीफ ऑफ स्टाफ होते. तुलसी गब्बार्ड यांच्याकडे नॅशनल इंटेलिजन्सची जबाबदारी दिल्यानंतर आता पटेल हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या प्रशासनात संधी मिळालेले दुसरे भारतीय-अमेरिकन ठरले आहेत. काश पटेल यांनी के ख्रीस्तोफर व्रे (Christopher Wray) यांची जागा घेतली आहे. २०१७ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनीच व्रे यांची एफबीआयचे संचालक म्हणून १० वर्षांसाठी नियुक्ती केली होती. पटेल हे अ‍ॅटर्नी जनरल पाम बोंडी यांच्या नेतृत्वाखाली काम करतील असेही ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. पटेल यांच्या नावाची घोषणा ट्रम्प यांनी केली असली होती. रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाखालील सीनेटने आज त्यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kash patel jai shri krishna greeting to family during senate confirmation hearing as new fbi head asc