लग्नाला नकार दिल्याने एका अल्पवयीन मुलीवर भररस्त्यात वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात ही घटना असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा थरार कैद झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोझिकोडमधील नादापुरममध्ये जुना मार्केट रोडमध्ये दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. अर्शद नावाच्या व्यक्तीने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाची मागणी घातली होती. परंतु, तिने त्याला नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या अर्शदने आधी अल्पवयीन मुलीला मारहाण केली. त्यानंतर त्याने तिच्यावर चाकूने वार केला. मुलीवर वार होत असल्याचे दिसताच आजूबाजूचे धावत आले. मार्केटमधील व्यापारांनी वेळीच हस्तक्षेप करून मुलीची सुटका केली.

दरम्यान, या झटापटीत मुलीच्या हाताला दुखापत झाली असून तिला तातडीने नादापुरम तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपींसोबत भांडण करणारा एक दुकान मालकही या घटनेत जखमी झाला आहे.

अर्शद आणि अल्पवयीन मुलीचे लग्न ठरले होते. परंतु, नंतर तिने लग्न मोडले. त्यामुळे अर्शद सतत तिला आणि तिच्या कुटुंबीयांना धमकावत होता. या त्रासाला कंटाळून तिच्या कुटुंबियांनी दुसरीकडे राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अल्पवयीन मुलीवर अर्शदने सुनियोजित हल्ला केला.

पोलिसांनी अर्शदला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मुलीची प्रकृती धोक्याबाहेर असून तिच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kerala crime man stabs 17 year old girl for rejecting his marriage proposal in kozhikode shocking cctv footage surfaces sgk