लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. या सहाव्या टप्प्यात देशातील सहा राज्ये व दिल्ली मिळून ५९ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. २०१४ साली भाजपाने या ५९ पैकी ४५ जागा जिंकल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये येथील सर्वच पक्षांचे जोरदार प्रचारतंत्र पाहता गेल्या वेळच्या जागा राखणं भाजपासाठी मोठं आव्हान असणार आहे, परिणामी भाजपासाठी या टप्प्यातील मतदान ही मोठी कसोटी असेल. गेल्या वेळी तृणमूल काँग्रेसने ८, काँग्रेसने २, तर समाजवादी पक्ष व लोकजनशक्ती पक्ष यांनी प्रत्येकी १ जागा जिंकली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या टप्प्यात केंद्रीय मंत्री मनेका गांधी, राधा मोहन सिंह, हर्षवर्धन, कृष्णपाल गुर्जर, राव इंदरजित सिंह, नरेंद्र सिंह तोमर, तसेच गौतम गंभीर, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, निरहुआ, मनोज तिवारी, काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे, दिग्विजय सिंह, कीर्ती आझाद, शीला दीक्षित, विजेंदर सिंह, भूपिंदरसिंह हुडा व समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रांत बंद होणार आहे.

रविवारी उत्तर प्रदेशातील १४, हरयाणातील १०, बिहार, मध्य प्रदेश व पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ८, दिल्लीतील ७ व झारखंडमधील ४ जागांसाठी मतदान होत आहे. १०.१७ कोटी मतदार मतदानासाठी पात्र असून एकूण ९७९ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुका सुरळीतपणे होण्यासाठी निवडणूक आयोगाने १.१३ लाखांहून अधिक मतदान केंद्रे उभारली आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि भाजपाच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यातील लक्षवेधी लढतीमुळे भोपाळ मतदारसंघाने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. राजधानी दिल्लीत भाजप, आप व काँग्रेस यांच्यात तिहेरी लढत होत आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस, भाजप व डावी आघाडी हे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. यंदा भाजपने तृणमूल काँग्रेसपुढे मोठे आव्हान उभे केले आहे.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksabha election 2019 6th phase voting started