नवी दिल्ली : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रसिद्ध वा प्रतिष्ठित नसल्याचा ‘शोध’ केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अखत्यारित कार्यरत असणाऱ्या डॉ. आंबेडकर फाऊंडेशनने लावला आह़े. तसा दावा करणारे पत्र फाऊंडेशनने राज्यातील भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष सुधाकर भालेराव यांना पाठवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. आंबेडकर फाऊंडेशनकडे देशातील महापुरुषांची यादी असून त्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा समावेश नसल्याचे भालेराव यांच्या लक्षात आल्यानंतर, त्यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री वीरेंद्र कुमार, तसेच डॉ. आंबेडकर फाऊंडेशनला पत्र लिहिले होते. या पत्रात अण्णा भाऊ साठे यांचा महापुरुषांच्या यादीत समावेश करण्याची विनंती केली होती. देशातील महापुरुषांची जयंती व पुण्यतिथीदिनी अभिवादन करणारे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी डॉ. आंबेडकर फाऊंडेशनच्या वतीने योजना राबवली जाते. अण्णा भाऊ साठे यांचा या यादीत उल्लेख नसल्याने या योजनेतही त्यांच्या नावाचा समावेश झालेला नाही. मात्र या योजनेत अण्णा भाऊ साठे यांच्या नावाचा समावेश करण्यास डॉ. आंबेडकर फाऊंडेशनने असमर्थता व्यक्त केली आहे.

भालेराव यांनी पाठवलेल्या पत्रावर सुमारे पाच महिन्यांनी फाऊंडेशनचे संचालक विकास त्रिवेदी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘‘पत्रातील विनंतीचा गांभीर्याने विचार केला गेला़, मात्र देशातील इतर महापुरुषांप्रमाणे अण्णा भाऊ साठे हे प्रसिद्ध वा प्रतिष्ठित असल्याचे आढळले नाही. त्यामुळे संबंधित योजनेत त्यांचा समावेश केला जाऊ शकत नाही,’’ असे त्रिवेदी यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. कोणत्या आधारावर फाऊंडेशनने हा निर्णय घेतला यावर पत्रात कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokshahir annabhau sathe not famous or prestigious dr ambedkar foundation zws