भारताच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने ‘पंतप्रधान गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन’ एक परिवर्तनशील उपक्रम म्हणून उदयास आला आहे. याद्वारे बहुविध जोडणीमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, विविध क्षेत्रांमध्ये जलद आणि अधिक कार्यक्षम विकास घडवण्यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘एक्स’वरील संदेशात नमूद केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विविध आर्थिक क्षेत्रांना बहुविध जोडणींतून पायाभूत सुविधा प्रदान करण्यासाठी ‘पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन’ (पीएमजीएस-एनएमपी) उपक्रम १३ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू करण्यात आला. या उपक्रमाला आज तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्याोग मंत्री पीयूष गोयल यांनी प्रसिद्ध केलेल्या संदेशाला ‘टॅग’ करून ‘पीएम गतिशक्ती’ उपक्रमाचे कौतुक केले. ‘पीएम गतिशक्ती’ हा आर्थिक वाढ आणि शाश्वत विकासासाठी एक परिवर्तनशील उपक्रम असून जो रेल्वे, रस्ते, बंदरे, जलमार्ग, विमानतळ, मास ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर या सात इंजिनांवर धावतो, असे मोदींनी सांगितले.

हेही वाचा >>>हत्येनंतर राजकीय वादळ; बाबा सिद्दिकी यांच्यावरील हल्ल्याचे देशभरात पडसाद

विविध भागधारकांच्या एकत्रीकरणामुळे लॉजिस्टिक क्षेत्राला एकप्रकारे चालना मिळाली, विलंब कमी झाला आणि अनेकांसाठी नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. विकसित भारताची संकल्पना पूर्ण करण्यासाठी गतिशक्ती उपक्रमाचा मोठा हातभार लाभत आहे. यामुळे प्रगती, उद्याोजकता आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन मिळेल,’ असेही पंतप्रधान म्हणाले.

अनुभूती केंद्राला मोदींची भेट

‘पीएम गतिशक्ती’च्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भारत मंडपम् येथील पीएम गतिशक्ती अनुभूती केंद्राला रविवारी अचानक भेट दिली. या अनुभूती केंद्रात या उपक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये, उपलब्धी आणि टप्पे दाखवण्यात आले आहेत.

विकसित भारताला बळकटी’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुविध जोडणीसाठी सुरू केलेल्या ‘पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन’ उपक्रमाला आज तीन वर्षे पूर्ण होत आहेत. लॉजिस्टिक्स क्षेत्र सुव्यवस्थित करून आणि जोडणी वाढवून, हा उपक्रम जलद आणि अधिक कार्यक्षम प्रकल्पांच्या अंमलबजावणीला प्रोत्साहन देत असल्याचे गोयल यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे. एक आधुनिक, परस्परसंबंधित पायाभूत सुविधांचे जाळे विकसित करण्यात, विकसित भारत निर्माण करण्याच्या दृष्टिकोनाला बळकट करण्यात हा उपक्रम निर्णायक भूमिका बजावत आहे, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movement transformative initiatives statement by prime minister narendra modi amy