Robert Vadra on Pahalgam Attack: काँग्रेसच्या नेत्या, खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केलेले विधान सध्या चर्चेत आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ निष्पाप नागरिकांना टिपून टिपून ठार केले. या हल्ल्यानंतर रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटले की, भाजपा आणि केंद्र सरकारकडून हिंदुत्वाचा अजेंडा रेटला जात असल्यामुळे देशातील मुस्लिमांच्या मनात भीती आणि अस्थिरता निर्माण झाली आहे.
रॉबर्ट वाड्रा यांनी केलेल्या विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना ते म्हणाले, सरकार हिंदुत्वाबद्दल बोलत आहे, त्यामुळे अल्पसंख्याक समाजात अस्थिरता निर्माण झाली आहे. पहलगाम हल्ल्यात अतिरेक्यांनी जर लोकांची ओळख विचारून हल्ला केला असेल तर हे दुर्दैवी आहे. त्यांनी हे का केले? कारण आपल्या देशात हिंदू आणि मुस्लीम यांच्यात दरी निर्माण झाली आहे.
वाड्रा पुढे म्हणाले, देशातील सद्यस्थितीमुळे दहशतवादी संघटनांना सर्वच हिंदू हे मुस्लीम नागरिकांचे शत्रू वाटत आहेत. एखाद्याची ओळख विचारून नंतर त्यांना मारणे, हा थेट पंतप्रधानांसाठी संदेश होता. कारण या देशातील मुस्लीम स्वतःला कमकुवत समजत आहेत.”
भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक्सवर वाड्रा यांचा व्हिडीओ शेअर करत त्यांच्यावर टीका केली आहे. ज्यात त्यांनी हे विधान धक्कादायक असल्याचे म्हटले. अमित मालवीय पुढे म्हणाले, सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा हे निर्लज्जपणे दहशतवादी कृत्याचे समर्थन करत आहेत, हे धक्कादायक आहे. ते एवढ्यावरच थांबलेले नाहीत. तर त्यांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांवर टीका करण्याऐवजी भारतावरच टीका केली आहे.
सोशल मीडियावरही रॉबर्ट वाड्रा यांच्यावर टीका होत आहे. माध्यमेही अशा लोकांच्या प्रतिक्रिया का घेते? असा प्रश्न काही लोकांनी विचारला आहे.
लाजिरवाणे विधान – शहजाद पूनावाला
भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनीही काँग्रेसचे नेते रॉबर्ट वाड्रा यांच्यावर टीका केली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या इशाऱ्यावरच त्यांनी हे विधान केलेले असावे, असाही आरोप त्यांनी केला. “पाकिस्तानी दहशतवाद्यांना वाचिवण्याचा, इस्लामिक जिहाद्यांचे पाप लपविणे, त्यांना क्लीन चीट देणे आणि हिंदूंना दोषी ठरविण्यासाठीच वाड्रा यांनी हे संतापजनक विधान केलेले आहे”, अशी टीका रॉबर्ट वाड्रा यांनी केले.