Pakistan Airlines News: पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी एका ट्रेनचं अपहरण झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर ट्रेनमध्ये ओलीस ठेवलेल्या प्रवाशांची कसबसी सुटका करण्यात आली. यानंतर आता पाकिस्तानमधून एक अशी बातमी समोर आली आहे की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या (पीआयए) एका विमानाने लाहोर विमानतळावर लँडिंग केलं. मात्र, या विमानाचं एक चाक गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. हे पाहिल्यानंतर पीआयएच्या अधिकाऱ्यांना धक्का बसला. यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणताही अपघात घडला नाही, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचं हे विमान कराचीवरून लाहोरला जात होतं. लाहोर विमानतळावर उतरताना पीके-३०६ या विमानाचं एक चाक गायब झाल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं. पण हे विमान कराचीहून निघालं होतं तेव्हाच म्हणजे विमान टेक ऑफ करण्याच्या आधीच गायब झालं होतं की विमान हवेत असताना गायब झालं? तसेच विमानाचं चाक गायब झालं की चोरीला गेलं? याची देखील आता चौकशी सुरू करण्यात आली असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

अधिकारी नेमकं काय म्हणाले?

माहितीनुसार, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे फ्लाइट पीके ३०६ हे कराचीहून लाहोरला येत होतं. हे विमान लाहोरच्या अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं. विमानाच्या लँडिंगनंतर विमानाची तपासणी केली असता विमानाच्या मागील चाकांपैकी एक चाक गायब असल्याचं आढळून आलं, हे पाहिल्यानंतर सर्वांना धक्का बसला, आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

कराची विमानतळावर चाकाचा काही भाग सापडला

या घटनेबाबत आता असा दावा केला जात आहे की जेव्हा विमानाने कराचीहून उड्डाण केलं तेव्हा विमानाची सर्व चाके चांगल्या स्थितीत होती. पण विमान लाहोरमध्ये उतरल्यावर लाहोरच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला एक चाक गायब असल्याची माहिती देण्यात आली. यानंतर कराची विमानतळावर चाकाच्या कवचाचा काही भाग जप्त करण्यात आल्याचा दावाही केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, कराचीच्या धावपट्टी दरम्यान देखील ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan airlines flight pk 306 missing wheel karachi airport pilot gave information and everyone was shocked gkt