उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी, कट आणि १ कोटींची लाच देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अनिक्षा जयसिंघानी आणि अनिल जयसिंघानी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर अनिक्षा जयसिंघानी हीला अटक करण्यात आली आहे. पण, याप्रकरणाच्या स्वतंत्र चौकशीची मागणी शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार प्रियंका चतुर्वेंदी यांनी केली आहे.
‘एबीपी माझा’शी बोलताना प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, “अमृता फडणवीस प्रकरणात २० फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मग आताच का अटक करण्यात आली. २०१६ साली देवेंद्र फडणवीस स्वत: मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. मग जिचे वडील बुकी माफीया असून, पाच राज्याचं पोलीस मागावर आहेत, त्या महिलेला तुम्ही घरात कसं येऊन दिलं. आज कळलं की ती डिझायनर नाही. त्यामुळे याच्या पाठीमागची गोष्ट काय आहे, हे सर्वांसमोर आलं पाहिजे.”
हेही वाचा : “रामराज्य आल्यापासून निवडणुका घ्यायला राम…” जयंत पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना टोला
“ट्वीटरवर स्वतंत्र चौकशीची मागणी केल्यावर अमृता फडणवीस माझी लायकी विचारत आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी असल्याने कोणाचीही लायकी विचारू शकतात. पण, मी महाराष्ट्राचं राज्यसभेत प्रतिनिधित्व करते, असं उत्तर देऊ शकले असते. स्वतंत्र चौकशीची मागणी केल्याने त्यांनीच ट्वीटरवर उडी मारली. हे म्हणजे चोराच्या उटल्या बोंबा आहेत. यांची चोरी पकडली आहे,” अशी टीका चतुर्वेदींनी केली.
हेही वाचा : “सत्ताधाऱ्यांना चाहूल लागलीय, मंत्रालयात लगबग सुरू”, सत्तासंघर्षावरील सुनावणीनंतर नाना पटोलेंचं सूचक वक्तव्य
“गृहमंत्री असताना सुद्धा तुम्हाला माहिती नाही की, तुमच्या घरी कोण येत आहे. उद्या दाऊदची नात येईल आणि सांगेल मी फॅशन डिझायनर आहे. मला आई-वडील नसल्याने माझी प्रसिद्धी करण्यास मदत करा. त्यामुळे याची तुम्हाला माहिती नाही किंवा यात तुम्ही सामील आहात. म्हणून स्वतंत्र चौकशी केल्याने सर्व समोर येणार आहे,” असं प्रियंका चतुर्वेदींनी सांगितलं आहे.