12, Tughlak Lane Bungalow: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या एका उल्लेखामुळे त्यांच्यावर खासदारकी रद्दची कारवाई करण्यात आली आहे. गुजरातमधील न्यायालयानं त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाली आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात काँग्रेस कार्यकर्ते आणि नेतेमंडळींनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. तसेच, विरोधकांकडून सत्ताधारी भाजपावर आरोप करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींना त्यांचा बंगला सोडण्याची नोटीस बजावण्यात आली. या नोटीसला आता राहुल गांधींनी उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल गांधींवर मानहानी प्रकरणात दोष सिद्ध झाल्यानंतर सुरतमधील जिल्हा न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला. राहुल गांधींनी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील करणार असल्याचं सांगूनही त्याआधीच खासदारकी रद्द केल्याचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यानंतरही राहुल गांधींनी आपली भूमिका कायम ठेवली असून आता त्यांना बंगला रिकामा करण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे.

१२, तुघलक लेन!

राजधानी दिल्लीत राहुल गांधींना खासदार म्हणून १२, तुघलक लेन रोड हा बंगला शासकीय निवासस्थान म्हणून देण्यात आला होता. मात्र, खासदारकी रद्द झाल्यामुळे हा बंगला रिकामा करण्याची नोटीस लोकसभा हाऊस कमिटीकडून राहुल गांधींना बजावण्यात आली आहे. या नोटीसला राहुल गांधींनी तात्काळ सकारात्मक उत्तर देत सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.

खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींना आणखी एक धक्का, लोकसभा हाऊस कमिटीने बजावली ‘ही’ नोटीस

“मोहित राजनजी (लोकसभा सचिवालयाचे उपसचिव). तुम्ही १२, तुघलक लेन हे मला देण्यात आलेलं शासकीय निवासस्थान रद्द करण्याबाबत पाठवलेल्या पत्रासाठी धन्यवाद. गेल्या चार टर्मपासून लोकसभेचा एक निवडून आलेला खासदार म्हणून या निवासस्थानातील वास्तव्याच्या माझ्या चांगल्या आठवणींसाठी मी निवडून देणाऱ्या मतदारांचा ऋणी राहीन”, असं आपल्या उत्तरात राहुल गांधींनी म्हटलं आहे.

“माझ्या अधिकारांबाबत कोणतीही बाब आडवी न येता मी तुमच्या पत्रात नमूद करण्यात आलेल्या बाबींचं पालन करेन”, असंही पत्राच्या शेवटी राहुल गांधींनी नमूद केलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi responds notice by loksabha house committee 12 tughlak lane pmw
First published on: 28-03-2023 at 18:03 IST