काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून टिप्पणी केली होती. सगळे चोर मोदीच का असतात? अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. यानंतर गुजरातमधील भाजपा आमदाराने राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. राहुल गांधींनी मोदी समजाचा अपमान केला, असा आरोप राहुल गांधींवर करण्यात आला होता. याप्रकरणी सुरतमधील सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. खासदारकी रद्द केल्यानंतर राहुल गांधींना आणखी एक धक्का बसला आहे. लोकसभा हाऊस कमिटीने राहुल गांधींना नोटीस बजावली आहे. या नोटीसद्वारे राहुल गांधी यांचं शासकीय निवासस्थान रिकामा करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना दिल्लीतील १२, तुगलक लेन येथील शासकीय बंगला रिकामा करावा लागणार आहे. विशेष म्हणजे सुरत न्यायालयाच्या निकालाविरोधात काँग्रेस पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी प्रलंबित असताना लोकसभा हाऊस कमिटीने राहुल गांधींना शासकीय बंगला रिकामा करण्याचा आदेश दिला आहे. खरं तर, कोणताही खासदार अपात्र ठरला तर लोकसभा हाऊस कमिटीकडून नोटीस दिली जाते. याचाच एक भाग म्हणून लोकसभा हाऊस कमिटीने राहुल गांधींना शासकीय बंगला रिकामा करण्याची नोटीस बजावली आहे.