आपल्या कामाच्या पद्धतीमुळे अल्पावधीत अनेकदा बदली झालेल्या अधिकाऱ्यांची अनेक उदाहरणं आसपास आहेत. कधी वरिष्ठांना किंवा कधी आसपासच्या इतर लोकांना नकोशा झालेल्या व्यक्तीचीही बऱ्याचदा बदली झाल्याचं आपण बघतो. पण हा अल्पावधी म्हणजे किती असावा? तर आयुष्यभर रेल्वे विभागासाठी सेवा दिलेल्या एका ज्येष्ठ रेल्वे अभियंत्याची चक्क निवृत्तीआधी फक्त तीन दिवसांसाठी बदली करण्यात आली आहे. त्यामुळे छत्तीसगडच्या बिलासपूर विभागातून निवृत्तीच्या तयारीत असणारा हा अधिकारी अवघ्या तीन दिवसांसाठी दिल्लीत रुजू झाला आहे. पण हा सगळा संताप या अधिकाऱ्यानं वरीष्ठांना एक खरमरीत पत्र लिहून त्यातून व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमका काय आहे प्रकार?

हा सगळा प्रकार छत्तीसगडच्या बिलासपूर रेल्वे विभागात घडला. के. पी. आर्या हे गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेचे ज्येष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते. येत्या ३० नोव्हेंबर रोजी ते पदावरून निवृत्त होत आहेत. पण आख्खं आयुष्य सेवा दिलेल्या विभागातून निवृत्तीच्या तयारीत असणाऱ्या के. पी. आर्या यांना विभागानं कारकिर्दीच्या शेवटच्या तीन दिवसांसाठी छत्तीसगडहून थेट दिल्लीत बदली दिली आहे. त्यामुळे मंगळवारी आर्या शेवटच्या तीन दिवसांची सेवा देण्यासाठी दिल्ली कार्यालयात रुजू झाले!

बदली नव्हे, बढती!

दरम्यान, ही फक्त बदली नसून आर्या यांच्यासाठी बढती असल्याचं विभागाकडून सांगण्यात आलं आहे. वरच्या श्रेणीत त्यांची बदली करण्यात येणार असून बदली शुल्क म्हणून त्यांना अतिरिक्त तीन लाख रुपयेही देण्यात येणार आहेत. मात्र, त्यावर के. पी. आर्या यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासाठी त्यांनी वरीष्ठांना एक खरमरीत पत्रच लिहिलं आहे.

याला म्हणतात नशीब! कारकुनाच्या ‘त्या’ चुकीमुळे पालटलं नशीब; वृद्ध व्यक्ती रातोरात बनला करोडपती

“ही बदली म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. आपलं आयुष्य रेल्वेसाठी दिलेल्या एका कर्मचाऱ्याची बदली करणं हा मूर्खपणा आहे. यामुळे माझे निवृत्तीनंतरचे कार्यालयीन सोपस्कार अवघड होऊन बसतील आणि त्याचा मला मनस्ताप होईल”, असं आर्या यांनी या पत्रात नमूद केलं आहे. पीटीआयनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.

बदली मूल्य म्हणून मिळणार ३ लाख रुपये!

“मला दिल्लीत बदली देण्यात आलेल्या श्रेणीचं पद माझ्या सध्याच्या विभागातही रिक्त असूनही मला दिल्लीत त्याच पदावर बदली देण्यात आली आहे. फक्त तीन दिवस मी तिथे काम करेन. त्यासाठी विभागाकडून मला तीन लाख रुपये देण्यात येणार आहेत. हा जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे. विभागातील वाईट प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांकडून मला मनस्ताप देण्यासाठी हे सगळं केलं जात आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांचा पर्दाफाश करणं हे मी माझं कर्तव्य समजतो”, असंही आर्या यांनी पत्रात नमूद केलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway engineer write seniors for transfer before three days of retirement pmw