वाराणसीमधील ज्ञानवापी मशीदीच्या परिसरातल्या व्यासजी तळघरात पूजा केली जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून व्यासजी तळघरात हिंदू भाविक देवाची पूजा आणि आरती करत आहेत. वाराणासी जिल्हा न्यायालयाच्या आदेशांनंतर १ फेब्रुवारी २०२४ रोजी मशीद परिसरातील बॅरिकेड्स हटवण्यात आले आणि ३० वर्षांनंतर या परिसरात हिंदूंना प्रवेश मिळाला. ३१ जानेवारी या दिवशी न्यायालयाने आदेश दिला की, हिंदू पक्षकार ज्ञानवापी परिसरात पूजाअर्चा करु शकतात.

दरम्यान, काही मुस्लीम संघटना व्यासजी तळघरातील पूजेच्या आणि त्यासंबंधीच्या वाराणासी जिल्हा न्यायालयाच्या आदेशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज (१ एप्रिल) सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने म्हटलं की, व्यासजी तळघरात होणारी पूजा आणि आरती चालू ठेवता येईल. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी घालण्यास नकार दिला. दरम्यान, न्यायालयाने मुस्लीम पक्षकारांच्या याचिकेवर हिंदू पक्षकारांना नोटीस पाठवली आहे. न्यायालयाने यामध्ये म्हटलं आहे की, आमच्या हस्तक्षेपाशिवाय सध्याच्या स्थितीत कोणत्याही पक्षाने कोणताही बदल करू नये.

तत्पूर्वी, मुस्लीम पक्षकार वाराणासी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयातही गेले होते. अलाहाबाद उच्च न्यायालयानेदेखील मुस्लीम पक्षाकारांची मागणी फेटाळली होती. तसेच व्यासजी तळघरात चालू असलेल्या पूजा आणि आरतीवरी बंदी घालण्यास नकार दिला होता.

जुलै २०२३ मध्ये वाराणसी जिल्हा न्यायालयाने भारतीय पुरातत्व विभागाला मशिदीमध्ये वैज्ञानिक सर्व्हे करण्याचे निर्देश दिले होते. मशिदीच्या आवारात यापूर्वी हिंदू मंदिर अस्तित्त्वात होते का? याचे पुरावे शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्याची परवानगी देण्यात आली होती. वाराणसीमधील प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिराच्या बाजूला ज्ञानवापी मशीद आहे. याच ज्ञानवापी मशीद परिसरात अगोदर मंदिर होते, असा दावा केला जातो; तर मुस्लीम पक्षकारांने अनेकदा हा दावा फेटाळून लावला आहे. हा वाद सध्या न्यायालयात पोहोचलेला आहे. २०२२ मध्ये पाच हिंदू महिलांनी ज्ञानवापी मशीद परिसराच्या बाहेरच्या भिंतीला लागून असलेल्या माँ श्रीनगर गौरीची पूजा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यासाठी या महिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच चर्चेत आलं होतं.

हे ही वाचा >> “मी पुढचे १०० दिवस व्यस्त, मात्र शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी…”, रिझर्व्ह बँकेला पंतप्रधान मोदींचं मोठं आश्वासन

१९९३ साली थांबली होती पूजा!

दरम्यान, १९९३ साली म्हणजेच ३० वर्षांपूर्वी तळघरातील ‘व्यास जी का तहखाना’ भागात होणारे पूजाविधी थांबले होते. तोपर्यंत व्यास कुटुंबाकडून या भागात पूजाविधी केले जात होते. मात्र, तत्कालीन राज्य सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार या भागातील पूजाविधी थांबवण्यात आले होते.