भारतीय रिझर्व्ह बँकेचा आज (१ एप्रिल) ९० वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा विकसित भारताचा नारा दिला. तसेच मोदी म्हणाले विकसनशील भारताचा विकसित भारत होण्याच्या प्रवासात रिझर्व्ह बँकेची महत्त्वाची भूमिका असेल. रिझर्व्ह बँकेने गेल्या १० वर्षांमध्ये भारताची बँकिंग व्यवस्था आणि अर्थव्यवस्था रुळावर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परंतु, गेल्या १० वर्षांमध्ये आपण केलेली कामं केवळ एक ट्रेलर आहे. चित्रपट येणं अद्याप बाकी आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, २०१४ मध्ये रिझर्व्ह बँकेच्या ८० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मी सहभागी झालो होतो. तेव्हाची परिस्थिती थोडी वेगळी होती. तेव्हा आपल्या बँकिंग क्षेत्रासमोर अनेक आणि मोठी आव्हानं होती. एनपीए आणि अस्थिर प्रणालीमुळे देशाची जनता भारताच्या बँकिंग क्षेत्राच्या भविष्याबाबत चिंतेत होती. कोलमडलेल्या बँकिंग क्षेत्रामुळे अर्थव्यवस्थेला कोणतंही सहाय्य मिळत नव्हतं. देश एकाच वेळी दोन-दोन आघाड्यांवर लढत होता. परंतु, गेल्या १० वर्षांमध्ये स्थिती सुधारली आहे. आरबीआय आणि सरकारने मिळून केलेल्या कामांमुळे देशाच्या बँकिंग क्षेत्राने भरारी घेण्यास सुरुवात केली आहे.
हे ही वाचा >> केजरीवाल तिहार जेलमध्ये रामायणासह पंतप्रधानांबाबतचं ‘हे’ पुस्तक वाचणार, न्यायालयाकडे ‘या’ वस्तूंसाठी परवानगी अर्ज
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचा नारा देताना काही घोषणादेखील केल्या. तसेच ते म्हणाले, “पुढचे १०० दिवस मी थोडा निवडणुकीत व्यस्त असेन. तुम्ही सर्वजण (आरबीआय आणि बँकिंग क्षेत्रांशी संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि संस्था) या काळात तयारी करून ठेवा. भारताची आत्मनिर्भरता पुढच्या १० वर्षांसाठी वाढवायची आहे. जागतिक स्तरावर आर्थिक क्षेत्रात जे काही चढ-उतार होत आहेत, मंदीसारखी आव्हानं आहेतच, या सगळ्यांचा आपल्या अर्थव्यवस्थेवर कमी परिणाम व्हावा यासाठी आपण काय करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण काय काय करू शकतो ते ठरवा, आपण नवीन क्षेत्रांमध्ये काय करू शकतो त्याबाबत विचार करून ठेवा. कारण पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपण या क्षेत्रासाठी नवे निर्णय घेणार आहोत, नव्या हालचाली करणार आहोत.” मोदी यांनी एकप्रकारे आरबीआयला पुढील ५-१० वर्षासाठीच्या योजनांवर आणि धोरणांवर काम करण्यास सुचवलं आहे. शपथविधीनंतर दुसऱ्या दिवशी त्यासंबंधीचे निर्णय घेतले जातील असं आश्वासनही त्यांनी आज दिलं आहे.