साराभाई राष्ट्रीय शिक्षक-वैज्ञानिक पुरस्कार प्रदान

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अहमदाबाद : ‘सुपर ३०’चे संस्थापक आणि गणितज्ञ आनंद कुमार यांना राष्ट्रीय शिक्षक वैज्ञानिक परिषद (एनसीटीएस)कडून ‘साराभाई टिचर्स सायंटिस्ट नॅशनल ऑनररी अवॉर्ड २०२१’ देऊन गौरविण्यात आले.

गणित विषय सोप्या पद्धतीने शिकवणे आणि गरीब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून ‘आयआयटी’ची प्रवेश परीक्षा ‘जेईई’मध्ये यश प्राप्त करून देणे यासाठी आनंद कुमार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. आनंद कुमार गेल्या २० वर्षांहून अधिक काळ ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. रविवारी शिक्षक दिनी झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमात हा पुरस्कार देऊन गौरवण्याबरोबरच त्यांना राष्ट्रीय शिक्षक वैज्ञानिक परिषदेचे आजीवन सभासदत्वही बहाल करण्यात आले असल्याची माहिती ‘एनसीटीएस’चे अध्यक्ष चंद्रमौली जोशी यांनी दिली. गुजरातमधील रमन विज्ञान आणि तंत्रज्ञान फाऊंडेशनने शिक्षकांमध्ये वैज्ञानिक विचारप्रणाली विकसित करण्यासाठी ‘एनसीटीएस’ची स्थापना केली. दिल्ली येथे ‘एनसीटीएस’चे मुख्यालय आहे.

आनंद कुमार यांनी पुरस्कार आयोजकांचे आभार मानून करोना महासाथीच्या काळात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक गरिबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teacher anand kumar gets award for teaching mathematics to poor students zws