पीटीआय, बीना (मध्य प्रदेश) : विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीला सनातन धर्म नष्ट करायचा आहे आणि देशाला एक हजार वर्षांच्या गुलामगिरीत ढकलायचे आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील एका कार्यक्रमात केला. ‘इंडिया’ आघाडीचा ‘घमंडिया’ असा पुन्हा उल्लेख करत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात ‘भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या बीना शुद्धीकरण प्रकल्प येथे पेट्रोकेमिकल संकुलाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली. हा प्रकल्प ४९ हजार कोटींचा आहे.
या वेळी राज्यातील अन्य १० इतर औद्योगिक प्रकल्पांचीही पायाभरणी करण्यात आली. यानिमित्त आयोजित सरकारी कार्यक्रमात पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. मोदी म्हणाले की, ‘घमंडिया आघाडीची अलीकडेच मुंबईत बैठक झाली. त्यांच्याकडे कोणतीही धोरणे नाहीत, मुद्दे नाहीत, नेता नाही. त्यांना सनातन धर्म नष्ट करायचा असून त्यावर हल्ला करणे हा त्यांचा छुपा कार्यक्रम आहे.’ महात्मा गांधींनीही सनातन धर्मापासून प्रेरणा घेतली आणि त्यांची स्वातंत्र्य चळवळ ही सनातन धर्माला केंद्रित ठेवून चालवण्यात आली, असा दावाही मोदी यांनी केला.
इंदूरच्या अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळक यांनीही सनातन धर्मापासून प्रेरणा घेतली होती अशी पुस्ती पंतप्रधानांनी जोडली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे पुत्र व राज्यातील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्यासह ‘इंडिया’ आघाडीचा घटक असलेल्या द्रमुकच्या अनेक नेत्यांनी सनातन धर्मावर उघड टीका केली आहे. भाजपने हा मुद्दा उचलून धरला असून पंतप्रधानांनी गेल्याच आठवडय़ात विरोधकांना योग्य प्रकारे उत्तर देण्याचे आदेश पक्ष कार्यकर्ते व नेत्यांना दिले होते. त्यानंतर आता स्वत: मोदींनीही विरोधकांना तिखट शब्दांत लक्ष्य केले आहे.
काँग्रेसची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला काँग्रेसने उत्तर दिले. पंतप्रधान केवळ दुसऱ्यांचा अपमान करण्यात पटाईत आहेत. ‘इंडिया’च्या तथाकथित ‘घमंडिया’ घटक पक्षांसाठी ते वारंवार अपशब्द वापरतात असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर केला. या वेळी त्यांनी एनडीएचा उल्लेख गौतम अदानींची एनडीए असा करत सरकारी कार्यक्रमांचा वापर विरोधकांवर शाब्दिक हल्ला चढवण्यासाठी केला जात असल्याची टीका त्यांनी केली.
ते आता उघडपणे बोलू लागले आहेत. ते आपल्यावरील हल्ला अधिक तीव्र करणार आहेत. त्यांना सनातन धर्म नष्ट करायचा आहे आणि देशाला हजार वर्षांच्या गुलामगिरीत ढकलायचे आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान