काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभा खासदार शशी थरुर सोमवारी सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले होते. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु झाल्याच्या निमित्ताने शशी थरुर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटला महिला खासदारांसोबतचा एक फोटो ट्विट केला होता. मात्र यावेळी त्यांनी दिलेली कॅप्शन अनेकांना आक्षेपार्ह वाटल्याने टीका आणि ट्रोल होण्यास सुरुवात झाली. दरम्यान यानंतर शशी थरुर यांनी माफी मागत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान यावेळी फोटोत असणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री मिमी चक्रवर्ती यांनीदेखील यावर प्रतिक्रिया देत शशी थरुर यांचा बचाव केला आहे.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, पटियालाच्या खासदार प्रनीत कौर, दक्षिण चेन्नईच्या खासदार थमिझाची थंगापांडियन, जादवपूरच्या खासदार मिमी चक्रवर्ती, बशीरहाटच्या खासदार नुसरत जहाँ आणि करूरच्या खासदार एस जोथिमनी यांच्यासोबत एक फोटो पोस्ट केला होता.
“कोण म्हणतं लोकसभा ही कामासाठी आकर्षक जागा नाही? सकाळी माझ्या सहकारी खासदारांसोबत,” असं कॅप्शन यावेळी त्यांनी दिलं होतं.
शशी थरुर यांच्या या कॅप्शनवरु नेटकऱ्यांसोबत काही राजकारण्यांनीही नाराजी जाहीर करत टीका केली. खासदार राजेश नागर यांनी ट्विट करत म्हटलं की, “मिस्टर थरुर…लोकसभा ही महिलांसोबत सेल्फी घेण्याची आणि त्यांना आकर्षक म्हणण्याची जागा नाही. तुम्ही भविष्यातील खासदारांसाठी चुकीचं उदाहरण ठेवत आहात”.
दरम्यान मिमी चक्रवर्ती यांनी राजेश नागर यांच्या ट्विटला उत्तर देताना सेल्फी शशी थरुर यांनी नाही तर मी घेतला असं सांगत त्यांचा बचाव केला.
शशी थरुर यांची माफी
वाद वाढू लागल्यानंतर शशी थरुर यांनी माफी मागितली. थरूर यांनी काही लोक दुखावले गेल्याबद्दल माफी मागितली आणि महिला खासदारांच्या पुढाकाराने हा फोटो विनोदी पद्धतीने काढण्यात आल्याचे सांगितले आणि त्यांनीच मला त्याच भावनेने ट्विट करण्यास सांगितले, असेही थरुर यांनी म्हटलं.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली असून २३ डिसेंबरपर्यंत सुरु असणार आहेत.