लोकसभा निवडणुकीत उसळलेली लाट रोखून भारतीय जनता पक्षाला बिहारमध्ये नेस्तनाबूत करणाऱ्या नितीशकुमार यांच्या शपथविधी समारंभासाठी देशातील सर्व प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. नितीशकुमार व लालूप्रसाद यांच्या विजयामुळे उत्तर भारतीय राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. त्यामुळे भाजपविरोधी राजकीय पक्षांच्या नेत्यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण पाठवून नितीशकुमार यांनी शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिहार व उत्तर प्रदेशमधून भाजपला लोकसभेत सर्वाधिक ९३ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे आता बिहारपाठोपाठ उत्तर प्रदेशच्या राजकारणातही भाजपविरोधी राजकीय पक्षांची एकजूट होण्याची शक्यता आहे. या रणनीतीसाठी नितीशकुमार यांनी सपचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांनादेखील निमंत्रण देण्यात आले असले तरी दोन्ही नेते उपस्थित राहणार नाहीत. येत्या २० नोव्हेंबर रोजी नितीशकुमार यांची शपथविधी पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानात होईल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी या सोहळ्यास उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या सोहळ्यासाठी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तसेच प्रादेशिक पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बिहारमधील पराभवाचे गणित मांडताना महाआघाडीतील मतांचे एकत्रित ध्रुवीकरण झाल्याचे कारण पुढे केले होते. लोकसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे लढणाऱ्या महाआघाडीतील घटक पक्षांची एकत्रित टक्केवारी एकटय़ा भाजपपेक्षा जास्त होती. त्यामुळे भाजपविरोधी पक्ष प्रामाणिकपणे एकत्र लढल्यास आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला फटका बसू शकतो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top leaders to attend nitish kumar swearing in