Uproar in Rajya Sabha over Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताची कुस्तीपटू विनेश फोगटला अपात्र ठरविल्यानंतर त्याचे पडसाद देशभरात उमटल्याचे पाहायला मिळाले. आज (दि. ८ ऑगस्ट) राज्यसभेत विरोधकांनी विनेश फोगट अपात्र का ठरली? त्यामागे कोणती कारणे होती? या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र सभापतींनी दैनंदिन कामकाजादरम्यान चर्चेस नकार दिला असताना विरोधकांनी गोंधळ घातला. त्यानंतर सभापतींनी विरोधकांना सुनावल्यानंतर विरोधकांनी सभात्याग करून सरकारचा निषेध केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी केल्यानंतर सभापती जगदीप धनकड यांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांचे नाव घेत त्यांना खडे बोल सुनावले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, विनेश फोगट अपात्र का ठरली? यामागचे खरे कारण समोर यायला हवे. बुधवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यापूर्वी विनेश फोगटचे वजन फक्त १०० ग्रॅम अधिक भरल्यामुळे तिला अपात्र ठरविण्यात आले होते.

हे वाचा >> Bajrang Punia Claim: “तिला हरवलं गेलं…”, विनेश फोगटच्या निवृत्तीनंतर बजरंग पुनियाचं मोठं विधान

देशाच्या दृष्टीने विनेश फोगटचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. या अपात्रतेला जबाबदार कोण आहे? हे देशाला कळले पाहिजे, अशीही मागणी मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. यावर उत्तर देताना सभापती धनकड म्हणाले की, ऑलिम्पिकमधील अपात्र प्रकरणामुळे संपूर्ण देश दुःखात आहे. या प्रकरणाचे राजकारण कुणीही करू नये.

हे ही वाचा >> Vinesh Phogat Retirement : “…म्हणून विनेशने निवृत्तीची घोषणा केली”, काका महावीर फोगट यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “यंदाचं सुवर्णपदक…”

फक्त तुम्हालाच दुःख झाले काय?

सभापती जगदीप धनकड पुढे म्हणाले, “विरोधकांना वाटते की, फक्त त्यांनाच दुःख झाले आहे. विनेश फोगट पदकाला मुकल्यानंतर संपूर्ण देश हळहळला. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मी स्वतः दुःखात आहे. या मुद्द्याचे राजकारण करून विरोधकांनी विनेशबद्दल अनादर व्यक्त केला आहे. तिचा संघर्ष खूप मोठा आहे. मला आनंद होत आहे की, हरियाणा सरकारने तिला पदक विजेती म्हणून ग्राह्य धरत सर्वतोपरी मदत देण्याची भूमिका घेतली आहे. पदकविजेत्याला जी रक्कम दिली जाते, ती देण्याचेही हरियाणा सरकारने आश्वासन दिले आहे.”

सभापतींच्या निवेदनानंतरही विरोधकांनी चर्चेची मागणी रेटून धरली. त्यामुळे संतापलेल्या सभापतींनी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना बसून न बोलण्याची सूचना केली. तसेच सभागृहाची मर्यादा विरोधकांनी पाळावी, असा इशाराही दिला. “तुमचे वर्तन सभागृहाच्या नियमात बसणारे नाही. मी तुमच्या वर्तनाचा निषेध करतो. पुढच्यावेळी मी तुम्हाला सभागृहाच्या बाहेर काढून टाकेल”, असा धमकीवजा इशाराच सभापतींनी विरोधक खासदारांना दिला.

विरोधकांच्या गोंधळाने सभापती व्यथित होऊन म्हणाले, तुम्ही हसू नका. (जयराम रमेश) मला तुमची सवय माहिती आहे. काही खासदार चुकीची वक्तव्ये करत आहेत. मी तुमच्या सर्वांचा आदर राखतो. पण आज तुम्ही जो काही गोंधळ घालत आहात, त्यानंतर मी व्यथित झालो आहे.

विरोधकांचा सभात्याग, चर्चेवर ठाम

राज्यसभेतून सभात्याग केल्यानंतर काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “इंडिया आघाडीच्या खासदारांनी विनेश फोगटच्या विषयावरून राज्यसभेतून सभात्याग करत निषेध नोंदविला आहे. तिच्या अपात्र प्रकरणावर चर्चा व्हावी, अशी आमची मागणी होती. मात्र सरकार त्यासाठी तयार नाही.” याबरोबरच प्रमोद तिवारी यांनी विनेशने निवृत्ती न घेण्याचा फेरविचार करावा, अशीही मागणी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uproar in rajya sabha over vinesh phogat disqualification from paris olympics 2024 opposition walks out kvg