UPSC Coaching Tragedy : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी देशातील काना-कोपऱ्यातील विद्यार्थी दिल्लीत येत असतात. दिल्लीतील अनेक भागांमध्ये असलेल्या कोचिंग सेंटरमध्ये शिकण्यासाठी हे विद्यार्थी दिल्लीत येऊन राहतात. परंतु, १०-१२ हजारांत या विद्यार्थ्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाच्या जागी राहावं लागतं, हे वारंवार सिद्ध झालं आहे. उत्तर प्रदेशच्या पोलिस उपअधीक्षक अंजली कटारिया यांनी एक व्हीडिओ शेअर करून दिल्लीत न येण्याचं आवाहन त्यांनी युपीएससीच्या उमेदवारांना केलं आहे. UPSC चे विद्यार्थी दिल्लीत कसे राहतात हे या व्हिडिओतून समोर आलं आहे.

दिल्लीमधील जुन्या राजेंद्र नगरमधील RAU’S आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पावसाचं पाणी शिरून यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. दरम्यान, या मुद्द्यावरून संसदेतही मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. देशाच्या राजधानीत घडलेली घटना दुर्दैवी असल्याचं खासदारांनी म्हटलं आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या खासदारांनी दिल्लीमधील कोचिंग सेंटर्समध्ये शिकणाऱ्या, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित केला.

हेही वाचा >> दिल्लीत कारवाईचा धडाका; ‘यूपीएससी’ विद्यार्थी मृत्युप्रकरणी पाच जणांना अटक

घरच्यांचे पैसे वाया घालवू नका

तर, आता खुद्द पोलिसांनीही यावरुन टीका केली. “तुम्ही दिल्लीत १० बाय १० च्या खोलीसाठी १२ ते १५ हजार रुपये भाडं भरता. घर मालकांकडून हे भाडं वाढत जातं. तिथं तुम्ही खोलीत बसून ऑनलाईन व्हिडिओद्वारेच अभ्यास करता. फक्त घरातून लांब जाण्याकरता दिल्लीत येऊ नका. घरच्यांचे पैसे वाया घालवू नका”, असं आवाहन अंजली कटारिया यांनी केलं आहे. (UPSC)

पाच जणांना अटक

दिल्लीमधील जुन्या राजेंद्रनगर भागामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षांची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांच्या मृत्युप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सोमवारी आणखी पाच जणांना अटक केली. तर दिल्ली महापालिकाही सक्रिय झाली असून राजेंद्रनगर, मुखर्जीनगर आणि अन्य ठिकाणी अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू आहे.

दिल्ली पोलीस महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावू शकतात, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. नाल्यांचा गाळ काढणे आणि ‘राव आयएएस स्टडी सर्कल’ला (UPSC) मंजुरी प्रमाणपत्र देणे या प्रश्नांवरून त्यांची चौकशी होऊ शकते असे सूत्रांनी सांगितले.

१२ ऑगस्टपर्यंत आरोपींना न्यायालयीन कोठडी

याप्रकरणी (UPSC) अटक केलेल्या पाच जणांत एका एसयूव्ही चालकाचा समावेश आहे. मनोज कथुरिया असे या चालकाचे नाव आहे. तळघराचे सहमालक असलेल्या तेजिंदर सिंग, परविंदर सिंग, हरविंदर सिंग आणि सरबजीत सिंग यांनाही अटक करण्यात आली आहे. सर्वांना सोमवारी न्यायदंडाधिकारी विनोद कुमार यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी त्यांना १२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.