Warren Buffett : वॉरेन बफे यांनी त्यांच्या बर्कशायर हॅथवे कंपनीचं सीईओपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जागी ग्रेग एबेल यांचं नावही निश्चित झालं आहे. वॉरेन बफे यांनी हा निर्णय जाहीर करताच तिथे असलेल्या उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि वॉरेन बफे यांच्या प्रती असलेला आदर व्यक्त केला. मात्र यावेळीही वॉरेन बफे यांच्या मिश्किल स्वभावाचा अनुभव सगळ्यांनाच आला.

वॉरेन बफे काय म्हणाले?

मी निवृत्तीचीघोषणा केली. नवा उत्तराधिकारी कोण असेल हे जाहीर केलं. त्यानंतर तुम्ही सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केलात. याचे दोन अर्थ निघतात. एक चांगला निघतो आणि दुसरा… असं म्हणत ते म्हणाले मी चांगलाच अर्थ घेतोय हां.. वॉरेन बफेंचं हे वाक्य ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर ते म्हणाले की मी पुढच्या वर्षीही येईन याची मला आशा आहे.

बर्कशायर हॅथवेचं पद या वर्षात वॉरेन बफे सोडणार

वॉरेन बफे यांनी आपण बर्कशायर हॅथवेचं सीईओ पद सोडणार असल्याचं जाहीर केलं तेव्हा तमाम गुंतवणूकदारांना आश्चर्यच वाटलं होतं. वॉरेन बफे हे त्यांच्या अमाप संपत्तीसाठी आणि २६७ अरब डॉलर्सच्या स्टॉक पोर्टफोलिओसाठी ओळखले जातात. त्यामध्ये अॅपल, अमेरिकन एक्स्प्रेस, कोका कोला सारख्या मोठ्या कंपन्याही आहेत. अमाप संपत्तीसाठी वॉरेन बफे ओळखले जातात त्याचप्रमाणे त्यांच्या साधेपणासाठीही ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या संपत्तीचा बहुतांश भाग बिल गेट्स अँड मिलिंडा गेट्ट फाऊंडेशनला दान देण्याचं वचन दिलं आहे. ५४ वर्षे वॉरेन बफे हे बर्कशायर हॅथवेचे कर्मचारी होते. यावर्षी त्यांनी निवृत्त होण्याचा म्हणजेच सीईओ पद सोडण्याचा निर्णय घेतला. आता त्यांचा वारसा ग्रेग एबेल चालवणार आहेत. आपला उत्तराधिकारी ग्रेग एबेल असतील असं त्यांनी जाहीर केलं आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे. वॉरेन बफे यांनी बर्कशायर हॅथवेच्या समभागधारकांच्या वार्षिक बैठकीत आपली निवृत्ती जाहीर केली. २०२५ च्या शेवटापर्यंत ते त्यांचं सीईओ पद सोडतील. ही बाब ऐकून अनेकांना आश्चर्य वाटलं. माझ्या पदावर एबेल यांची नियुक्ती होईल हे वॉरेन बफे यांनी आधीच सांगितलं होतं.

वॉरेन बफे यांच्याकडे अमाप संपत्ती

वॉरेन बफे ९४ वर्षांचे आहेत. ब्लूमबर्गच्या एका वृत्तानुसार त्यांची संपत्ती १६९ अरब डॉलर म्हणजेच जवळपास १४.२ लाख कोटींची आहे. तर फोर्ब्सच्या माहितीनुसार त्यांची संपत्ती १६८.२ अरब डॉलर इतकी आहे. जगातल्या टॉपच्या दहा अब्जाधीशांपेक्षा ही संपत्ती जास्त आहे. एलॉन मस्क, जेफ बेजोस, मार्क झुकेरबर्ग यांच्या संपत्तीचा आलेख खालावला आहे. मात्र बफे यांच्या संपत्तीचा आलेख उंचावतोच आहे. वॉरेन बफे यांनी टेक आणि बँकिंग कंपन्यांमध्ये असलेली त्यांची हिस्सेदारी विकली. तसंच त्यांनी मोठ्या प्रमाणावर रोकड जमा केली आणि त्यांनी रक्कम अमेरिकेच्या ट्रेझरीमध्ये गुंतवणूक केली. आर्थिक विश्लेषकांचं हे म्हणणं आहे की उद्या आर्थिक अडचणी जरी आल्या तरीही वॉरेन बफे हे त्या संकटातून टळू शकतात.