टी-२० वर्ल्ड कप दोन आठवड्यांवर आला असताना जसप्रीत बुमरा खेळू शकेल की नाही, त्याची दुखापत किती गंभीर आहे, याकडे भारतीय क्रीडा जगताचे लक्ष लागले आहे. सुरुवातीला वाटली होती तेवढी बुमराची दुखापत गंभीर नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे बुमरा या अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धेत खेळेल याची खात्री नसली तर सगळ्यांना तशी आशा आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया स्ट्रेस फ्रॅक्चर व स्ट्रेस रिअ‍ॅक्शन या दुखापती नक्की काय आहेत?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्ट्रेस फ्रॅक्चर म्हणजे काय? –

क्रिकेट, टेनिस किंवा भालाफेक सारख्या खेळांमध्ये शरीराच्या विविध अवयवांवर अति ताण व भार असतो त्यामुळे या प्रकारच्या खेळातील अ‍ॅथलीट्सना स्ट्रेस फ्रॅक्चरसारख्या दुखापतींचा सामना करावा लागतो. स्ट्रेस फ्रॅक्चरचे अनेक प्रकार असतात व क्रिकेटच्या बाबतीत तेज गोलंदाजांना या प्रकारच्या दुखापतीला सामोरे जावे लागण्याची शक्यता जास्त असते. चिंतेची बाब म्हणजे या दुखापतीतून सावरायला वेळ लागतो, अशक्तपणाही असतो आणि खेळाडूला काही काळ खेळापासून दूर राहायला लागू शकते.

स्ट्रेस रिअ‍ॅक्शन व स्ट्रेस फ्रॅक्चरमध्ये फरक आहे. दोन्हीही हाडाला होणाऱ्या दुखापतीच आहेत. पण स्ट्रेस रिअ‍ॅक्शन ही स्ट्रेस फ्रॅक्चर होण्यापूर्वीची दशा आहे. जर हाडावर सतत ताण पडत राहिला आणि त्यासंदर्भात योग्य ती काळजी घेतली नाही तर हाडाला सूज येते आणि असे होत राहिलं तर पुढे होणाऱ्या दुखापतीला स्ट्रेस रिअ‍ॅक्शन म्हणतात. स्ट्रेस रिअ‍ॅक्शन ही दुखापत झालेल्या ज्या हाडावर असा स्ट्रेस येतो तिथं त्या हाडाच्या जागी रिमॉडेलिंग किंवा रिफॉर्मिंगची प्रक्रिया सुरू असते. परंतु या प्रक्रियेपेक्षा पडणाऱ्या ताणाचा भार किंवा ‘लोड’ जास्त असेल तर स्ट्रेस फ्रॅक्चरची वेळ येते.

बुमराच्या किंवा तेज गोलंदाजाच्या बाबतीत बोलताना पाठीच्या खालच्या भागातील लहानशा हाडासंदर्भात हा विषय आहे. गोलंदाजी करताना एका विशिष्ट वेळी शरीराचा संपूर्ण भार ०.७५ चौरस सेमी. इतक्या लहानश्या हाडावर असतो. म्हणजे लक्षात येईल की किती लहानसा भाग आहे ज्यावर ‘लोड’ येतं. साधारणपणे अशा ठिकाणी स्ट्रेस फ्रॅक्चर होतं.

एखाद्या गोलंदाजानं या हाडाची काळजी घेतली नाही नी त्यावर सतत भार पडत राहिला तर त्याला जखमा होतात, या स्थितीला स्ट्रेस रिअ‍ॅक्शन म्हणतात. हे असंच होत राहिलं तर मग मात्र शेवटी त्या हाडाला छेद जातो व स्ट्रेस फ्रॅक्चर होतं.

तंदुरूस्त व्हायला किती वेळ लागतो? –

खरंतर हे व्यक्तिनुसार बदलतं, कारण ते अनेक बाबींवर अवलंबून असतं. गोलंदाजी करताना पडलेला भार याखेरीज आहार, हार्मोन्सची पातळी, व्हिटॅमिन डी ३, कॅल्शियमची पातळी अशा गोष्टीही त्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. बॉलिंगची अ‍ॅक्शन, प्रशिक्षण, योग्य व्यायाम आदी गोष्टीही अशा दुखापतीच्या बाबतीत निर्णायक असतात.

लवकर बरं होण्यासाठी प्रथम ज्या गोष्टीमुळे ताण पडतोय ती थांबवायला लागते. बुमराच्या बाबतीत बॉलिंग व पाठीच्या खालच्या भागावर ताण येईल असा जिममधला व्यायाम स्थगित करायला लागतो. त्याचबरोबर आहाराचं नियोजन व रक्तामधले सर्व घटक आवश्यक त्या पातळीवर ठेवावे लागतात. हा कालावधी दोन आठवड्यांपासून सहा महिन्यांपर्यंतचा असू शकतो. जर हाडाला झालेली साधी स्ट्रेस रिअ‍ॅक्शन असेल तर ही समस्या ८ ते १० आठवड्यांत पूर्ण बरी होऊ शकते. पण या दुखापतीचं निदान स्ट्रेस फ्रॅक्चर झालं असेल तर सहा महिनेही लागू शकतात.

तंदुरुस्तीची प्रक्रिया काय असते? –

खेळाडूच्या तंदुरुस्तीचा वैद्यकीय इतिहास वाखणण्याजोगा असेल व आधीपासून योग्य ती काळजी घेतली गेली असेल तर तुंदुरुस्त होण्याची प्रक्रिया तीन महिन्यांपर्यंत कमी आणता येते. त्यामुळे स्ट्रेस रिअ‍ॅक्शन वा फ्रॅक्चर कुठल्या स्तरावर आहे आणि बाकी सगळ्या बाबींची काय स्थिती आहे यावर खेळाडूचं पुनरागमन किती काळात होईल ते ठरतं.

याखेरीज आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे हाडाच्या भोवती असलेल्या शॉक अ‍ॅब्झॉर्बर्सची व पाठीच्या कण्याच्या स्नायूंची अवस्था. जर मसल फटिग किंवा कण्याला आधार देणारे स्नायूही शिथिल झाले असतील तर ते हाडांना अपेक्षित आधार देत नाहीत. तेज गोलंदाजांच्या बाबतीत पोटऱ्यांचे स्नायूही महत्त्वाचे असतात. पहिला शॉक किंवा धक्का पोटऱ्यांच्या स्नायूंना बसतो जो पायांच्या माध्यमातून पाठीच्या कण्यापर्यंत पोचतो. त्यामुळे पोटऱ्यांचे, मांड्यांचे व अन्य संबंधित स्नायू शिथिल असतील, थकलेले असतील तर पाठीच्या खालच्या भागातील त्या छोट्याशा हाडावर अपेक्षेपेक्षा खूप जास्त ‘लोड’ येतं. हे सतत होत राहिलं तर मग हाडाची दुखापत ठरलेलीच असते.

काहीजण म्हणतात बुमराची बॉलिंगची अ‍ॅक्शनच अशी आहे की त्यामुळे ही दुखापत झालीय. परंतु तज्ज्ञांच्या मते तो गेली १५ वर्षे याच अॅक्शनने गोलंदाजी करतोय त्यामुळे ते कारण पटण्यासारखं नाही. त्यामुळे राहता राहिले अन्य मुद्दे. तर विश्रांती घेणे, स्नायूंची शिथिलता घालवून त्यांना बळकट करणे. आहार, निद्रा, रक्तातले सर्व घटक योग्य पातळीवर ठेवणे आणि या माध्यमातून संबंधित हाड पुन्हा ‘लोड’ घेऊ शकेल इतके सक्षम करणे असा हा प्रवास असेल. सगळं योग्य त्या पद्धतीने झाले तर कमाल सहा महिन्यांच्या रिकव्हरीची मर्यादा अत्याधुनिक सोयींनी सज्ज अशा सध्याच्या काळात तीन महिन्यांच्या आत आणता येणं शक्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ही दुखापत करिअर संपवण्याइतकी धोकादायक आहे का? –

काही जणांसाठी हो, करिअर संपू शकतं. एकदम कोवळ्या म्हणजे १४ ते १७ या वयामध्ये तेज गोलंदाजाला पाठीच्या दोन्ही बाजुंना स्ट्रेस फ्रॅक्चर झाला, ज्याला स्पाँडिलॉलिथिसही म्हणतात तर त्या खेळाडूला कदाचित तेज गोलंदाजी नंतर करता येणार नाही. पण स्ट्रेस फ्रॅक्चर एकाच बाजुला झाला असेल स्पाँडिलॉलिथिसची परिस्थिती नसेल तर तेज गोलंदाज म्हणून करिअर संपायची शक्यता नाही. सध्या उपलब्ध उपचार पद्धती, वैद्यकीय पायाभूत सुविधा व जागतिक दर्जाच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन असेल तर करिअरला तितकासा धोका राहत नाही. त्यामुळे जसप्रित बुमराचा विचार केला तर ही त्याच्यासाठी करिअर धोक्यात येईल अशी दुखापत नाहीये, पण तो वर्ल्ड कपमध्ये खेळू शकेल का, त्यापूर्वी रिकव्हर होईल का हा मात्र अजून न उलगडलेला विषय आहे. पाठीच्या दुखण्यामुळे त्याला विश्रांती दिल्याचे सांगण्यात आलंय. त्याची दुखापत स्ट्रेस फ्रॅक्चर नसून स्ट्रेस रिअ‍ॅक्शन असेल व ती अत्यंत सुरुवातीच्या स्थितीत असेल तर रिकव्हरीचा काळ काही आठवडेच असेल. तसंच वैद्यकीयदृष्ट्या बाकी सर्व बाबी अनुकूल असेल तर बुमराची रिकव्हरी अत्यंत वेगाने होऊ शकते. दक्षिण अफ्रिकेविरोधातील मालिकेला बुमरा मुकला असला तरी तो वर्ल्ड कप खेळू शकेल का हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained jasprit bumrahs back pain what is a stress fracture how long does it take to recover
First published on: 02-10-2022 at 17:51 IST