अन्वय सावंत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय संघाला ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ‘अव्वल १२’ फेरीच्या सामन्यात रविवारी दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. भारताने या स्पर्धेची चांगली सुरुवात केली होती. पहिल्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारताने नेदरलँड्सचाही मोठ्या फरकाने पराभव केला होता. मात्र, आफ्रिकेविरुद्ध फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील चुकांचा भारताला फटका बसला. मुंबईकर सूर्यकुमार यादवने आपली लय कायम राखताना झुंजार अर्धशतकी खेळी केली. मात्र, त्याला इतरांची साथ लाभली नाही. क्षेत्ररक्षणात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या सर्वांत अनुभवी खेळाडूंनी क्षेत्ररक्षण करताना केलेल्या चुकाही भारताला महागात पडल्या. यांसह भारताच्या पराभवामागे अन्यही काही कारणे होती.

राहुलला सातत्याने येणाऱ्या अपयशाचा फटका?

भारताचा सलामीवीर केएल राहुलबाबत गेल्या काही काळात बरीच चर्चा सुरू होती. ‘आयपीएल’ आणि आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये राहुल अधूनमधून धावा करत असला, तरी विशेषत: डावाच्या सुरुवातीला तो बराच वेळ घेतो. त्यामुळे धावगतीवरून (स्ट्राईक रेट) राहुलवर बरीच टीकाही झाली. त्याने ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकांमध्ये धावांची गती वाढवली. तसेच दोन मालिकांमधील पाच सामन्यांत मिळून त्याने तीन अर्धशतकेही झळकावली. मात्र, ट्वेन्टी-२० विश्वचषकात त्याला हे सातत्य टिकवता आलेले नाही. पाकिस्तानविरुद्ध ८ चेंडूंत ४ धावा, नेदरलँड्सविरुद्ध १२ चेंडूंत ९ धावा आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १४ चेंडूंत ९ धावा ही ट्वेन्टी-२० विश्वचषकातील राहुलची कामगिरी भारतासाठी चिंतेचा विषय आहे. तो कौशल्यपूर्ण वेगवान गोलंदाजांविरुद्ध चाचपडताना दिसतो आहे. तसेच त्याच्यात आत्मविश्वासाचीही कमतरता आहे. तो लवकर बाद होत असल्याने मधल्या फळीतील फलंदाजांवरही अतिरिक्त दडपण येते आहे. त्यामुळे आगामी सामन्यांत त्याला वगळण्याबाबत भारतीय संघाला विचार करावा लागणार आहे.

क्षेत्ररक्षणातील चुका पडल्या महागात?

भारतीय संघाने गेल्या दशकभराच्या कालावधीत आपल्या क्षेत्ररक्षणाचा स्तर बराच उंचावला आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध क्षेत्ररक्षणात केलेल्या चुका भारताला महागात पडल्या. रविचंद्रन अश्विनने टाकलेल्या आफ्रिकेच्या डावातील १२व्या षटकात विराट कोहलीने मार्करमचा सोपा झेल सोडला. त्यावेळी आफ्रिकेला ५० चेंडूंत ७१ धावांची आवश्यकता होती. त्यापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्माने मार्करमला धावचीत करण्याची संधी दवडली. तसेच १३व्या षटकात मिलरला धावचीत करण्यातही रोहित चुकला. या जीवदानांचा फायदा घेत मार्करम (५२) आणि मिलर (नाबाद ५९) यांनी अर्धशतके करत आफ्रिकेला विजय मिळवून दिला.

अश्विनची निवड चुकली?

गेली तीन-चार वर्षे लेगस्पिनर युजवेंद्र चहल ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा प्रमुख फिरकीपटू आहे. मात्र, गेल्या वर्षी संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठीच्या भारतीय संघातून चहलला डावलण्यात आले होते. यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी त्याला भारतीय चमूत स्थान मिळाले, पण सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही. पहिल्या दोन सामन्यांत ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलला अंतिम ११ जणांमध्ये स्थान मिळाले. तर पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर झालेल्या आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी अश्विनच्या रूपात एकमेव फिरकीपटू भारताच्या संघात होता. मात्र, अश्विनला फारसा प्रभाव पाडता आला नाही. अश्विनच्या गोलंदाजीवर मार्करमचा झेल सुटला. परंतु हा अपवाद वगळता अश्विनला आफ्रिकेच्या फलंदाजांना अडचणीत टाकता आले नाही. अश्विनच्या गोलंदाजीवर मिलरने तीन, तर मार्करमने एक षटकार मारला. अश्विनने या सामन्यात ४३ धावा खर्ची केल्या आणि केवळ एक गडी बाद केला. भारताच्या अन्य एकाही गोलंदाजाने ३० हून अधिक धावा दिल्या नाहीत. त्यामुळे आता अश्विनच्या जागी चहलला संधी दिली पाहिजे का, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

कार्तिकला वगळून पंतला निवडण्याची वेळ?

ट्वेन्टी-२० विश्वचषकात अनुभवी दिनेश कार्तिक विजयवीराची भूमिका चोख बजावेल अशी भारताला अपेक्षा होती. मात्र, या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाही. कार्तिकने यष्टिरक्षक म्हणून उत्तम कामगिरी केली असली, तरी फलंदाजीत त्याला चमक दाखवता आलेली नाही. पाकिस्तानविरुद्ध अखेरच्या षटकात फलंदाजीला येऊन कार्तिक भारताला सामना जिंकून देईल अशी चाहत्यांना आशा होती. मात्र, कार्तिक केवळ एक धाव करून बाद झाला. त्यानंतर आफ्रिकेविरुद्ध भारताची ५ बाद ४९ अशी स्थिती होती आणि भारताला मोठ्या भागीदारीची आवश्यकता होती. कार्तिक खेळपट्टीवर उभा राहिला, पण त्याला फारशा धावा करता आल्या नाहीत. १५ चेंडूंत ६ धावा करून तो बाद झाला. त्यातच यष्टिरक्षण करत असताना कार्तिकच्या पाठीला दुखापतही झाली. त्यामुळे ‘अव्वल १२’ फेरीतील उर्वरित दोन सामन्यांत कार्तिकच्या जागी पंतला निवडण्याचा भारतीय संघ विचार करू शकेल. पंतचे डावखुरेपणही भारतासाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र, पंतला ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे.

वेगवान गोलंदाजांविरुद्ध भारतीय फलंदाजांची कामगिरी चिंतेचा विषय?

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडीसमोर भारतीय फलंदाजांचा निभाव लागला नाही. पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर एन्गिडीने रोहित शर्मा (१५) आणि केएल राहुल (९) या सलामीवीरांसह लयीत असलेल्या विराट कोहली (१२) आणि हार्दिक पंड्याला (२) माघारी धाडले. तसेच डावखुरा वेगवान गोलंदाज वेन पार्नेलनेही तीन गडी बाद केले. गेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात पाकिस्तानच्या शाहीन शाहा आफ्रिदीनेही सुरुवातीच्या षटकांत भारताला अडचणीत टाकले होते. त्याने राहुल, रोहित आणि विराटला माघारी पाठवले होते. तसेच २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही भारताची अवस्था बिकट झाली होती. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी आणि गुणवान वेगवान गोलंदाजांविरुद्ध भारतीय फलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. विशेषत: संयमाचा अभावही भारतीय फलंदाजांना महागात पडतो आहे. ते उजव्या यष्टीबाहेरील चेंडूला मारण्याच्या प्रयत्नात बरेचदा बाद होतात. तसेच प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाज उसळी घेणारे चेंडू टाकूनही भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकतात. त्यामुळे या चुका सुधारण्याकडे भारतीय फलंदाजांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained on indias defeat against south africa in t20 world cup print exp sgy