स्वातंत्र्यदिनानिमित्त आज पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर झेंडावंदन केले आणि प्रथेप्रमाणे २१ तोफांची सलामी देण्यात आली. यावेळी सलामी देतांना प्रथमच स्वदेशी बनावटीच्या तोफेचाही यामध्ये समावेश करण्यात आला होता. २१ तोफांची सलामी ही ’25 Pounders’प्रकारच्या तोफांनी दिली जाते. यावेळी या तोफांबरोबर Defence Research and Development Organisation (DRDO) म्हणजेच डीआरडीओने विकसित केलेल्या Advanced Towed Artillery Gun System (ATAGS) या तोफेनेही सलामी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या तोफेचा उल्लेखही पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात केला. “आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच २१ तोफांची सलामी देण्यासाठी स्वदेशी बनावटीच्या तोफेचा वापर करण्यात आला आहे. या आवाजाने सर्व भारतीयांना प्रेरणा आणि ताकद मिळेल. आत्मनिर्भर भारताची जबाबदारी योजनाबद्ध पद्धतीने खाद्यांवर घेण्याऱ्या संरक्षण दलाचे यानिमित्ताने मी अभिनंदन करतो” असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.

तोफांच्या २१ फैरीद्वारे सलामी देण्याची पंरपरा

लाल किल्ल्यावर १५ ऑगस्टला तिरंगा फडकल्यावर राष्ट्रगीत जेव्हा सुरु होते तेव्हा ते संपण्याच्या वेळेत भारतीय लष्कराचा तोफखाना विभाग तोफांच्या २१ फैरी झाडत सलामी देतो.

अशा प्रकारच्या तोफांची सलामी इतिहासात पाश्चिमात्य देशांच्या नौदलाकडून दिली जायची. तोफांच्या विशिष्ट फैरी विशिष्ट अंतराने देत आपण हल्ला करण्यासाठी आलेले नाहीत हे सांगण्याचा हा एकप्रकारे प्रयत्न असे. पुढे विविध औचित्य साधत तोफांची सलामी देण्याची परंपरा रुढ झाली. एखाद्या राजाचा राज्यरोहण सोहळा असेल, आनंदोत्सव असेल किंवा विशेष घटना असेल तेव्हा अशा तोफांनी सलामी दिली जाऊ लागली.

ब्रिटीशांनी ही परंपरा भारतात आणली आणि १०१ फैरी झाडत तोफांची सलामी, ३१ तोफांची सलामी, २१ तोफांची सलामी देत विशिष्ट व्यक्तीला त्याच्या हुद्द्यानुसार मान देण्याची पद्धत सुरु केली.

स्वतंत्र भारतात तोफांच्या २१ फैरीद्वारे सलामी देण्याची परंपरा विशिष्ट घटनांकरता निश्चित करण्यात आली. स्वातंत्रदिनी आणि प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकल्यावर राष्ट्रगीत सुरु असतांना तोफांच्या २१ फैरीद्वारे सलामी दिली जाते. एवढंच नाही तर संरक्षण दलाच्या तिन्ही विभागाचे प्रमुख असलेले राष्ट्र्पती यांच्या शपधविधीच्या वेळी अशी सलामी दिली जाते. तसंच विशिष्ट कार्यक्रमांच्या वेळी अशी सलामी दिली जाऊ शकते.

ही सलामी देण्यासाठी दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील, चटकन जागा बदलता येईल अशा अत्यंत कमी वजन असलेल्या ’25 Pounders’ या तोफा सलामी देण्यासाठी वापरल्या जातात. तोफ गोळ्याचे वजन हे २५ पाऊंड ( सुमारे ११.५ किलो) असल्याने या तोफेला ’25 Pounders’ असं सर्रास म्हंटलं जातं. तर यावेळी सलामी देण्यासाठी या तोफांबरोबर स्वदेशी बनावटीच्या ATAGS तोफेचाही वापर करण्यात आला.

ATAGS तोफ कशी आहे?

ATAGS या तोफेचा आराखडा हा DRDO ने २०१३ ते २०१७ दरम्यान निश्चित केला आणि उत्पादनाला सुरुवात झाली. DRDOच्या पुणे इथल्या Armament Research and Development Establishment (ARDE) या संस्थेनेही यामध्ये महत्त्वाची भुमिका पार पाडली आहे. ATAGS ही एक लांबवर मारा करणारी तोफ म्हणून ओळखली जात असून २०१९ पासून या तोफेच्या देशातील विविध भुभागात, विविध वातावरणात चाचण्या सुरु आहेत.

या तोफेचे वजन १८ टन असून या तोफेत वापरला जाणाऱ्या तोफगोळ्याचा व्यास ५२ मिलीमिटर असून लांबी १५५ मिनीमीटर एवढी आहे. तर ४.८ किलोमीटर ते जास्तीत जास्त ४८ किलोमीटर अंतरापर्यंत मारा करण्याची या तोफेची क्षमता आहे. थोडक्यात प्रसिद्ध बोफोर्स तोफेला ATAGS हा स्वदेशी पर्याय निर्माण करण्यात आला आहे. एका मिनीटात पाच तोफगोळे डागण्याची या तोफेची क्षमता असून ही ‘टो’ करत कुठेही वाहून नेता येते. मारक क्षमता आणि नवे तंत्रज्ञान यामुळे ATAGS तोफ आत्ताच्या घडीला जगातील एक अत्याधुनिक तोफ समजली जात आहे.

तर Ordnance Factory Board ने विकसित केलेली बोफोर्सच्या तोडीस तोड अशी ‘धनुष’ही तोफ याआधीच लष्करात दाखल करण्यात आली असून अशा ११४ तोफा लवकरच सेवेत दाखल होतील. आता या जोडीला ATAGS ही तोफ लवकरच दाखल होणार आहे. एवढंच नाही तर लष्कराने तीन हजार ३६४ कोटी रुपये मोजत १५० तोफांची पहिली ऑर्डर याआधीच DRDO ला दिली आहे. तेव्हा तोफांच्या बाबतीत परदेशावरील आपले अवलंबित्व पुर्णपणे संपणार आहे.

आज सलामी देतांना दोन ATAGS तोफांचा वापर करण्यात आला असून एकप्रकारे लष्करात दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे हे संकेत आहेत.

( याबाबतचा मुळ लेख हा इंडियन एक्सप्रेसमध्ये सुशांत कुलकर्णी यांनी लिहीला आहे )

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained significance of new artillery atags used in 21 gun salute at lal kila on independence day asj
First published on: 15-08-2022 at 15:28 IST