गौरव मुठे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक पातळीवर गुंतवणूकदार अमेरिकी मध्यवर्ती बँक  फेडरल रिझव्‍‌र्ह- अर्थात ‘फेड’चे अध्यक्ष जेरोम पॉवेल हे पतविषयक दृष्टिकोन आणि मूल्यमापनाची प्रतीक्षा करत होते. पॉवेल यांच्या आठ मिनिटांच्या भाषणाने अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे  ७८ अब्ज डॉलरचे म्हणजेच सुमारे ६.२४ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

काय म्हणाले जेरोम पॉवेल?

अमेरिकेच्या व्योमिंग राज्यातील जॅक्सन होल या गावात ‘फेड’ची वार्षिक परिषद होत असते. ‘फेड’चे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या भाषणाकडे यंदा जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागले होते. त्यांच्या भाषणातून पतविषयक दृष्टिकोन मांडला जाईल या शक्यतेने जगभरातील गुंतवणूकदारांनी गेल्या काही दिवसांपासून  सावध पवित्रा घेतला, तर काही हवालदिल गुंतवणूकदारांनी  नफावसुलीला प्राधान्य दिले. ‘महागाईविरोधातील लढाई अजूनही संपलेली नाही, ती चालू राहील’ असे पॉवेल यांनी सांगितले. अमेरिकेतील महागाई दराने ४० वर्षांतील उच्चांकी पातळी गाठली आहे. जुलै महिन्यात अमेरिकेत इंधनाचे दर कमी झाल्याने महागाई नरमली. मात्र अजूनही महागाई दर उच्चांकी पातळीच्या जवळ कायम आहे. यामुळे महागाई कमी करण्यासाठी आगामी व्याज दरवाढदेखील आक्रमक राहण्याचे संकेत दिले आहेत. चालू वर्षांत अमेरिकेने व्याज दरात दीड टक्क्याने वाढ केली आहे.

अमेरिकी शेअर बाजारासह जगभरात काय पडसाद उमटले?

जेरोम पॉवेल यांच्या आठ मिनिटांच्या भाषणाने अमेरिकी शेअर बाजारातील मुख्य निर्देशांक डाऊ जोन्स, एस अँड पी, नॅसडक निर्देशांक शुक्रवारच्या सत्रात तीन टक्क्यांहून अधिक घसरले. अमेरिकी शेअर बाजारातील आघाडीच्या कंपन्यांचे समभागदेखील पॉवेल यांच्या आठ मिनिटांच्या भाषणाने कोसळले. अमेरिकेतील भांडवली बाजारातील घसरणीमुळे उद्योगपतींच्या संपत्तीत ७८ अब्ज डॉलरची घसरण झाली. ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले टेस्ला या विद्युत वाहननिर्मिती करणाऱ्या कंपनीचे सर्वेसर्वा एलन मस्क यांच्या संपत्तीत २७ ऑगस्ट रोजी ५.५ अब्ज डॉलरची घसरण होऊन ती २५४ अब्ज डॉलपर्यंत खाली आली आहे. दुसरे सर्वाधिक श्रीमंत असलेले अमेझॉनचे जेफ बेझोस यांच्या मालमत्तेत ६.८ अब्ज डॉलरची घसरण झाली. आघाडीच्या दोन्ही उद्योगपतींच्या मालमत्तेत एकूण १२ अब्ज डॉलरपेक्षा (सुमारे ९६,००० कोटी) अधिक घसरण झाली. मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेट्स यांची संपत्ती २.२ अब्ज डॉलरने, तर वॉरन बफे यांची २.७ अब्ज डॉलरने घटली आहे. सेर्गे ब्रिनची संपत्ती १०० अब्ज डॉलरहून खाली आली. अमेरिकेतील भांडवली बाजारातील घसरणीचे जगभरातील शेअर बाजारांवर पडसाद उमटले. भारतीय शेअर बाजारात व्यवहाराला सुरुवात होताच प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये १,००० हून अधिक अंशांची घसरण झाली. भांडवली बाजारातील तज्ज्ञांच्या मते, देशांतर्गत भांडवली बाजारात येत्या काही सत्रांत मंदीवाल्यांचा पगडा जड राहण्याची शक्यता आहे.

अमेरिकेत आर्थिक मंदीचे संकेत?

‘फेड’कडून गेल्या ४० वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचलेली महागाई कमी करण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येतील. यामुळे अमेरिकेतील नागरिकांना आणि व्यवसायांना येत्या काही दिवसांत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागेल. परिणामी अमेरिकेत मंदी येण्याची भीती पॉवेल यांनी व्यक्त केली आहे. महागाई कमी करण्यासाठी म्हणजे वस्तू-सेवांच्या किमती कमी करण्यासाठी ‘फेड’कडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांमुळे रोजगाराच्या संधीदेखील घटण्याची शक्यता व्यक्त केली.

आठ मिनिटांच्या भाषणाने पडझड का आणि किती?

अमेरिकेसह जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून व्याज दरवाढीचे संकेत मिळत असल्याने देशांतर्गत पातळीवर गेल्या काही दिवसांत सावरलेल्या भारतीय भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी समभाग विक्री करून नफावसुलीला प्राधान्य दिले. भारतीय बाजार सुरू होताच मंदीवाल्यांनी ताबा घेतल्याने अवघ्या काही मिनिटांत गुंतवणूकदारांची ४ लाख कोटींची मत्ता लयाला गेली. मुंबई शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३.९७ लाख कोटींनी कमी होत २७६.९६ लाख कोटींवरून थेट २९२.९८ लाख कोटींपर्यंत खाली आले. जपान, भारतासह युरोपातील प्रमुख देशांच्या भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांमध्ये तीन टक्क्यांहून अधिक पडझड झाली. अमेरिकेत गुंतवणूकदारांची सुमारे ६.२४ लाख कोटींची मालमत्ता लयाला गेली.

भारतीय भांडवली बाजारावर काय परिणाम होणार?

अमेरिकेत व्याजाचे दर वाढणार असल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफआयआय) पुन्हा एकदा स्वदेशी गुंतवणूक करण्यात धन्यता मानेल. कारण भारतीय भांडवली बाजारापेक्षा अमेरिकेतील भांडवली बाजार त्यांच्यासाठी अधिक आकर्षक बनतील. गेल्या नऊ महिन्यांपासून देशांतर्गत भांडवली बाजाराकडे पाठ फिरवलेल्या एफआयआयने ऑगस्ट महिन्यात भारतीय भांडवली बाजारात पुन्हा सक्रिय होत ५०,००० कोटींची गुंतवणूक केली होती तसेच ऑगस्ट महिन्यात सेन्सेक्सने पुन्हा ६०,००० अंशांची पातळी गाठली होती. आता मात्र संभाव्य व्याज दरवाढीमुळे पुन्हा एकदा परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजाराकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे.

इतर कोणते घटक भांडवली बाजारावर परिणाम करतील?

अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या अध्यक्षांनी व्याज दरात वाढीचे संकेत दिल्याबरोबर भारतीय रुपयावर परिणाम दिसून आला. डॉलरच्या तुलनेत रुपयाने आधीच जुलै महिन्यात ८० प्रति डॉलरची नीचांकी पातळी गाठली. त्यांनतर रिझव्‍‌र्ह बँकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे तो सावरला होता. आता मात्र पॉवेल यांच्या वक्तव्यानंतर त्याने डॉलरपुढे पुन्हा नांगी टाकत ८० रुपयांची पातळी गाठली. शिवाय अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून स्पष्ट आणि आक्रमक दरवाढीचे संकेत मिळाल्यानंतर रिझव्‍‌र्ह बँकेकडून पुन्हा एकदा मोठी व्याज दरवाढ अपेक्षित आहे. रेपो दरात संभाव्य वाढीमुळे देशातील बँकांकडून कर्जाचे दर वाढवले जातील. ज्याचा थेट परिणाम कर्जदारांच्या ईएमआय अर्थात कर्ज हप्ता वाढीवर होईल. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर पुन्हा १०० डॉलर प्रतिपिंपापुढे गेल्याने आयात खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. देशपातळीवर आयात महागल्याने व्यापार तूट विक्रमी पातळी गाठण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained speech stock market investors globally print exp 0822 ysh
First published on: 30-08-2022 at 00:02 IST