सचिन दिवाण sachin.diwan@ expressindia.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेचा विरोध डावलून भारताने रशियाकडून एस-४०० ट्राएम्फ क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेण्यासाठी नुकताच केलेला करार बराच गाजला. डोकलाम प्रश्नावरून चीनशी दुरावलेले संबंध आणि पाकिस्तानच्या वाढत्या दहशतवादी कारवाया यांच्या पाश्र्वभूमीवर भारताला या क्षेपणास्त्रांची तातडीने गरज होती. मात्र अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत आणि युक्रेनमध्ये केलेल्या कथित हस्तक्षेपामुळे अमेरिकेने रशियावर निर्बंध लादले होते. रशियाशी संरक्षण करार करणाऱ्या देशांवरही अमेरिकी निर्बंध लादले जाण्याची शक्यता होती. मात्र भारताने साधारण ५ अब्ज डॉलरचा हा करार पुढे नेला. तत्पूर्वी चीनने ही क्षेपणास्त्रे मिळवल्याने भारताची चिंता वाढली होती.

एस-४०० ही रशियाची जमिनीवरून हवेत मारा करणारी, लांब पल्ल्याची अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे. त्याला नाटो संघटनेने एसए-२१ ग्राऊलर असे नाव दिले आहे. त्याद्वारे ३० किमी उंचीवरील आणि ४०० किमी अंतरावरील क्षेपणास्त्रे, विमाने, ड्रोन आदी पाडता येतात. यातील रडार साधारण ६०० किमी अंतरावरील १०० लक्ष्यांचा एका वेळी शोध घेऊन त्यातील सहा लक्ष्ये एका वेळी नष्ट करू शकते. त्यासाठी एस-४०० प्रणालीत चार प्रकारची वेगवेगळ्या पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. त्यातील ‘९ एम ९६ ई’  हे क्षेपणास्त्र ४० किमीवरील लक्ष्याचा वेध घेऊ शकते. ‘९ एम ९६ ई २’ हे क्षेपणास्त्र १२० किमीवर मारा करू शकते. ‘४८ एन ६’ हे क्षेपणास्त्र २५० किमीवर, तर ‘४० एन ६’ हे क्षेपणास्त्र ४०० किमीवर मारा करू शकते.

रशियाने १९८०च्या दशकाच्या अखेरीस एस-४०० विकसित करण्यास सुरुवात केली आणि २००७ साली ही यंत्रणा रशियन सेनादलांत सामील झाली. रशियातील मॉस्कोसह काही शहरांना या प्रणालीचे संरक्षण आहे. रशियाने सीरियातील नाविक आणि हवाई तळ आणि युक्रेनकडून बळकावलेल्या क्रिमिया प्रांतात एस-४०० प्रणाली तैनात केली आहे.

एस-४०० ही त्यापूर्वीच्या एस-३०० या क्षेपणास्त्र प्रणालीची सुधारित आवृत्ती आहे. तिला नाटोने एसए-१० ग्रंबल असे नाव दिले होते. त्यातील ‘४८ एन ६ ई’ या क्षेपणास्त्राचा पल्ला ५ ते १५० किमी आहे.  ती अधिकतम ३० किमी उंची गाठू शकतात. सोव्हिएत सेनादलांत ती १९७९ पासून कार्यरत आहेत. भारतीय सेनादलांत एस-३०० प्रणाली यापूर्वीच कार्यान्वित आहे.

रशियाची एस-४०० प्रणाली अमेरिकेच्या अत्याधुनिक टर्मिनल हाय अल्टिटय़ूड एरिया डिफेन्स (थाड) प्रणालीपेक्षा वरचढ असल्याचे मानले जाते. थाड प्रणाली शत्रूची क्षेपणास्त्रे त्यांच्या अंतिम टप्प्यात (टर्मिनल फेज) पाडू शकते. तिचा पल्ला २०० किमी आहे आणि त्यातील क्षेपणास्त्रे अधिकतम १५० किमी उंची गाठू शकतात. त्यात गतिज ऊर्जेवर (कायनेटिक एनर्जी) आधारित शस्त्रे वापरली आहेत. ती शत्रूच्या क्षेपणास्त्रावर वेगाने धडकून त्याला नष्ट करतात. मात्र थाड शत्रूची क्षेपणास्त्रे सुरुवातीच्या आणि मधल्या प्रवासात (बूस्ट आणि मिड फेज) पाडू शकत नाही. तसेच थाडची रडार यंत्रणा शत्रूची क्षेपणास्त्रे ओळखण्यासाठी त्यांचा आकार, प्रकाशमानता आदी बाह्य़ गुणधर्माचा वापर करते. त्यामुळे शत्रूने खऱ्या क्षेपणास्त्रांसह बनावट क्षेपणास्त्रे डागली तर ती थाडला ओळखता येत नाहीत. इस्रायलची आयर्न डोम क्षेपणास्त्र यंत्रणा शत्रूचे तोफगोळे आणि रॉकेट्सही पाडू शकते. ती क्षमता थाडमध्ये नाही. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी २०१७-१८ साली क्षेपणास्त्र विकासाला गती दिल्याने अमेरिकेने दक्षिण कोरियात थाड प्रणाली तैनात केली. त्याने उत्तर कोरियासह चीन आणि रशियाची चिंता वाढली.

 

मराठीतील सर्व गाथा शस्त्रांची बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: S 400 triumph air defence missile system