दयानंद लिपारे, लोकसत्ता 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : कोल्हापूरच्या गणेशोत्सवाला विधायक उपक्रम प्रबोधनाची परंपरा आहे.  यंदाच्या निर्बंधमुक्त सण साजरे करण्याच्या प्रयत्नात अतिउत्साहाच्या आवेगात विधायक उपक्रम झाकोळले गेले. आवाजाच्या भिंती, लेसर शो, नाच हे प्रकार उत्सवाच्या मूळ संकल्पनेला धक्का देणारे होते.  महापालिका निवडणूक तोंडावर असल्याने या अपप्रवृत्तीवर बोलण्यास कोणीही नेता धजावला नाही किंबहुना त्यांनी या प्रकाराचे मूक समर्थनच केले.

हेही वाचा >>> “जयंत पाटलांचा दावा सपशेल खोटा”, फॉक्सकॉन कंपनी गुजरातला नेण्यावरून भाजपा नेते अमित साटम यांचा पलटवार

कोल्हापूरच्या गणेशोत्सव विधायक उपक्रम राबवण्याच्या बाबतीत राज्यात अग्रेसर राहिला आहे. मूर्ती दान, निर्माल्य दान, पर्यावरण पूरक गणेश विसर्जन या उपक्रमांचा करवीर नगरीत पायंडा पडला. ‘एक गाव एक गणपती’ यासारख्या संकल्पनांनी कोल्हापूरच्या गणेशोत्सवाला बळ दिले.  त्याचे अनुकरण राज्यात अनेक ठिकाणी केले जाऊ लागले. ज्याच्याकडे पाहून आदर्शवत पायवाट चोखाळायची तिचीच पावले उलटय़ा दिशेने पडू लागली असल्याचा अनुभव अलीकडे  सातत्याने येत चालला आहे. यंदा तर त्यावर कडी झाली. 

निर्बंधमुक्त उत्सव साजरा करण्यास शासनाने परवानगी दिली. पडत्या फळाची आज्ञा शिरसावंद्य मानून सार्वजनिक तरुण मंडळांनी गणेशोत्सव जोरदारपणे साजरा केला. त्याची झलक गणेश आगमनापासूनच झाली होती. पण विसर्जन कालावधीत जे प्रकार घडले ते पुरोगामित्वाचा झेंडा मिरवणाऱ्या कोल्हापूरच्या परंपरेला डाग लावणारे होते. 

विधायकतेचा वारसा

कोल्हापूरच्या गणेशोत्सवाने याही वर्षी मूर्तिदान, निर्माल्य दान, पर्यावरण पूरक विसर्जन, एक गाव एक गणपती या संकल्पना राबवल्या. त्यांना घरोघरी गणरायाची पूजन करणाऱ्या भाविकांपासून ते अनेक सार्वजनिक तरुण मंडळानेही प्रतिसाद दिला. उत्सव शिस्तबद्ध व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा महापालिका, पोलीस प्रशासन सतर्क राहिले. कायदा सुव्यवस्थेला बाधा येत नाही तोपर्यंत हस्तक्षेप करायचा नाही असा सावध पवित्रा घेतला. परिणामी विसर्जन मिरवणुकी वेळी महालक्ष्मी मंदिरासमोरील महाद्वार रोडपासून महत्त्वाच्या ठिकाणी चेंगराचेंगरीचे प्रकार सतत घडत राहिले. हरवलेल्या चपला पाच वाहने भरतील इतक्या होत्या हे पाहण्याची वेळ आहे.

गणेशोत्सवात चांगले उपक्रम राबवले असले तरी त्यावर विसर्जन मिरवणुकीतील अपप्रवृत्तीने बोळा फिरवला. राजर्षी शाहू जीवन कार्य, महापालिका हद्दवाढ, मोजके सजीव, हालते देखावे यांसारख्या महत्त्वाच्या विषयांची हाताळणी काही मंडळी केली. दरवर्षीच्या उत्सवात महाद्वार रोडवर दुपारनंतर जाणे अशक्य व्हायचे.  यावेळी सायंकाळपर्यंत सहज वावर अशी परिस्थिती होती. कारण दिवेलागणी नंतर येथे मोठय़ा मंडळांची गर्दी झाली. त्यांची आपापसातील सुप्त – उघड स्पर्धा  सुरू झाली. त्यातून कोण अधिक त्रास देऊ शकतो याची शर्यत रंगली. वाद्यांचा खणखणाट  कर्णबधिर करणारा होता. लेसर शोचा झगमगाट मंडळांच्या अर्थस्थितीमुळे डोळे दिपायला लावणारा होता. यामुळे अनेकांच्या डोळय़ाला इजा निर्माण झाली. नेत्रविकार संघटनेलाही चिंता करायला लावणारा हा विषय बनला. रशियन नृत्यांगनेस लाखो रुपये मोजून नृत्य करायला लावले. इतक्या पैशात एका सामाजिक संस्थेचा वर्षभराचा खर्च निघाला असता अशा बोलक्या प्रतिक्रिया समाजभान टिपणाऱ्या होत्या. उत्सवाच्या मोकाट आनंदापुढे विचारी जनता बधिर झाली.

पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या या शहरात उत्सवातील बेभानतेमुळे उत्सवग्रस्त होणाऱ्यांची संख्या वाढणे हा बदल चिंताजनक आहे. याची तमा मंडळांना राहिलेली नाही. लाखो रुपये खर्च करून काही नावीन्यपूर्ण आणले आहेत तर त्याचा आनंद घ्या, अशा या मंडळाच्या प्रतिक्रिया आहेत. याच अट्टहासातून मंडळांनी रात्री बारा ते सहा या काळात वाद्य वाजवायचे नसल्याने या काळात मिरवणुका जागीच थांबवल्या. सकाळी त्या पूर्ववत  सुरू केल्याने सायंकाळपर्यंत मिरवणुका सुरूच राहिल्या. महापालिका निवडणूक तोंडावर असल्याने मंडळांना गलेलठ्ठ प्रायोजक मिळाले होते. पाण्यासारखा पैसा खर्च झाला. पण त्यातून साध्य काय झाले याचे चिंतन करण्याची कोणाला गरज वाटत नाही हा चिंतेचा विषय ठरला आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Displeasure due to noise laser shows during ganesh immersion in kolhapur zws
First published on: 15-09-2022 at 01:50 IST