कोल्हापूर : इचलकरंजीकरांना प्रदीर्घकाळापासून प्रतिक्षा असलेले उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्यास राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. या संदर्भातील अध्यादेश आठवडाभरात जारी होऊन १० जूनपर्यंत हे कार्यालय सुरु होईल, अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ते म्हणाले, कोल्हापूरनंतर जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर म्हणून इचलकरंजीची ओळख आहे. येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु व्हावे यासाठी मागील तीन वर्षापासून शासन स्तरावर पाठपुरावा करत होतो. महाविकास आघाडी काळात असहकार्य मिळाले. सत्ता बदलानंतर इचलकरंजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास मंजूरी मिळाली आहे. कार्यालयासाठी ४५ ते ५५ जणांचा कर्मचारी वृंदही उपलब्ध होणार आहे. लालनगर परिसरातील गारमेंट प्रशिक्षण केंद्राची इमारत उपयोगी आहे. ४२ गुंठे जागेत ४५ हजार चोरस फुटाची तीन मजली इमारत भाडेतत्वावर उपलब्ध करुन द्यावी यासाठी महापालिका प्रशासनाला पत्र दिले आहे. येत्या २८ जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत.  याचदिवशी या मान्यवरांचे हस्ते तारदाळ येथील कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट अ‍ॅन्ड इंटीग्रेटेड टेक्स्टाईल पार्क (केएटीपी) संस्थेच्या जागेत उभारण्यात आलेल्या ब्रेक टेस्ट ट्रॅकचे उद्घाटन करण्याचा मानस असल्याचेही आमदार आवाडे यांनी सांगितले. जिल्ह्यातील हातकणंगले व शिरोळ तालुक्यात ४५ टक्के रिक्षा, लहान टेम्पो, तीनचाकी टेम्पो प्रकारातील वाहने आहेत. त्यांच्या पासिंगसाठी केएटीपी संस्थेने स्वखर्चातून ट्रॅक तयार केला आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Separate rto office will be started in ichalkaranji says prakash awade zws