कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयामध्ये केवळ ५ दिवसांच्या बाळाच्या डोक्यावरील गाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.करवीर तालुक्यातील प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलेने मुलाला जन्म दिला. साडे तीन किलो वजनाच्या या मुलाला जन्मतः डोक्याच्या मागे एक मोठी गाठ होती. तपासणी मध्ये मागच्या कवटीला छेद असल्याने मेंदूचे आवरण व पाणी यांची गाठ तयार झाली होती.
उपचारानंतर बाळ बरे
रुग्णालयातील अत्याधुनिक नवजात शिशू विभागाच्या शिशु तज्ञ डॉ. निवेदिता पाटील व मेंदूविकार तज्ञ डॉ. उदय घाटे यांनी ही गाठ शस्त्रक्रिया करून काढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला पालकानीही संमती दिली. त्यानुसार डॉ. घाटे यांनी शस्त्रक्रिया करून गाठ काढली. बाळाला पुन्हा अतिदक्षता विभागात दाखल केले. ५ दिवसात बाळ पूर्ण बरे झाले असून त्याला आईकडे सुपूर्द करण्यात आले, असल्याचे शुक्रवारी सांगण्यात आले.
शिशु रुग्णांसाठी दिलासाजनक
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या सहकार्याने डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयामध्ये अद्ययावत ३० खाटचे नवजात शिशु अतिदक्षता विभाग सुरु करण्यात आले आहे. जोखम व अत्यंत जोखमीचे नवजात बालक, कमी दिवसाचे, कमी वजनाचे नवजात शिशू यावर या विभागात अत्याधुनिक उपचार कमी खर्चात केले असल्याने हे केंद्र शिशु रुग्णांसाठी दिलासाजनक ठरले आहे, असे अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, बाल रोग विभागप्रमुख डॉ. अनिल कुरणे, भूलविभाग प्रमुख डॉ. संदीप कदम यांनी सांगितले.