X
X

विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो !

READ IN APP

शास्त्रींच्या कल्पनेला निवड समितीचा दुजोरा

विश्वचषकासाठी कर्णधार विराट कोहलीने कोणत्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यावं याबद्दल गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा सुरु आहेत. मध्यंतरीच्या काळात प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहली विश्वचषकात गरजेनूसार चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली होती. शास्त्रींच्या या कल्पनेला निवड समितीचे प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांनीही दुजोरा दिला आहे.

अवश्य वाचा – विश्वचषकासाठी लोकेश राहुलचं फॉर्मात येणं गरजेचं – एम.एस.के. प्रसाद

“विश्वचषकात विराट कोहलीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणं ही चांगली कल्पना आहे. मात्र त्याआधी आपल्याला परिस्थितीचा आढावा घ्यावा लागेल. सध्या विराट कोहली वन-डे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करतो आहे. जागतिक क्रिकेटमधे तो सध्या पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे. मात्र संघाला त्याची गरज चौथ्या क्रमांकावर असेल, तर तो जरुर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. मात्र, परत यासाठी संघाला त्याची गरज नेमक्या कोणत्या जागेवर आहे हे पहावं लागले.” Hotstar ला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद बोलत होते.

रवी शास्त्री यांनी विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागू शकते असे संकेत दिले असले तरीही, माजी कर्णधार सौरव गांगुलीने या कल्पनेला विरोध केला होता. कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आल्यास संघाचं संतुलन बिघडेल असं मत गांगुलीने व्यक्त केलं होतं. 24 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विराटने भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. त्यामुळे या मालिकेत विराटच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

22
X