अनेक प्रमुख खेळांत भारताकडून निराशाजनक कामगिरी होत असताना रोलर स्केटिंग या देशात अनोळखी असलेल्या क्रीडा प्रकारात सोमवारी भारताला अनपेक्षित यश मिळाले. भारताच्या स्पीड स्केटर्सनी दोन कांस्यपदकांची कमाई केली.पुरुष आणि महिलांच्या तीन हजार मीटर सांघिक रिले प्रकारात भारताने ही पदके मिळवली. कार्तिका जगदीश्वरन, हिरल साधू आणि आरथी कस्तुरी राज यांनी भारताला पहिले कांस्यपदक मिळवून दिले. त्यानंतर आनंद कुमार वेलकुमार, सिद्धांत कांबळे, विक्रम इंगळे यांनी चार मिनिटे १०.१२८ सेकंद अशी वेळ देत दुसरे कांस्यपदक मिळवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोलर स्केटिंगचा २०१०च्या आशियाई क्रीडा स्पर्धेपासून समावेश झाला. त्या पहिल्या स्पर्धेत अनुप कुमार यामा एकेरीच्या फ्री-स्केटिंग प्रकारात कांस्यपदकाचा मानकरी ठरला होता. त्यानंतर अवनी पांचाळसह दुहेरीतही कांस्यपदकाची कमाई केली होती. पण, त्यानंतर भारतीय पदकापासून वंचितच राहिले होते.महिला संघाने सर्वप्रथम कांस्यपदक मिळवताना चार मिनिटे ३४.८६१ सेकंद अशी वेळ दिली. या पदकाने आमच्यासाठी संधींचे अनेक दरवाजे उघडले जातील. भारतात अजूनही या खेळाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. अर्थात, हा ऑलिम्पिक खेळ नसल्याचा फटकाही बसतो, अशी भावना आरथीने व्यक्त केली.

पुरुष संघाने पात्रता फेरीत चार मिनिटे १५.१२६ सेकंद अशी वेळ दिली होती. अंतिम फेरीत भारतीय त्रिकुटाने आपली कामगिरी उंचावत कांस्यपदकापर्यंत मजल मारली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bronze medals for india in roller skating sport news amy