टोरंटो : भारताचा १७ वर्षीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने आपला आदर्श आणि पाच वेळा विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदच्या पावलावर पाऊल ठेवताना प्रतिष्ठेची ‘कँडिडेट्स’ स्पर्धा जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. ‘कँडिडेट्स’चे जेतेपद मिळवणारा तो आजवरचा सर्वात युवा बुद्धिबळपटू ठरला आहे. त्याने महान गॅरी कास्पारोवने ४० वर्षांपूर्वी रचलेला विक्रम मोडीत काढला. तसेच

तो ‘कँडिडेट्स’ जिंकणारा आनंदनंतरचा दुसराच भारतीय बुद्धिबळपटू ठरला. या जेतेपदासह चेन्नईकर गुकेशने विद्यमान जगज्जेत्या चीनच्या डिंग लिरेनला या वर्षीच होणाऱ्या जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत आव्हान देण्याची संधी मिळवली.

यंदाची ‘कँडिडेट्स’ स्पर्धा बुद्धिबळप्रेमींच्या कायम लक्षात राहील अशी झाली. १३व्या फेरीअंती गुकेश अग्रस्थानी होता. मात्र, त्याच्यात आणि संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानावर असलेल्या इयान नेपोम्नियाशी, हिकारू नाकामुरा आणि फॅबियानो कारुआना यांच्यात केवळ अध्र्या गुणाचा फरक होता. जेतेपदाच्या शर्यतीत असलेले हे चौघे १४व्या फेरीत एकमेकांविरुद्धच खेळणार असल्याने ही अखेरची फेरी अत्यंत चुरशीची व नाटयमय होणार असे अपेक्षित होते आणि तेच झाले. गुकेशने अमेरिकेच्या नाकामुराला ७१ चालींत बरोबरीत रोखण्यात यश मिळवले. मात्र, त्यानंतरही जवळपास तासभर त्याचे जेतेपद निश्चित झाले नव्हते. अखेर गेल्या दोन ‘कँडिडेट्स’मधील विजेता नेपोम्नियाशी आणि अमेरिकेचा अग्रमानांकित कारुआना यांच्यातील लढत तब्बल १०९ चालींनंतर बरोबरीत सुटल्याने गुकेशच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब झाले.

हेही वाचा >>> IPL 2024: राजस्थान ‘यशस्वी’; जैस्वालची शतकी खेळी, ५ विकेट्ससह संदीप शर्माची दमदार साथ

१४ फेऱ्यांअंती गुकेशच्या खात्यावर नऊ गुण होते. नेपोम्नियाशी, नाकामुरा आणि कारुआना यांनी प्रत्येकी ८.५ गुणांसह संयुक्तरीत्या दुसरे स्थान मिळवले. भारताचा आर. प्रज्ञानंद ७ गुणांसह पाचव्या, विदित गुजराथी सहा गुणांसह सहाव्या, फ्रान्सचा अलिरेझा फिरुझा पाच गुणांसह सातव्या, तर अझरबैजानचा निजात अबासोव ३.५ गुणांसह आठव्या स्थानी राहिला. अखेरच्या फेरीत प्रज्ञानंदने अबासोवला पराभूत केले, तर विदित आणि फिरुझा यांच्यातील लढत बरोबरीत सुटली.

भारतीयांची स्पर्धेतील कामगिरी

* डी. गुकेश : भारताच्या डी. गुकेशने ‘कँडिडेट्स’मधील सर्वात युवा विजेता म्हणून मिरवण्याचा मान मिळवला आहे. गुकेशने या स्पर्धेत पाच विजय मिळवले, तर आठ लढती बरोबरीत सोडवल्या. त्याला केवळ अलिरेझा फिरुझाकडून पराभव पत्करावा लागला.

* प्रज्ञानंद : गुकेशचा खास मित्र असलेल्या युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदनेही ‘कँडिडेट्स’मध्ये आपल्यातील अलौकिक प्रतिभा सिद्ध केली. त्याने सात गुणांसह पाचवे स्थान मिळवले. त्याने या स्पर्धेदरम्यान विदित गुजराथी आणि निजात अबासोव (दोन वेळा) यांना पराभूत केले. विशेष म्हणजे त्याने कोणत्याही लढतीत धोका पत्करणे टाळले नाही. त्यामुळे त्याचे बरेच कौतुक झाले.

* विदित गुजराथी : विदित गुजराथीने यंदाच्या स्पर्धेची दमदार सुरुवात केली होती, पण अखेरच्या काही फेऱ्यांत तो लय गमावून बसला. त्यामुळे सहा गुणांसह त्याला सहाव्या फेरीवर समाधान मानावे लागले. मात्र, त्याने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या हिकारू नाकामुराला दोन वेळा पराभूत करण्याची किमया साधली.

* कोनेरू हम्पी : यंदाच्या ‘कँडिडेट्स’मध्ये भारतातर्फे हम्पीकडून सर्वाधिक अपेक्षा केल्या जात होत्या. सुरुवातीला सूर गवसण्यासाठी तिला वेळ लागला, पण अखेरच्या फेऱ्यांमध्ये तिने लौकिकाला साजेशी कामगिरी केली. पहिल्या सात फेऱ्यांत तिची विजयाची पाटी कोरी होती. मात्र, स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात तिने सातपैकी तीन लढती जिंकल्या आणि चार लढती बरोबरीत सोडवल्या. त्यामुळे स्पर्धेअंती ती दुसऱ्या स्थानी राहिली.

* आर. वैशाली : प्रज्ञानंदची थोरली बहीण असलेल्या वैशालीची या स्पर्धेतील कामगिरी लक्षवेधी ठरली. वैशालीची पहिल्या पाच फेऱ्यांत एक विजय, एक पराभव, तीन बरोबरी अशी कामगिरी होती. त्यानंतर सलग चार फेऱ्यांत तिला पराभव पत्करावा लागला. मात्र, अखेरच्या पाचही फेऱ्यांमध्ये तिने विजय मिळवले. त्यामुळे अखेरीस तिचे हम्पीप्रमाणेच ७.५ गुण झाले.

कौतुकाचा वर्षांव..

सर्वात युवा आव्हानवीर ठरल्याबद्दल गुकेशचे अभिनंदन. वेस्टब्रिज-आनंद बुद्धिबळ अकादमीला तुझ्या या यशाचा खूप अभिमान आहे. तू ज्या प्रकारे खेळलास आणि सामन्यांदरम्यान आव्हानात्मक परिस्थितीचा ज्या प्रकारे सामना केलास, त्याबद्दल मला तुझा खूप अभिमान वाटतो. – विश्वनाथन आनंद, भारताचा माजी विश्वविजेता बुद्धिबळपटू.

वयाच्या १७व्या वर्षी ‘कँडिडेट्स’चे जेतेपद पटाकवून सर्वात युवा विजेता ठरल्याबद्दल गुकेशचे अभिनंदन. आता तुझा यापुढचा प्रवास तुला जगज्जेतेपदापर्यंत घेऊन जाणार आहे. या प्रवासात आम्ही तुझ्या सोबत असू. – सचिन तेंडुलकर, भारताचा माजी क्रिकेटपटू.

‘कँडिडेट्स’ स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याबद्दल युवा गुकेशचे खूप अभिनंदन. पूर्ण भारताला तुझा अभिमान आहे. – आरबी रमेश, माजी बुद्धिबळपटू आणि प्रशिक्षक.

मी या स्पर्धेत सुरुवातीपासून चांगला खेळत होतो. मात्र, सातव्या फेरीत अलिरेझा फिरुझाविरुद्ध मला पराभव पत्करावा लागला. तो पराभव जिव्हारी लागणार होता, पण यातूनच खेळ उंचावण्याची मला प्रेरणा मिळाली. पुढील दिवस विश्रांतीचा होता. त्या दिवशी माझी मन:स्थिती उत्तम होती. पराभवाने मला वेगळीच ऊर्जा मिळाली असे म्हणणेही चुकीचे ठरणार नाही. मी चांगला खेळत राहिलो, सकारात्मक मानसिकता राखली, तर पुढील फेऱ्यांत विजय मिळवू शकतो असा मला विश्वास होता. संपूर्ण स्पर्धेत मला कामगिरीत सातत्य राखण्यात यश आले याचे नक्कीच समाधान आहे. माझ्या जेतेपदावर शिक्कामोर्तब झाले तेव्हा खूप आनंद झाला होता. मला जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीबद्दल विचार करण्यासाठी फारसा वेळ मिळालेला नाही. मात्र, मी या लढतीची आतुरतेने वाट पाहत आहे. मी या लढतीच्या तयारीसाठी स्वत:ला पूर्णपणे झोकून देईन. – डी. गुकेश

महिलांमध्ये टॅन विजेती, हम्पी दुसऱ्या स्थानी

‘कँडिडेट्स’च्या महिला विभागातही अखेरच्या फेरीपर्यंत चुरस पाहायला मिळाली. अखेर चीनच्या टॅन झोंगीने ९ गुणांसह जेतेपद मिळवले. भारताच्या कोनेरू हम्पी आणि आर. वैशाली यांनी मिळवलेले यशही खास ठरले. १४व्या आणि अखेरच्या फेरीत हम्पीने जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या चीनच्या ले टिंगजीला पराभूत केले. यासह टिंगजीला मागे टाकत तिने गुणतालिकेत दुसरे स्थानही पटकावले. तसेच वैशालीने सलग पाचव्या विजयाची नोंद करताना रशियाच्या अनुभवी कॅटेरिना लायनोला पराभवाचा धक्का दिला. हम्पी, टिंगजी आणि वैशाली या तिघींच्याही खात्यावर ७.५ गुण होते. परंतु टायब्रेकरच्या आधारे हम्पीने दुसरे, टिंगजीने तिसरे आणि वैशालीने चौथे स्थान मिळवले.